Intermittent fasting risks older people: आपल्या घरात आजी-आजोबा किंवा आई-वडील यांचा नेहमीचा एक डायलॉग ठरलेला असतो, “कामं होत राहतील आधी वेळेवर खाऊन घे.” आपल्या संस्कृतीत वेळेवर जेवण्याला, पोटाची भूक शांत करण्याला फार महत्त्व दिलं जातं. अवेळी अरबट चरबट खाणं किंवा काही ठराविक गोष्टीच खाणं हे अनेकदा आपल्या शरीरालाही पचत नाही. मात्र, आजच्या धावपळीच्या जगात आपली जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. सकाळी लोकल पकडण्याच्या गडबडीत नाश्ता सोडणं, ऑफिसच्या कामाच्या व्यापात दुपारचं जेवण थेट संध्याकाळी करणं आणि रात्री उशिरा जेवणं ही महाराष्ट्रातील नोकरदार वर्गाची रोजची सवय झाली आहे.
दुसऱ्या बाजूला, वजन कमी करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आजकाल ‘इंटरमिटंट फास्टिंग’ (Intermittent Fasting) किंवा १४ ते १६ तास काहीही न खाण्याचा ट्रेंड प्रचंड वाढला आहे. अनेक लोक वयाच्या ५०-६० व्या वर्षीही अशा डाएटचं आंधळेपणाने अनुकरण करताना दिसतात. मात्र, दोन जेवणांमध्ये तासनतास भुकेलं राहणं खरोखरच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? आंतरराष्ट्रीय वैद्यकीय विश्वात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनाने यावर अत्यंत धक्कादायक आणि डोळे उघडणारा निष्कर्ष मांडला आहे. आता स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केलेल्या एका नव्या अभ्यासाने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
अभ्यास कसा झाला?
हे संशोधन ‘जर्नल ऑफ इंटर्नल मेडिसिन’ या नियतकालिकात नुकतंच प्रकाशित झालं आहे. यासाठी संशोधकांनी स्वीडनमधील स्टॉकहोम शहरात सुरू असलेल्या ‘स्नॅक-के’ (SNAC-K) या दीर्घकालीन अभ्यासाचा आधार घेतला. या अभ्यासासाठी सुरुवातीला वय वर्षे ६० आणि त्याहून अधिक वय असलेल्या २,९८१ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. या सर्व सहभागींच्या आरोग्याचा पाठपुरावा तब्बल १५ वर्षे करण्यात आला. ७८ वर्षांखालील सहभागींची दर सहा वर्षांनी, तर ७८ वर्षांवरील सहभागींची दर तीन वर्षांनी तपासणी करण्यात आली, कारण या वयात आरोग्यात बदल अधिक वेगाने होतात. सहभागी दिवसभरात कोणकोणत्या वेळी जेवतात याची माहिती त्यांच्याकडूनच नोंदवून घेतली गेली आणि त्याआधारे प्रत्येकाच्या रोजच्या सर्वांत मोठ्या उपाशी कालावधीचा अंदाज बांधण्यात आला. यानंतर हृदयविकार, मेंदू व मानसिक आरोग्याचे आजार, तसेच हाडे-सांधे यांच्याशी संबंधित आजार धरून एकूण ६० प्रकारच्या दीर्घकालीन आजारांच्या नोंदींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला.
संशोधनात नेमकं काय आढळलं?
संशोधकांनी सहभागींना त्यांच्या रोजच्या सर्वाधिक उपाशी कालावधीनुसार चार समान गटांत विभागलं होतं:
- सहा ते साडेअकरा तास
- साडेअकरा ते साडेबारा तास
- साडेबारा ते चौदा तास
- चौदा ते चोवीस तास
यातील निष्कर्ष असं सांगतात की, ज्या व्यक्ती रोज सर्वाधिक म्हणजे १४ ते २४ तास उपाशी राहत होत्या, त्यांच्यामध्ये दीर्घकालीन आजार, सर्वात कमी उपाशी राहणाऱ्या गटाच्या (सहा ते साडेअकरा तास) तुलनेत लक्षणीयरीत्या वेगाने वाढल्याचे दिसून आले. हा संबंध विशेषतः दोन प्रकारच्या आजारांत ठळकपणे दिसला; हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार आणि मेंदू व मानसिक आरोग्याशी संबंधित आजार. मात्र, हाडे-सांधे यांच्याशी संबंधित आजारांमध्ये असा कोणताही स्पष्ट संबंध आढळला नाही ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. शिवाय हा परिणाम सर्व वयोगटांत सारखा नव्हता. ७८ वर्षांखालील ज्येष्ठांच्या तुलनेत ७८ वर्षांवरील अतिवृद्ध व्यक्तींमध्ये हा संबंध अधिक स्पष्टपणे आणि सातत्याने दिसून आला, म्हणजेच वय जसजसं वाढतं, तसतसं शरीर दीर्घकाळ उपाशी राहण्याला वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देत असावं.
या संशोधनाचे प्रमुख संशोधक आणि कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील Adrián Carballo-Casla सांगतात की,
“आतापर्यंत उपवासावरील बहुतांश संशोधन तरुण किंवा मध्यमवयीन लोकसंख्येवर झालं आहे. आमचे निष्कर्ष असे सुचवतात की वृद्धांमध्ये, विशेषतः सर्वाधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये हे परिणाम वेगळे असू शकतात.”
यामागील संभाव्य कारणं कोणती?
वरील निष्कर्षांमागे नेमकी कोणती कारणं दडली असावीत, याबद्दल संशोधकांनी काही शक्य कारणं सुचवली आहेत; मात्र ती अद्याप सिद्ध झालेली नाहीत, हे आपण लक्षात ठेवायला हवं. वयानुसार स्नायूंची प्रथिने वापरण्याची क्षमता कमी होत जाते, त्यामुळे दिवसभरात ठरावीक अंतराने प्रथिनेयुक्त आहार मिळाला नाही तर स्नायू कमी होण्याचा (सार्कोपेनिया) धोका वाढू शकतो. आधीच्या अभ्यासांनी स्नायू कमी होण्याचा संबंध हृदयविकार आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांशी जोडलेला आहे. याशिवाय अनेक वृद्ध व्यक्ती नियमित औषधं घेत असतात आणि काही औषधं अन्नासोबत घेतल्यासच नीट शोषली जातात किंवा त्यांचे दुष्परिणाम कमी होतात. दोन जेवणातील मोठ्या अंतरामुळे औषधांच्या परिणामकारकतेवर आणि ब्लड शुगरच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ उपाशी राहणाऱ्या सहभागींमध्ये आधीच कमी ऊर्जा व प्रथिने घेण्याची, कमी वेळा जेवण्याचे आणि व्यायाम कमी करण्याचे प्रमाणही अधिक आढळले, त्यामुळे कुपोषणाचा धोकाही यामागे असू शकतो, असं संशोधकांना वाटतं. मात्र, संशोधकांनी स्वतःच स्पष्ट केलं आहे की ही सर्व कारणे केवळ तर्कसंगत शक्यता आहेत; हा अभ्यास मुळात या जैविक कारणांची पडताळणी करण्यासाठी रचलेला नव्हता.
संशोधन काय सिद्ध करत नाही?
हे संशोधन ‘निरीक्षणात्मक’ (observational) स्वरूपाचं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. यातून केवळ संबंध (association) दिसून येतो; उपाशी राहिल्यामुळेच हे आजार होतात असं हे संशोधन सिद्ध करत नाही. दीर्घकाळ उपाशी राहणाऱ्या व्यक्ती आधीपासूनच अधिक वयस्कर, कमी सक्रिय आणि तुलनेने अधिक आजारी असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे जेवणाच्या वेळांबाबतची माहिती जवळपास दोन दशकांपूर्वी नोंदवली गेली होती आणि तेव्हापासून खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या असू शकतात. हे निष्कर्ष मुख्यत्वे स्वीडनमधील शहरी वृद्धांवर आधारित असल्याने, तरुण व्यक्ती, ग्रामीण भाग किंवा इतर देश व संस्कृतींतील लोकांसाठी तेच निष्कर्ष तंतोतंत लागू होतील असं ठामपणे सांगता येत नाही.
“वृद्धांसाठी उपाशी राहण्याचा कोणताही एक ‘आदर्श’ कालावधी सुचवता येत नाही. त्याऐवजी वय, पोषणविषयक गरजा, औषधोपचार आणि आधीचे आजार लक्षात घेऊनच उपवासाबाबत सल्ला दिला जायला हवा”
असं Carballo-Casla यांनी नमूद केलं आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणीही आपला उपवास अचानक बंद करू नये किंवा नव्याने सुरूही करू नये.
या संशोधनातून काय कळलं?
या संशोधनाचा एकत्रित अर्थ असा आहे की, वृद्धांसाठी ‘किती तास उपाशी राहावं’ याचं कोणतंही एक ठरावीक आणि सर्वांना लागू पडणारं उत्तर नाही. वय, औषधोपचार, पोषणाची गरज आणि आधीचे आजार यांचा विचार करूनच उपवासाबाबत निर्णय घ्यायला हवा. तरुणपणी फायदेशीर ठरणारी एखादी सवय वृद्धापकाळात तितकीच सुरक्षित असेलच असं नाही, त्यामुळे वृद्धांसाठी आहाराचं नियोजित वेळापत्रक आणि पुरेसं पोषण हे तितकंच महत्त्वाचं असू शकतं, जितकं उपवासाचे संभाव्य फायदे मानले जातात.
