आखाती भागातील युद्धाचे सावट आणि हिंद महासागर क्षेत्रात चिनी नौदलाची वाढती उपस्थिती अशा काळात दाखल होणारी भारताची ब्रम्होस क्षेपणास्त्र सुसज्ज अत्याधुनिक आयएनएस तारागिरी युद्धनौका नौदलाच्या लढाऊ ताफ्याला अधिक धार देणार आहे. विशाखापट्टणम येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ३ एप्रिल रोजी ही नवीन तंत्रज्ञानयुक्त (स्टेल्थ) युद्धनौका भारतीय नौदलात समाविष्ट होत आहे. भारताचा पूर्णपणे आत्मनिर्भर नौदल शक्ती बनण्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

वैशिष्ट्ये काय?

निलगिरी (प्रकल्प १७ अ) श्रेणीतील तारागिरी ही चौथी युद्धनौका आहे. मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) बांधलेली ही तिसरी नौका. ६६७० टन वजनाची ही युद्धनौका भारतीय जहाज बांधणी क्षेत्रातील स्वदेशी अभियांत्रिकी कौशल्याचे मूर्तिमंत प्रतीक असल्याची भावना नौदलाने व्यक्त केली आहे. पूर्वीच्या लिएंडर श्रेणीतील आयएनएस तारागिरीचे हे नवे रूप आहे. ती मे १९८० ते जून २०१३ या कालावधीत भारतीय नौदलाच्या ताफ्याचा भाग होती. या नौकेने देशासाठी ३३ वर्षे गौरवशाली सेवा दिली. निलगिरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ बहुउद्देशीय मोहिमांसाठी स्वदेशी युद्धनौकांची बांधणी आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने क्षमता विस्तारण्याच्या दृष्टिकोनातून रोवली गेली. आयएनएस तारागिरी ही पूर्वीच्या रचनेच्या तुलनेत अधिक सुबक आकार आणि कमी रडार दृश्यमानता यामुळे अधिक घातक ठरू शकते. आधीच्या नौकांच्या संरचनेपेक्षा ती कितीतरी अत्याधुनिक आणि सरस मानली जाते. पुढील पिढीतील तंत्रज्ञानही त्यात आहे. आकाराने छोटी असल्याने आणि कमी झालेला ‘रडार क्रॉस सेक्शन’ तिला घातक, गुप्तपणे काम करण्याची क्षमता देतो. एमडीएल कंपनीने ही युद्धनौका गेल्या वर्षी सुपूर्द केली होती. ती पूर्वीच्या लिएंडर श्रेणीतील युद्धनौकेची जागा घेणार आहे.

शस्त्रसज्जता…

स्वनातीत (सुपरसॉनिक) हल्ला, हवाई संरक्षण आणि पाणबुडीविरोधी प्रभावी क्षमता यांचा मिलाफ असणारी ही युद्धनौका मानली जाते. ‘पी १७ अ’ श्रेणीतील युद्धनौका ‘पी १७’ (शिवालिक) वर्गाच्या तुलनेत प्रगत शस्त्रास्त्रे आणि सेन्सर प्रणालीने सुसज्ज आहेत. डिझेल किंवा गॅस अशा दोन्ही इंधनावर संयुक्त प्रणोदन प्रणालीद्वारे चालणारी आयएनएस तारागिरी वेगवान आणि समुद्रात तग धरण्याची उच्च क्षमता असणारी आहे. बहुविध आणि बहुआयामी सागरी कारवाईच्या दृष्टीने ती सक्षम करण्यात आली. ब्रम्होस क्षेपणास्त्रे, एमआरएसएएम हवाई संरक्षण प्रणाली, अत्याधुनिक रडार, तोफा आणि पाणतिरांनी ती सज्ज आहे. हवा, जमीन आणि पाण्याखाली अशा तीनही क्षेत्रांतील धोके अचूकपणे शोधण्यासाठी, त्यांचा मागोवा घेऊन ते निष्प्रभ करण्यासाठी ती तयार करण्यात आली. शस्त्रास्त्रे व संवेदक प्रणालीत (सेन्सर) पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणारे ब्रम्होस क्षेपणास्त्र, एमएफस्टार रडार, मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, ७६ मिलीमीटर ‘सुपर रॅपिड गन माऊंट’ आणि ३० आणि १२.७ मिलीमीटर जवळच्या पल्ल्याची शस्त्रास्त्र प्रणाली यांचा समावेश आहे. एका प्रगत लढाऊ प्रणालीद्वारे एकत्रित केलेली ही शस्त्रे समुद्रातील सर्व क्षेत्रातील धोक्यांना जलद व अचूक प्रतिसाद देण्यास सक्षम करतात.

बहुविध भूमिका

समुद्रातील एक शिकारी युद्धनौका एवढीच तारागिरीची मर्यादित भूमिका नाही. तर राजकीय मुत्सद्देगिरीच्या वेळी तसेच मानवी संकटांच्या काळातही मदत करण्यास ती सुसज्ज आहे. तिची लवचिक कार्यक्षमता तीव्र अशा युद्धासाठी सज्ज असण्यासोबतच आपत्ती निवारण आणि इतर मानवी संकटात मदतीसाठी एक आदर्श युद्धनौका म्हणून उपयुक्त ठरणारी आहे.

आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

मागील वर्षी रशियात बांधलेली आयएनएस तमाल युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करताना परदेशात निर्मिलेली ही शेवटची युद्धनौका राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. युद्धनौका बांधणीत देशांतर्गत क्षमता विस्तारली आहे. आयएनएस तारागिरीचा समावेश भारतीय नौदलाला आत्मनिर्भर बनवण्यासाठीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नव्या पिढीची ही अत्याधुनिक युद्धनौका नौदल रचना, स्टेल्थ, अग्निशक्ती, स्वयंचलन आणि टिकाऊपणाच्या क्षमतेतील एक मोठी झेप अधोरेखित करते. युद्धनौकेत ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री आहे. या कामात २०० हून अधिक सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिले. संरक्षण सामग्रीसाठी परकीय अवलंबित्व कमी करून आत्मनिर्भर भारतच्या धोरणाला या प्रकल्पाने बळ दिले. भारतीय नौदल हे एक लढाऊ सज्ज, एकसंध, विश्वासार्ह व आत्मनिर्भर दल म्हणून विकसित होत आहे, जे भारतात रचना केलेल्या, भारतातच बांधलेल्या आणि भारतीयांकडून संचलित केल्या जाणाऱ्या युद्धनौकांच्या मदतीने समृद्ध भारतासाठी सागरी सीमांचे संरक्षण करीत आहे.