‘आयएनएस मालवण’ या नव्या युद्धनौकेचे महत्त्व काय?
आयएनएस मालवण ही स्वदेशी ‘माहे-क्लास’ श्रेणीतील पाणबुडीरोधी युद्धनौका आहे. समुद्राच्या उथळ पाण्यात दडून बसलेल्या शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्या नष्ट करणे हे या युद्धनौकेचे मुख्य काम आहे. नुकतीच ती भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली. ‘आयएनएस मालवण”च्या समावेशामुळे भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी युद्धक्षमता आणखी वाढली आहे. मोठ्या युद्धनौका, पाणबुड्या आणि हवाई दलाच्या उपकरणांसोबत अखंडपणे काम करण्याच्या क्षमतेमुळे आयएनएस मालवणच्या भारतीय नौदलातील समावेशामुळे नौदल लढाऊदृष्ट्या सज्ज, विश्वासार्ह, सुसंघटित आणि भविष्यासाठी सज्ज होणार आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी देशाची सुरक्षा सुनिश्चित करता येईल आणि भारताच्या सागरी हितांचे रक्षण करणे शक्य होणार आहे, असे संरक्षण विभागाने नमूद केले.
युद्धनौकेला ‘मालवण’ हे नाव, बोधचिन्हात ‘वाघनखे’ का आहेत?
युद्धनौकेला मालवण हे नाव, वाघनघे हे बोधचिन्ह देण्यामागे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. नाव आणि बोधचिन्हाचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी वारशाशी जोडलेला आहे. कोकण किनारपट्टीवरील मालवण या गावाच्या नावावरून युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे. या युद्धनौकेच्या बोधचिन्हावर ‘वाघनखे’ कोरण्यात आली आहेत. शौर्य, चपळता आणि गनिमी काव्याचे ते प्रतीक आहे. सायलेंट क्लॉज हे युद्धनौकेचे ब्रीदवाक्य आहे. शत्रूच्या दृष्टीस न पडता वेगाने हल्ला करण्याची क्षमता यातून अधोरेखित होते. तसेच, आयएनएस मालवण याच नावाची युद्धनौका २००३पर्यंत नौदलाच्या सेवेत होती. किनारपट्टीजवळच्या किंवा उथळ पाण्याच्या भागात समुद्रात पेरलेली स्फोटके शोधून ती नष्ट करण्यासाठी वापरली जाणारी विशेष लहान युद्धनौका. त्या युद्धनौकेचा वारसा पुढे चालवला जाणार आहे, अशी माहिती संरक्षण विभागाने दिली.
आयएनएस मालवणच्या प्रमुख युद्धक्षमता काय आहेत?
आयएनएस मालवण ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी युद्धनौका आहे. उथळ समुद्रात शत्रूच्या हालचालींवर पाळत ठेवणे, शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्या नष्ट करणे, समुद्रातील स्फोटकांचा शोध घेऊन ती नष्ट करणे, तसेच स्फोटके पेरून शत्रूच्या हालचाली रोखणे, कमी तीव्रतेच्या सागरी कारवाया करणे, देशाची सागरी सीमा आणि सागरी व्यापार मार्ग सुरक्षित ठेवणे अशा या युद्धनौकेच्या युद्धक्षमता आहेत. या युद्धनौकेमुळे किनारपट्टीचे रक्षण, किनाऱ्यालगतची सुरक्षा अधिक मजबूत करणे, सागरी क्षेत्रातील दक्षता वाढवणे शक्य होणार आहे.
या युद्धनौकेची लांबी ७८ मीटर (२५६ फूट) आणि रुंदी ११.३६ मीटर (३७.३ फूट) असून, तिचे ड्राफ्ट (पाण्याखालील खोली) २.७ मीटर (८ फूट १० इंच) आहे. कमाल २५ नॉट (४६ किमी प्रतितास) हा युद्धनौकेचा वेग आहे. १४ नॉट (२६ किमी प्रतितास) वेगाने प्रवास करताना तिची कमाल पल्ला क्षमता १,८०० नॉटिकल मैल (३,३०० किमी) आहे आणि ती लागोपाठ १४ दिवस समुद्रात कार्यरत राहू शकते. रॉकेट लाँचर, स्फोटके पेरणे, ट्रिपल ३२४ मिमी लाइट वेट टॉर्पिडो ट्युब्स, ३० मिमी नेव्हल सरफेस गन, दोन १२.७ मिमी एम २ स्टेबिलाइज्ड रिमोट कन्ट्रोल गन अशा शस्त्रास्त्रांनी ही युद्धनौका सज्ज करण्यात आली आहे.
‘माहे क्लास’चे वैशिष्ट्य काय?
‘माहे क्लास’ ही भारतीय नौदलातील स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीरोधी श्रेणीतील युद्धनौकांची विशेष मालिका आहे. नौदलामध्ये माहे क्लास या नावाने वेगवेगळ्या काळांतील युद्धनौकांची श्रेणी आहे. यापूर्वी १९७०-८०मध्येही पाणबुडीरोधी लहान युद्धनौकांना ‘माहे क्लास’ म्हटले जात होते. जुन्या श्रेणीतील युद्धनौका २००३-०४मध्ये नौदलाच्या सेवेतून निवृत्त करण्यात आल्या. तसेच, आताच्या अत्याधुनिक युद्धनौकांना ‘माहे क्लास’ म्हटले जाते. विशेष म्हणजे, दोन्ही काळांतील पहिल्या युद्धनौकांचे नाव ‘माहे’ असल्याने त्याच नावाने युद्धनौकांची श्रेणी ओळखली जाते.
‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेच्या दृष्टीने आयएनएस मालवणचे महत्त्व काय?
‘आयएनएस मालवण’ ही युद्धनौका ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी भाग आणि तंत्रज्ञानापासून तयार करण्यात आली आहे. ‘कोचिन शिपयार्ड’ने तिची निर्मिती बांधणी केली आहे. भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान निर्मितीला यामुळे मोठी चालना मिळाली आहे. तसेच, भारतीय नौदल रचना, उपकरणे, प्रणाली एकात्मीकरण या क्षेत्रांचा विस्तार, संरक्षण जहाजबांधणी क्षेत्रातील भारताची वाढती आत्मनिर्भरता याचे ही युद्धनौका उदाहरण ठरली आहे, असे संरक्षण विभागाने सांगितले.
chinmay.patakar@expressindia.com
