आयएनएस मंगरोल ही पाणबुडीरोधी युद्धनौका नुकतीच भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली. याच नावाच्या पूर्वीच्या युद्धनौकेचा वारसा असलेली, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली ही नवी युद्धनौका आहे. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची क्षमता वाढून सागरी सीमांचे संरक्षण, देखरेख अधिक सक्षमपणे करणे शक्य होणार आहे.
आयएनएस मंगरोल युद्धनौकेची पार्श्वभूमी काय?
आयएनएस मंगरोल माहे श्रेणीतील उथळ पाण्यातील पाणबुडीविरोधी युद्धनौका (अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट) या प्रकारातील ही युद्धनौका आहे. गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील किनारपट्टी भागात ‘मंगरोल’ नावाचे छोटे बंदर आहे. हे बंदर सागरी मत्स्यव्यवसायाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. या गावाच्या नावावरून युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले. याच नावाच्या युद्धनौकेने १९८३ ते २००४ या कालावधीत भारतीय नौदलात सेवा दिली होती. समुद्रातील सुरूंग शोधणारी युद्धनौका हे तिचे वैशिष्ट्य होते. आता जुने नाव कायम ठेवून नवी युद्धनौका आपल्या ताफ्यात समाविष्ट करून नौदलाने युद्धनौकेचा वारसा कायम ठेवला आहे. अलीकडेच आयएनएस मालवण ही माहे श्रेणीतीलच युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर आता याच श्रेणीतील आयएनएस मंगरोल ही ही नवी युद्धनौकाही दाखल झाली आहे.
‘आयएनएस मंगरोल’ युद्धनौकेची बांधणी कशी आहे?
कोची येथील कोचीन शिपयार्डने युद्धनौकेची बांधणी केली आहे. तसेच भारत इलेक्ट्रॉनिक्ससह खासगी क्षेत्रातील कंपन्या, एमएसएमई कंपन्यांनी या निर्मिती प्रक्रियेमध्ये योगदान दिले आहे. या युद्धनौकेमध्ये ६ मेगावॉट शक्ती निर्माण करणारे तीन मरीन डिझेल इंजिन आहेत, प्रत्येक इंजिन वॉटरजेटशी जोडलेले आहे. युद्धनौकेची लांबी ७८ मीटर, रुंदी ११.३६ मीटर आणि ड्राफ्ट (पाण्याखालील खोली) २.७ मीटर आहे. ही युद्धनौका कमाल २५ नॉट्स (४६ किमी/तास) वेगाने धावू शकते आणि १४ नॉट्स (२६ किमी/तास) वेगाने चालल्यास १४ दिवसांच्या कार्यक्षमतेसह कमाल १,८०० नॉटिकल मैल अंतर पार करू शकते. ध्वनी मर्यादांवर मात करण्यासाठी, आयएनएस मंगरोलमध्ये मरीन डिझेल इंजिनवर चालणारी वॉटरजेट प्रोपल्शन सिस्टीम बसवण्यात आली आहे. वॉटरजेट्समुळे पारंपारिक पंख्यांच्या चक्राकार फिरण्यामुळे पाण्यातील हवेच्या बुडबुड्यांचा आवाज पूर्णपणे नष्ट होतो. त्यामुळे ही युद्धनौका अवघ्या २.७ मीटर उथळ पाण्यातून प्रवास करतानाही तिच्या स्वतःच्या ध्वनी यंत्रणेच्या कार्यात अडथळा आणत नाही.
आत्मनिर्भर भारत संकल्पनेच्या दृष्टीने ‘आयएनएस मंगरोल’चे महत्त्व काय?
‘आयएनएस मंगरोल’चे नौदलाकडे करण्यात आलेले हस्तांतरण हा भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या युद्धनौकेत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी बनावटीच्या सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारची आत्मनिर्भर भारत संकल्पना पुढे नेणारी ही युद्धनौका आहे. तसेच स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि जहाज बांधणी परिसंस्थेची वाढती क्षमता दर्शवणारे उत्तम उदाहरण आहे, असे संरक्षण विभागाने नमूद केले.
युद्धनौकेच्या महत्त्वाच्या युद्धक्षमता कोणत्या?
युद्धनौका तांत्रिक सक्षम करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. उथळ किनारपट्टीच्या पाण्यात, जिथे माग काढणे कठीण असते, त्या भागात शत्रूच्या लपलेल्या पाणबुड्या शोधणे, त्यांचा माग घेणे आणि त्या नष्ट करणे हे युद्धनौकेचे प्रमुख काम आहे. तसेच पाण्याखालील भागाची टेहळणी, किनारपट्टीलगतच्या भागातील पाणबुडीरोधक युद्ध मोहिमा, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा (एलआयएमओ) आणि सुरुंगरोधी (माइन वॉरफेअर) कारवाया करण्यासाठीच्या साधनांनी युद्धनौका सुसज्ज करण्यात आली आहे. ही युद्धनौका ‘वॉटरजेट्स’वर चालणारी असून अत्याधुनिक पाणतीर (टॉर्पेडोज), पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे, तसेच प्रगत रडार आणि सोनार प्रणाली, आरबीयू ६००० पाणबुडीरोधी रॉकेट लाँचर, हलक्या वजनाचे टॉरपिडो अशा शस्त्रास्त्रांमुळे दमदार क्षमता आहे. या युद्धनौकेच्या भारतीय नौदलातील समावेशामुळे आता नौदल लढाऊदृष्ट्या सज्ज, विश्वासार्ह, सुसंघटित आणि भविष्यासाठी सज्ज होणार आहे. सागरी आणि किनारपट्टी प्रदेशातील देखरेख करणे, जलद कारवाई करणे भारतीय नौदलाला शक्य होणार आहे. त्यामुळे कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी देशाची सुरक्षा सुनिश्चित करून भारताच्या सागरी हितांचे रक्षण करता येणार आहे.
chinmay.patankar@expressindia.com
