इन्स्टाग्राम उघडलं किंवा यूट्यूब स्क्रीन की, भरमसाट रील्स आणि शॉर्ट व्हिडीओजचा भडिमार होतो. सध्या एका हातात आपले रोजचे काम आणि दुसऱ्या हातात अंगठ्याने रील्स ‘स्क्रोल’ करत राहणारी बोटं हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. सिनेमाच्या क्लिप्सपासून ते पॉडकास्टपर्यंत सगळं आता मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर उपलब्ध असतं. हे पाहायला जितकं सोपं आणि ‘convenient’ वाटतं, तितकंच ते घातक आहे.

मोबाइल आडवा करायची कटकट नाही, पुढं काय पाहावं याची निवड करायची गरज नाही. त्यामुळे मेंदूला ‘शॉट’ लावून घ्यायचीही गरज नाही. अल्गोरिदम जे डोळ्यांसमोर आणेल ते पाहायचं, जे बघावंसं वाटणार नाही ते पुढे स्क्रोल करायचं; स्क्रोल करायला फुरसत नसेल तरी ३० सेकंदांनी पुढचा ‘कन्टेन्ट’ डोळ्यांच्या समोर हजर! 

पण हा ‘झटपट पटापट मिळणारा विरंगुळा’ तुमचे डोळे आणि मेंदू यांची कशी वाट लावतो याबाबत मुंबईतील डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या नेत्रतज्ज्ञ डॉ. मीनल कान्हेरे यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे. हा धोका नक्की कसला आणि याच्यावर उपाय काय हे पुढे सविस्तर जाणून घेऊया. 

जेव्हा डोळे विसरतात, ‘पापणी लवणे’…!

छोट्या स्क्रीनवर लागोपाठ येणार हा मजकूर आपल्या डोळ्यांना संपूर्णपणे गुंतवून ठेवतो. त्यामुळे काय होत असेल?

आपण जेव्हा डोळ्यांच्या अगदी जवळ ही भडक प्रकाशाची स्क्रीन ठेवतो तेव्हा आपण नकळतपणे डोळे मिचकवायलाही विसरून जातो. मग त्यामुळे डोळे कोरडे पडतात, जळजळतात आणि डोकेदुखी सुरू होते.
सतत जवळचं दृश्य पाहिल्यामुळे लांबच्या गोष्टी पाहण्याची सवय डोळ्यांना राहत नाही. त्यामुळे डोळ्यांची लांबची नजर कमकुवत होते, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘मायोपिया’, असे म्हणतात. मान वाकवून, खांदे पाडून, आडवं होऊन मोबाईल पाहणं, अशा वेड्यावाकड्या शारीरिक हालचालींमुळे शरीराला त्रास होतो.  त्यामुळे अवयवांवर ताण येतो, मणक्याचा त्रास, हाताला येणारा बधिरपणा, मानेकडचं मास वाढणं असे अनेक त्रास सुरू होतात.

मेंदूचा ‘सेन्सर ओव्हरलोड’ आणि ढासळती एकाग्रता

३० सेकंदांच्या या शॉर्ट व्हिडीओजमध्ये भडक रंगांचा वापर, एआय निर्मित कन्टेन्ट धडाधड बदलणारे सीन्स, डायलॉग्सची वाढवलेली गती व कानठळ्या बसवणारे साऊंड इफेक्ट्स यांमुळे आपला मेंदू एका वेगळ्याच चक्रात अडकतो. डॉ. कान्हेरे याला ‘सेन्सर ओव्हरलोड’, असे म्हणतात. याचा फटका थेट आपल्या मेंदूला बसतो. मेंदू सततच्या माहितीने इतका थकून जातो की, माणसाची चिडचिड होते आणि त्याची एकाग्रता कमालीची ढासळते. 

तुम्ही ‘व्हिज्युअली उतावीळ’ होताय  का?

सतत कमी वेळाच्या रील्स पाहून आपल्या डोळे आणि मेंदूला प्रत्येक पाच सेकंदांनंतर काहीतरी नवीन आणि नाट्यमय गोष्ट पाहायची सवय लागते. याचा परिणाम असा होतो की, जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतो किंवा अभ्यासाला बसतो तेव्हा आपल्याला ती संथ गती सहन होत नाही. परिणामी आपली ‘ग्रास्पिंग कॅपॅसिटी’ कमी होत जाते. आपल्याला जे समजून घ्यायचं आहे, ते त्वरित आपल्या मेंदूला समजायला हवं याची घाई आपण करतो. त्यामुळे तासन् तास एका जागी बसून वाचन करणं हे अवघड होऊन बसतं. 

डोळ्यांचा ‘स्क्रीन टाईम’ कसा सुधारावा?

या डिजिटल आजाराच्या त्रासाची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने डॉ. कान्हेरे यांनी सांगितलेले उपाय खालीलप्रमाणे:

  • २०-२०-२० चा नियम : स्क्रीनवर काम करताना किंवा रील्स पाहताना दर २० मिनिटांनी २० सेकंदांचा ब्रेक घेऊन २० फूट लांब असलेल्या एखाद्या गोष्टीकडे पाहा. त्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो.
  • जाणीवपूर्वक डोळे वारंवार मिचकवा 
  • रात्री झोपण्याच्या किमान एक तास आधी मोबाईल पूर्णपणे दूर ठेवा. 
  • एखादी गोष्ट केवळ मनोरंजन किंवा माहितीसाठी हवी असेल, तर व्हिडीओ पाहण्याऐवजी ‘पॉडकास्ट’ किंवा ऑडिओ बुक्स ऐकण्याची सवय लावा, जेणेकरून मनोरंजनाबरोबरच डोळ्यांनाही विश्रांती मिळेल.