इन्स्टाग्राम आणि टिकटॉक वापरणारे तरुण सध्या कोणताही मोठा धक्का बसला किंवा अचानकपणे कोणती तरी आश्चर्यचकित करणारी घटना घडल्यावर कॉर्टिसोल मीमचा वापर करत आहेत.
रोज तासनतास आपल्या मोबाईलची स्क्रीन न थांबता स्क्रोल करणाऱ्या लाखो इन्स्टाग्राम आणि टिकटॉक वापरणार्यांमध्ये आता एक नवा ट्रेंड आला आहे. एखादे रील कसे वाटले किंवा व्हिडीओ कसा वाटला हे त्यांना जगाला सांगण्याची जणू घाईच लागलेली असते. याचसाठी आता त्यांनी नवीन मापक शोधून काढलंय, याचंच नाव ‘कॉर्टिसोल लेव्हल मीम.’ ही एक ‘रिॲक्शन इमेज’ आहे. एक साधं कॉर्टिसोल मोजणारं मापकयंत्र ज्यामधील सुई त्या व्हिडीओमुळे मनात निर्माण झालेल्या भावनांनुसार ‘कमी’ (low) किंवा ‘जास्त’ (high) पातळीवर आपोआप फिरते.
पण ‘काॅर्टिसोल स्पाईक मीम’च का?
एका उदाहरणावरून समजून घेऊयात, समजा इन्स्टाग्राम रीलमध्ये एखादी महिला कोणत्याही कारणाशिवाय विनाकारण गोंधळ घालताना दिसत असेल आणि कुणी एक पुरुष ती गोंधळ घालतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असेल… हे पाहून स्त्री संतापते आणि व्हिडीओ रेकॉर्ड करणार्यावर रागाने धाऊन जाते. त्यावेळी हा व्हिडीओ पाहणारा युजर प्रतिक्रिया देताना ‘कॉर्टिसोल मीटर’ची सुई थेट ‘हाय’ (high) वर गेलेली दाखवतो.
याउलट, समजा एखाद्या डॅशकॅम व्हिडीओमध्ये एक वाहनचालक दुसऱ्या गाडीला धडक देऊन वेगाने पळून जाताना दिसत असेल, पण अचानकपणे काही सेकंदातच वाहतूक पोलिसांनी त्याला पकडलं तर अशा व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला तोच कॉर्टिसोल मीटरच्या मीमची सुई ‘हिरव्या झोनमध्ये’ गेलेली दिसेल. यावरून हे लक्षात येतं की, हा व्हिडीओ पाहणार्याला चांगला वाटला किंवा हा व्हिडीओ पाहून युजरला बरे वाटले.
आपल्याला एकदम आनंद होतो किंवा राग येतो, अशावेळी आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा एक हार्मोन तयार होतो. याच कॉर्टिसोलला स्ट्रेस हार्मोन म्हणतात, म्हणूनच बरी-वाईट प्रतिक्रिया देताना कॉर्टिसोल कमी किंवा जास्त झाल्याचा मीम सध्या जेन-झी आणि मिलिनियल्स दोघेही वापरताना दिसतायत.
कॉर्टिसोल मीम आता ‘कम्फर्ट मीम’ बनले आहे. इन्स्टाग्राम किंवा टिकटॉकवर दिसणारी डोकेदुखीची, धक्क्याची किंवा चिंतेची परिस्थिती दाखवणारा कोणताही व्हिडीओ असो किंवा ‘इन्स्टंट कर्मा’चा प्रसंग असो; (इन्स्टंट कर्मा हा नवीन शब्द सध्याची पिढी एखाद्या कृतीचे तात्काळ फळ मिळण्याला वापरतेय.) कमेंट सेक्शनमध्ये एकही शब्द न टाईप करता फक्त साध्या ‘कॉर्टिसोल लेव्हल मीटर’चा GIF किंवा मीम जरी पाठवला तरी भावना आपोआप पोहोचतात.
हा प्रकार नेमका सुरू तरी कधी झाला?
‘नो युवर मीम’ (Know Your Meme – KYM) या संकेतस्थळानुसार, आंतर्जालावर ‘कॉर्टिसोल लेव्हल’ या शब्दाचा सर्वात पहिला ज्ञात वापर २०२५ मध्ये ‘X’ वर झाला होता असे म्हटले आहे. तेव्हा एका युजरने एका ट्विटला उत्तर देताना ‘कॉर्टिसोल स्पाईक’ (cortisol spike) अशा आशयाची प्रतिक्रिया पहिल्यांदाच दिली होती.
KYM ने नमूद केल्यानुसार, ‘२६ फेब्रुवारी २०२५ रोजी, @evristainted या ‘X’ युजरने एका अस्वस्थ प्रसंगावर ‘कॉर्टिसोल स्पाईक’ शब्दाचा वाकप्रचाराच्या स्वरूपात वापर करून एक रिॲक्शन ट्विट’ केले होते. यात त्याने तीव्र भावना व्यक्त करण्याऐवजी गमतीदारपणे व्यक्त व्हायचे ठरवले. या ट्विटमध्ये ज्या वाक्याने सर्वांचेच लक्ष वेधले ते म्हणजे, ‘माझी कॉर्टिसोल पातळी वाढवून तू माझं सौंदर्य करशील,’ तेव्हां हे वाक्य खूप प्रसिद्ध झाले होते.
हे मीम खऱ्या अर्थाने २०२५ च्या अखेरीस लोकप्रिय झाले, जेव्हा ‘गोटीस’ या यूट्यूबर आणि न्यूट्रिशन इन्फ्ल्युएंसरने काही व्हिडीओंवर अतिशय उत्साही प्रतिक्रिया दिली. या व्हिडीओचा मीम बनवून टिक-टॉकवर ‘होली कॉर्टिसोल स्पाईक’ (Holy cortisol spike) अशा कॅप्शनसह व्हायरल करण्यात आला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हजारो लाईक्स मिळाल्यामुळे हे मीम हळूहळू नेटीझन्ससाठी भावना व्यक्त करण्याचे एक मुख्य साधन म्हणून पुढे आले.
भावना मापन यंत्र : कॉर्टिसोल मीटर
या व्हायरल मीमचे अनेक प्रकार उपलब्ध असले तरी इन्स्टाग्राम आणि टिकटॉक कम्युनिटीजमध्ये (युजर्समध्ये) लोकप्रिय असलेल्या सर्वात सामान्य टेम्पलेट्सचा वापर करून भावना व्यक्त केली जाऊ शकते.
मीम्सवर विज्ञान काय म्हणतं?
मानवी शरीरासाठी कॉर्टिसोलची पातळी दीर्घकाळासाठी वाढलेली किंवा कमी असलेली, दोन्हीही चांगलं नाही. कॉर्टिसोल हे आपल्या ‘अॅड्रिनल ग्रंथींमध्ये’ तयार होणारं एक स्टेरॉइड हार्मोन आहे, जे शरीराच्या दैनंदिन कार्यांचं नियंत्रण करतं.
जेव्हा आपल्या मेंदूला एखाद्या तणावाच्या किंवा धोक्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, तेव्हा हे स्ट्रेस हार्मोनचे रक्तात वेगाने मिसळू लागते. कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीत त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी हे हार्मोन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवते आणि स्नायूंना बळकट करते, ज्यामुळे माणसाची सर्व शक्ती एकवटली जाते. थोडक्यात सांगायचे तर हे हार्मोन मानवी शरीराला ‘लढा किंवा पळा’ अशा परिस्थितीसाठी तयार करतं.
कॉर्टिसोल हे रक्तदाब, रक्तातील साखर, रोगप्रतिकारक शक्ती आणि शरीराची सूज नियंत्रित ठेवण्याचं काम करतं – हे एक चक्र आहे, ज्याची पातळी सकाळच्या वेळी सर्वात जास्त असते. शरीरात कॉर्टिसोल प्रमाण खूप जास्त झाल्यास ‘कुशिंग सिंड्रोम’चा त्रास होऊ शकतो, त्याचे प्रमाण खूप कमी झाल्यास (जसे आपण मीम्समध्ये पाहिले) ‘ॲडिसनस् आजार’ होऊ शकतो. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावाचे योग्य व्यवस्थापन केले तर शरीरातील कॉर्टिसोल पातळी संतुलित राखता येईल.
