History of yoga in India: भारतीय संस्कृतीने प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला आहे. त्याचेच उत्तम उदाहरण म्हणजे योगशास्त्र. योगशास्त्राचे मूळ हे भारतीय आहे. योग हा शब्द ‘युज’ या संस्कृत शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ जोडणे असा होतो. आद्य व्याकरणकार महर्षी पाणिनी यांनी योग या शब्दाचे संयोग, संयमन व समाधी असे तीन अर्थ सांगितले आहेत. महर्षी व्यास यांनीही योगाचा अर्थ समाधी असाच सांगितला आहे. जीवात्मा व परमात्मा यांना जोडणे किंवा एकत्र आणणे अशा अर्थी तो योगशास्त्रात वापरला जातो.
पुरावे ५००० वर्षे जुने
महर्षी पतंजलींनी या शास्त्राची मांडणी केली. पातंजल योगसूत्रात ‘यमनियमासन- प्राणायाम- प्रत्यहारधारणाध्यान समाधयोऽष्टांगानि’ असा उल्लेख आहे. त्यापैकी यम, नियम, आसन आणि प्राणायाम ही पहिली चार अंगे शरीरासंबंधी असल्यामुळे त्यांचा शरीरस्वास्थ्याशी, तर उरलेल्यांचा मनःस्वास्थ्याशी संबंध येतो. यम , नियम, आसन आणि प्राणायामाचे उल्लेख प्राचीन वाङ्मयात येतात त्यामुळे या शास्त्राचे प्राचीनत्त्व ठरवण्यास मदतच होते. पुरातत्त्वीय पुरावे या शास्त्राचे पुरावे तब्बल ५००० वर्ष प्राचीन असल्याचे दाखवून देतात.
सिंधू किंवा हडप्पा संस्कृती
जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणजे सिंधू किंवा हडप्पा संस्कृती. भारतीय इतिहासातील नागरीकरणाचा आद्य टप्पा. या संस्कृतीच्या पुरावशेषांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या समृद्धीची कल्पना येते. सिंधू संस्कृतीतील मृण्मय मुद्रा याच समृद्धीची साक्ष देतात. या मुद्रांवर अनेक प्रकारचे प्रसंग कोरलेले आहेत. एका प्रसंगात, एक महिला एकाच वेळी दोन वाघांना वश करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसऱ्या कथेत दोन पुरुष बाभळीची झाडे उपटत आहेत आणि एक महिला त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. या मुद्रांवरील दृश्य सूचित करतात की, महिलांची प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींच्या पालनपोषणात महत्त्वाची भूमिका होती (प्राण्यांची शिकार करण्याऐवजी त्यांना वश करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही यातून दिसते).
हडप्पातील योगमुद्रा
काही मुद्रा योगींशी संबंधित आहेत. एका मुद्रेवर, ध्यानमग्न अवस्थेत बसलेली एक व्यक्ती योगमुद्रेत आहे आणि तिच्या आजूबाजूला खूप गोंधळ सुरू असूनही ती पूर्णतः अनभिज्ञ आहे. तिच्या सभोवती वन्य प्राणी आहेत, तरीही ती व्यक्ती स्थितप्रज्ञ आहे. त्या व्यक्ती जवळच दुसरी व्यक्ती एका म्हशीला भोसकत आहे, तरीही योगी विचलित झालेला नाही; तो पूर्णतः ध्यानात विलिन आहे. दुसऱ्या एका मुद्रेवर दोन गुडघ्यावर बसलेली माणसं योगमुद्रेत बसलेल्या व्यक्तीला काहीतरी अर्पण करताना दाखवली आहेत. ही गुडघ्यावर बसलेली माणसं महत्त्वाची व्यक्तिमत्त्वं असावीत, कारण त्यांच्या डोक्यावर दोन साप फणा उभारून आहेत.
पशुपती मुद्रा
मोहेन्जोदारो येथील सर्वात प्रसिद्ध मुद्रा म्हणजे पशुपतीची आहे. यात योगमुद्रेत असलेल्या व्यक्तीने शिंगांचा मुकुट धारण केलेला आहे, तीन चेहरे असलेली ही व्यक्ति ध्यानस्थितीत बसलेली आहे आणि तिच्या सभोवती सिंह, हत्ती, म्हैस यांसारखे सिंधू संस्कृतीतील प्राणी आहेत. ‘पशुपती’ हा रुद्राशी संबंधित आहे. शिवाला पंचमुखी मानले जाते. त्यापैकी तीन चेहरे पशुपती मुद्रेवर दिसतात.

सिंधू संस्कृती आणि योग
अनेक सिंधुकालीन मृण्मयमुद्रांवर योगमुद्रेत बसलेल्या व्यक्ती दाखवलेल्या आहेत, त्यामुळे सिंधू संस्कृतीच्या काळात योग अस्तित्वात होता, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या मृण्मय मुद्रांवरील आकृती ध्यानमग्न आहेत. त्यांच्या सभोवती चाललेल्या शिकारीच्या गोंधळामुळे त्या अजिबात विचलित होत नाहीत, तसेच जवळ येणाऱ्या प्राणी किंवा माणसांकडूनही त्यांचे लक्ष विचलित होत नाही. त्यामुळे या मुद्रा तयार करणारे लोक योगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील नवशिके प्रयोगकर्ते असावेत, असे वाटत नाही. या योगसाधकांनी आधीच योगसाधनेत कौशल्य प्राप्त केले होते आणि त्यामुळेच त्यांच्याबद्दल आदराची भावना होती आणि ते त्यांच्या मानसिक एकाग्रतेच्या शक्तीसाठी प्रसिद्ध होते.
सिंधू संस्कृती पूर्वीच योग अस्तित्त्वात
एकुणातच योगाची उत्पत्ती सिंधू संस्कृतीच्या मृण्मय मुद्रांपुर्वीच झाली असावी. मेहरगढ हे सिंधू संस्कृतीच्या आद्य कालखंडाचे प्रतिनिधित्त्व करणारे स्थळ आहे. या स्थळावरील सिंधू संस्कृतीचा विकास इ.स.पू. ७००० ते २८०० या काळात झाला. परंतु, या स्थळावर पुरातत्त्वज्ञांना योगमुद्रेत बसलेल्या कोणत्याही आकृती सापडल्या नाहीत. याशिवाय, सिंधू संस्कृतीला समकालीन असलेल्या मेसोपोटेमिया आणि पर्शियन संस्कृतीतही योगमुद्रेत बसलेल्या कोणत्याही व्यक्तींच्या आकृती नाहीत.
पातंजली आणि योग
सिंधू संस्कृतीतील शहरे नष्ट झालेली असली, तरी योग जिवंत राहिला आणि पुढे पातंजली यांनी त्यांच्या योगसूत्रांमध्ये त्याचे औपचारिक स्वरूप दिले आहे. पातंजलींचा काळ साधारणतः इ.स.पू. पहिल्या शतकात मानला जातो. पातंजलींसाठी योग हा केवळ विविध शारीरिक आसनांपुरता मर्यादित नव्हता. त्यात मानसिक आणि शारीरिक दोन्ही पैलूंचा समावेश होता. यात ध्यान, प्राणायाम आणि स्वत:ला व इतरांना स्वीकारण्यासारख्या अंतर्मुख साधनांचाही समावेश होता. पातंजलींच्यानुसार, योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध करणे होय.
योगशास्त्र
नंतरच्या वाङ्मयात योगशास्त्राचा वारंवार उल्लेख येतो. इ.स. ६ व्या शतकातील भरावी लिखित महाकाव्य किरातार्जुनीयमध्ये अर्जुनाला वीर म्हणून दाखवले आहे, केवळ युद्धकौशल्यामुळे नव्हे, तर त्याच्या ध्यानधारणेतील सामर्थ्यामुळे तो प्रसिद्ध आहे. या महाकाव्याच्या सहाव्या सर्गात वर्णन केले आहे की, अर्जुनाच्या ध्यानामुळे पर्वतावरच्या जंगलातील रानटी प्राणीही शांत झाले, कारण त्याच्या ध्यानाच्या प्रभावामुळे परिसरात एक शांतीची अनुभूती निर्माण झाली.

सिंधू संस्कृतीपेक्षाही प्राचीन…
योग हा सिंधू संस्कृतीपेक्षाही प्राचीन आहे. म्हणजेच तो किमान ५,००० वर्षांपासून अस्तित्वात आहे. आपली अनेक प्राचीन कौशल्यं धातुकामातील कौशल्य, नगररचना तंत्र आणि चरक व सुश्रुत संहितांमधून दिसणारे शस्त्रक्रियेचे प्रगत ज्ञान यांसारखी कौशल्यं काळाच्या ओघात लुप्त झाली. मात्र योग हे एकमेव असे प्राचीन तंत्र आहे जे उत्क्रांत होत गेले आणि इतर देशांमध्येही पसरले. मग तो आसनांचा अभ्यास असो, ध्यान असो किंवा प्राणायाम. आज भारतात आणि जगभरात योगप्रेमी प्रतिवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत असताना, या दीर्घकालीन आणि टिकाऊ परंपरेचा अभिमानाने आनंद घेऊ शकतात.