हिंद महासागर क्षेत्रात (आयओआर) चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या पाणबुड्यांच्या तैनातीला शह देण्यासाठी भारतीय नौदलाने पाण्याखालील धोक्यांचा सामना करणाऱ्या पाणबुडीविरोधी युद्धनौकांचा ताफा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. नौदलाच्या ताफ्यात नुकतीच दाखल झालेली आयएनएस मालवण हा त्याचाच एक भाग. शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणे आणि देशाची ११ हजार किलोमीटरहून अधिक लांबीची किनारपट्टी सुरक्षित राखण्यासाठी पाणबुडीविरोधी युद्धात भारतीय नौदलाला आणखी सामर्थ्यवान केले जात आहे.
कारवारचा सोहळा
हवाई दलाचे प्रमुख ए. पी. सिंग आणि नौदलाच्या पश्चिमी मुख्यालयाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ॲडमिरल संजय वत्सयन यांच्या उपस्थितीत माहे श्रेणीतील उथळ पाण्यात कार्य करणारी ही दुसरी पाणबुडीविरोधी युद्धनौका सेवेत दाखल झाली. कारवार नौदल तळावर कार्यान्वित होणारी आयएनएस मालवण ही पहिली भारतीय युद्धनौका. जागतिक अनिश्चिततेच्या काळात बाधारहित सागरी व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सागरी दळणवळण मार्गांच्या संरक्षणाचे महत्त्व हवाई दल प्रमुखांनी अधोरेखित केले. युद्धनौकेच्या बांधणीत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर आणि अधिकाऱ्यांना थेट जहाजबांधणीत समाविष्ट करण्याच्या प्रारूपामुळे संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरतेला गती मिळू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वैशिष्ट्ये काय?
कोचीन शिपयार्डने (सीएसएल) बांधलेली आयएनएस मालवण ही ११०० टनांपेक्षा अधिक वजनाची, ८० मीटर लांबीची युद्धनौका आहे. सहा मेगावॉट वीज निर्माण करणाऱ्या तीन सागरी डिझेल इंजिनद्वारे ती चालवली जाते. ही इंजिने थेट वॉटरजेट प्रोपल्शन प्रणालीशी जोडलेली आहेत. त्यामुळे माहे श्रेणीतील युद्धनौका भारतीय नौदलातील वॉटरजेट प्रणोदन प्रणाली वापरणाऱ्या सर्वांत मोठ्या युद्धनौका ठरतात. वॉटरजेट तंत्रज्ञानामुळे उथळ पाण्यात अनेक फायदे मिळतात. संचारादरम्यान आवाज कमी होऊन तिला शत्रूच्या पाणबुड्यांजवळ गुप्तपणे पोहोचता येते. अरुंद किनारी पाण्यात गती वाढवणे, कमी अंतरात वळणे आणि २५ नॉट्सपर्यंतच्या वेगाने प्रवास करणे शक्य होते. केवळ २.७ मीटर खोली असल्याने ही युद्धनौका जमिनीवर अडकण्याच्या धोक्याशिवाय किनारी प्रदेश, नदीचे मुख आणि द्वीपसमूहांमध्ये संचालन करू शकते. किनारी आणि उथळ पाण्यात पाणबुडीविरोधी कारवाईसाठी ती सक्षम आहे. कमी तीव्रतेच्या सागरी कारवाया आणि सुरुंग युद्धाला सहाय्य करण्यासाठी तिची निर्मिती करण्यात आली आहे. आरबीयू-६००० पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर, स्वदेशी हलक्या वजनाच्या टॉर्पेडोने ती सज्ज आहे. कमी उंचीवरील ड्रोन आणि किनारी जहाजांना सामोरे जाण्यासाठी ३० मिमी नौदल तोफ तसेच १२.७ मिमी रिमोट नियंत्रित मशीनगनचाही समावेश आहे. एकात्मिक पाणबुडीविरोधी संरक्षण प्रणालीने ती सुसज्ज आहे.
छत्रपती शिवरायांचा वारसा
या युद्धनौकेला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला उभारला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या शहरावरून तिला हे नाव देण्यात आले. या युद्धनौकेला पूर्वीच्या आयएनएस मालवणचे नाव आणि युद्धसन्मान देण्यात आला आहे. पूर्वीची आयएनएस मालवण ही पाँडेचरी श्रेणीतील सुरुंगशोधक नौका होती. दोन दशकांहून अधिक काळ ती भारतीय नौदलात कार्यरत होती. २००३ मध्ये तिला सेवामुक्त करण्यात आले. आयएनएस मालवणच्या बोधचिन्हावर ‘वाघनखे’ असून ती शौर्य, युद्धनीती, चपळता आणि धाडस यांचे प्रतीक आहेत. हे चिन्ह जहाजाच्या जलद हल्ला आणि शांतपणे प्रहार करण्याच्या तत्त्वाशी सुसंगत आहे. जहाजाचे ब्रीदवाक्य ‘सायलेंट क्लॉज’ (शांत पंजे) हे संहारकता, गुप्तता आणि शत्रूवर वेगाने हल्ला करण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे.
उथळ पाण्यातील शिकारी
हिंद महासागर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणबुड्यांचे लष्करीकरण होत असताना आयएनएस मालवणचा समावेश झाला आहे. चिनी नौदलाने जलसर्वेक्षण जहाजे आणि पाणबुड्यांच्या नियमित गस्तीद्वारे या क्षेत्रातील आपली उपस्थिती सातत्याने वाढवली आहे. चिनी पाणबुड्या मलाक्का, सुंदा आणि लोंबोक सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गांवर पाळत ठेवतात. अंदमान-निकोबार बेटे तसेच भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील नौदलाच्या हालचालींवरही त्यांच्याकडून लक्ष ठेवले जाते. आयएनएस मालवण आणि तिच्यासारख्या अन्य नौका कमी खर्चातील उथळ पाण्यातील शिकारी म्हणून काम करतात. त्या शत्रूच्या पाणबुड्यांना भारतीय नौदल तळ, ऊर्जा केंद्रे आणि व्यापारी बंदरांजवळ दबा धरून बसण्यापासून रोखतात. ज्या ठिकाणी मोठ्या युद्धनौकांना खोलीची मर्यादा आणि उथळ समुद्रतळावरील ध्वनिक परावर्तनामुळे सामरिक अडचणी निर्माण होतात, अशा ठिकाणी आयएनएस मालवण प्रभावीपणे कार्य करू शकते. तिच्या बांधणीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे.
शक्ती संतुलन…
आयएनएस मालवणच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या आधुनिकीकरणाला आणखी वेग मिळणार आहे. सध्या नौदलात साधारणतः दर ४० दिवसांनी एक नवीन जहाज किंवा नौका समाविष्ट होत आहे. या वर्षात दाखल होणारी ही सातवी नौका असून आणखी १२ जहाजे ताफ्यात सामील होणार असल्याचे व्हाइस ॲडमिरल संजय वत्सयन यांनी सांगितले. १६ विशेष पाणबुडीविरोधी युद्धनौकांच्या कार्यक्रमांतर्गत आयएनएस मालवण कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये आठ अर्नाळा श्रेणीतील, तर उर्वरित आठ माहे श्रेणीतील युद्धनौका आहेत. चीन हिंद-प्रशांत क्षेत्रात आपला प्रभाव झपाट्याने वाढवत असल्याने सागरी सीमेचे रक्षण करण्यासाठी भारताने २०३५ पर्यंत सध्याचा १४५ सक्रिय युद्धनौकांचा ताफा २०० पर्यंत वाढविण्याची योजना आखली आहे. चीनकडे सुमारे ६५, तर पाकिस्तानकडे आठ सक्रिय पाणबुड्या आहेत. ही संख्या वाढविण्यासाठी पाकिस्तानने चीनबरोबर पाच अब्ज डॉलर्सचा कार्यक्रम आखला आहे. वाढती प्रादेशिक सुरक्षा स्पर्धा आणि महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील दबावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने पुढील काही वर्षांत ५० युद्धनौका व सहाय्यक जहाजे ताफ्यात सामील करण्याची तयारी केली आहे.
