एलॉन मस्क जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात ते नवीन डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट एफिशियन्सीचे नेतृत्व करीत आहेत. एलॉन मस्क अनेक गोष्टींमुळे चर्चेत आले आहेत. परंतु नुकतेच ते त्यांच्या ‘बेबी मिशन’मुळे चर्चेत आले आहेत. त्यांना चार पत्नी आहेत आणि त्या चार पत्नींपासून त्यांना १४ मुले आहेत. आता ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका वृत्तात मस्क यांनी आपला वंश वाढविण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांविषयी सांगण्यात आले आहे.
हा संपूर्ण अहवाल विशेषतः २६ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अॅशले सेंट क्लेअरवर अवलंबून आहे. अॅशले सेंट क्लेअरने सप्टेंबरमध्ये मस्क यांच्या मुलाला जन्म दिला. तिने एलॉन मस्क यांच्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. तिने दावा करीत, मस्क आपल्या प्रभाव, संपत्ती आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’चा वापर महिलांची भरती करण्यासाठी आणि मुलांची फौज तयार करण्यासाठी करीत आहे, असे उघड केले आहे. अॅशले सेंट क्लेअर नक्की काय म्हणाली? एलॉन मस्क यांचे ‘बेबी मिशन’ काय आहे? त्यांना खरंच स्वतःची फौज तयार करायची आहे का? जाणून घेऊ.

महिलेने काय खुलासा केला?
सेंट क्लेअरने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये अनेक गोष्टी उलगडल्या. तिने सांगितले की, जेव्हा ती मस्क यांच्यापासून गर्भवती झाली. तेव्हा तिला सार्वजनिकरीत्या वावरण्यास मनाई होती. त्यासाठी मस्क यांनी त्यांचे वैयक्तिक व्यवस्थापक जेरेड बिर्चल यांना तिला दोन दशलक्ष डॉलर्स खर्चासाठी देण्यास सांगितले. गेल्या सप्टेंबरमध्ये बाळंतपणासाठी रुग्णालयात असताना जेरेड बिर्चल यांनी जन्म प्रमाणपत्रातून मस्क यांचे नाव वगळण्याचीही विनंती केली. विनंतीचे पालन केल्यास तिला आर्थिक मदत करण्याचे वचन दिले.
मस्कशी असलेल्या तिच्या नात्याची माहिती गुप्त ठेवणाऱ्या एका कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यास तिला भाग पाडले गेले. असे केल्यास घर आणि रोजच्या खर्चासाठी तिला १५ दशलक्ष डॉलर्स देणार असल्याचे आणि मूल २१ वर्षांचे होईपर्यंत महिन्याला अतिरिक्त १,००,००० डॉलर्स देण्याची ऑफरही देण्यात आली, असे तिने स्पष्ट केले. तिने पुढे सांगितले की, मस्क तिच्यासारख्या महिलांना गप्प करण्यासाठी पैशाचा वापर करतात. फेब्रुवारीमध्ये तिने जेव्हा त्यांच्या नातेसंबंधांची बाब जाहीर केली. त्यानंतर तिला मस्क यांच्याकडून आर्थिक मदतीच्या स्वरूपात मिळणाऱ्या पैशांमधून ४०,००० डॉलर्स इतकी रक्कम कमी करण्यात आली आणि आता हा आकडा २०,००० डॉलर्सपर्यंत कमी करण्यात आला आहे.
तिने हेदेखील सांगितले की, वैयक्तिक व्यवस्थापक जेरेड बिर्चल यांनी तिला कुठे सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचा इशारा दिला होता. मस्क यांनी पूर्वी ज्या महिलांशी बाळंतपणासाठी संपर्क साधला होता, त्यांनी कोणताही कायदेशीर मार्ग किंवा बाहेरून मदत मागितली, तर त्यांना आर्थिक धोका निर्माण होईल, असा इशारा दिल्याचे सेंट क्लेअरने स्पष्ट केले. सेंट क्लेअर यांच्या दाव्यांना मस्क यांची माजी जोडीदार पॉप संगीतकार क्लेअर बाउचर यांनी समर्थन दिले. तिला ग्रिम्स म्हणूनदेखील ओळखले जाते. मस्क यांना तिच्यापासून तीन मुले आहेत.
मुले जन्माला महिलांना ऑफर
मस्क यांनी अनेकदा मुले जन्माला घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मुले जन्माला घालण्याबाबत मस्क खूप गंभीर आहेत. त्यांना स्वतःची १४ मुले आहेत. त्यांना पहिल्या पत्नी जस्टिन विल्सनपासून सहा मुले होती; परंतु त्यातील एका मुलाचा मृत्यू झाला. दुसरी पत्नी क्लेअर बाउचरपासून त्यांना तीन मुले आहेत. तिसरी पत्नी शिव्हॉन झिलिसपासून त्यांना चार मुले आहेत आणि सेंट क्लेअरने नुकताच आणखी एका मुलाला जन्म दिला आहे. परंतु, त्यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना याहून अधिक मुले असू शकतात. मस्क यांचा मोठा मुलगा विवियन विल्सनला एका मुलाखतीत त्याच्या सावत्र भावंडांविषयी विचारले असता, तो म्हणाला होता, ” मला प्रत्यक्षात किती भावंडं आहेत याविषयी माहीत नाही.”
मुख्य म्हणजे मस्क यांनी अनेक महिलांना बाळ जन्माला घालण्याची ऑफर दिली. त्यातीलच एक महिला म्हणजे क्रिप्टो इन्फ्लुएन्सर टिफनी फोंग. टिफनी फोंग यांना मस्क यांनी त्यांचे बाळ जन्माला घालण्याची ऑफर दिली होती. “तुला माझे मूल जन्माला घालण्यात रस आहे का,” असा प्रश्न त्यांनी संदेशाद्वारे तिला विचारला होता. मात्र, टिफनी फोंग यांनी ती ऑफर नाकारली आणि मस्क यांचा संदेश सार्वजनिक केला. त्यानंतर मस्क यांनी टिफनी फोंग यांना एक्सवरून अनफॉलो केले आणि त्यांचे उत्पन्नही घटले, असे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिले.
सेंट क्लेअरने ती गर्भवती असताना मस्क यांनी तिला पाठवलेला एक संदेशही दाखवला. त्यात त्यांनी लिहिले होते, “सर्वनाश होण्यापूर्वी तिच्या आणि मस्कमधील एक मजकूरदेखील उघड केला आहे. मस्कने सुचवले, “सर्वनाश होण्यापूर्वी सैन्य तयार करायचे असल्यास आपल्याला सरोगेट्सचा वापर करावा लागेल.” मस्क यांचा विश्वास आहे की, पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होत आहे आणि जर ही गती अशीच राहिली, तर मानवी संस्कृती नष्ट होईल. डब्ल्यूएसजेच्या अहवालात त्यांचे मित्र मार्टिन वारसाव्स्की यांनी आपले मत मांडले आहे की, “जर मुले नसतील, तर भविष्य राहणार नाही. इतर सर्व समस्या निरर्थक ठरतील”. मस्क यांनी स्वतः हा विचार अनेक वेळा मांडला आहे.