How Insulin afeect Blood Sugar : आपण जे खातो, त्यातून शरीराला ऊर्जा मिळते आणि ही ऊर्जा पेशींपर्यंत पोहोचवण्यात इन्सुलिनची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, प्रत्येकाच्या शरीरात इन्सुलिनबाबत एकसारखे बदल होत नाहीत. काही लोकांच्या शरीरातील पेशी इन्सुलिनला कमी प्रतिसाद देऊ लागतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वादुपिंडाला जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. तर काही लोकांमध्ये काळानुसार स्वादुपिंडाची पुरेसं इन्सुलिन तयार करण्याची क्षमता कमी होत जाते.
प्रत्येकाच्या शरीरात रक्तातील साखर वाढण्यामागे केवळ इन्सुलिनची कमतरताच कारणीभूत नसते. काही जणांमध्ये शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देणं कमी करतं; तर काही जणांमध्ये शरीराला पुरेसं इन्सुलिन तयार करणंच कठीण जातं.
इन्सुलिनची कमतरता आणि इन्सुलिन रेझिस्टन्स या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित असल्या तरी त्या एकसारख्या नाहीत. एखाद्या व्यक्तीमध्ये दोन्ही समस्या एकाच वेळीही असू शकतात. त्याशिवाय काळानुसार शरीरातील हे संतुलन बदलू शकतं. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सारखी असलेल्या दोन व्यक्तींमध्येही इन्सुलिनशी संबंधित समस्या आणि शरीरातील चयापचयाची स्थिती वेगवेगळी असू शकते.
मग एखाद्या व्यक्तीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स जास्त का निर्माण होतो; तर काहींच्या शरीरात इन्सुलिन तयार करण्याची क्षमता हळूहळू का कमी होते? त्यामागे नेमके कोणते घटक काम करतात? याचा आहार, जीवनशैली, शरीरातील चरबी आणि आनुवंशिकतेशी काय संबंध आहे? तसेच, काळानुसार रक्तातील साखर नियंत्रणावर याचा काय परिणाम होतो? याबद्दल तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
काहींमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स, तर काहींमध्ये इन्सुलिनची कमतरता का निर्माण होते?
साखरेशी संबंधित समस्या एकाच पद्धतीने निर्माण होत नाहीत. शरीरातील नेमकी कोणती प्रक्रिया बिघडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. कन्सल्टंट डाएटिशियन व डायबेटीस एज्युकेटर कनिका मल्होत्रा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, इन्सुलिन रेझिस्टन्समध्ये शरीरातील स्नायू, यकृत आणि चरबीच्या पेशी इन्सुलिनला योग्य तसा प्रतिसाद देत नाहीत. पोटाभोवती साचलेली अतिरिक्त चरबी शरीरात दाह निर्माण करणारे घटक सोडू शकते. त्यामुळे इन्सुलिनच्या प्रक्रियेत अडथळा येतो.
दुसरीकडे काही लोकांमध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींची कार्यक्षमता हळूहळू कमी होते. त्या पेशी स्वादुपिंडात असतात आणि इन्सुलिन तयार करतात. आनुवंशिकता आणि पेशींवर दीर्घकाळ येणारा ताण यांमुळे या पेशींचं कार्य कमी होऊ शकतं.
मल्होत्रा पुढे सांगतात की, बहुतेक लोकांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आणि इन्सुलिन तयार होण्याची क्षमता कमी होणं, या दोन्ही समस्या काही प्रमाणात असतात. मात्र, कोणती समस्या अधिक प्रभावी ठरेल, हे आनुवंशिकतेनुसार ठरतं. इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्या व्यक्तीच्या शरीरात बीटा पेशी चांगल्या प्रकारे काम करत असतील, तर स्वादुपिंड अधिक इन्सुलिन तयार करून, काही वर्षं चांगल्या प्रकारे प्रतिकार करू शकतं. मात्र, बीटा पेशींची क्षमता कमी असेल, तर इन्सुलिनची कमतरता लवकर जाणवू शकते. त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी होऊन रक्तातील साखरेचं संतुलन बिघडू शकतं.
आनुवंशिकता आणि जीवनशैलीचा इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींवर कसा परिणाम होतो?
इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा पेशींवर त्यांच्या सभोवतालच्या अनेक घटकांचा अनेकदा तत्काळ परिणाम होत असतो. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात किती बीटा पेशी असतील आणि त्या किती काळ चांगल्या प्रकारे इन्सुलिन तयार करू शकतील, हे आनुवंशिकतेनुसार ठरू शकतं. त्यामुळे काही लोकांमध्ये बीटा पेशी इन्सुलिन तयार करण्याची क्षमता दीर्घकाळ टिकून ठेवतात; तर काही लोकांमध्ये ही क्षमता तुलनेनं लवकर कमी होऊ शकते.
वयानुसार बीटा पेशींची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ शकते. त्यासोबतच पोटाभोवती साचलेली चरबीही बीटा पेशींवर परिणाम करू शकते. दक्षिण आशियाई लोकांमध्ये बीएमआय कमी असतानाही पोटाभोवती चरबी साचण्याची शक्यता अधिक असते. या चरबीमधून तयार होणारे काही घटक बीटा पेशींचं काम बिघडवू शकतात.
तसेच, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ वारंवार खाल्ल्यानं शरीराला वारंवार जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं. त्याचा बीटा पेशींवर ताण येऊ शकतो. त्याउलट नियमित शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते आणि शरीराला जास्त इन्सुलिन तयार करण्याची गरज कमी होते.
मल्होत्रा सांगतात की, सारखाच आहार घेणाऱ्या दोन व्यक्तींमध्येही मधुमेहाचा धोका वेगळा असू शकतो. एका व्यक्तीच्या बीटा पेशी आनुवंशिकतेमुळे आणि चांगल्या स्नायूंच्या वस्तुमानामुळे अधिक सक्षम असू शकतात; तर दुसऱ्या व्यक्तीच्या बीटा पेशींवर आधीपासूनच अधिक ताण असू शकतो. त्यामुळे आनुवंशिकता आणि जीवनशैली या दोन्हींच्या एकत्रित परिणामामुळे इन्सुलिनची पातळी कशी प्रभावित होते, यावर मधुमेह कोणाला लवकर होणार हे ठरतं.
