Investment In Real Estate: स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी सध्या बाजारात वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मिश्र वापराची मालमत्ता, उपयोग करण्यासाठी विकसित केलेली मालमत्ता यासारख्या स्थावर मालमत्तां मध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला , त्या कालावधीमध्ये सर्वसामान्यत: लोकप्रिय असलेल्या गुंतवणुकीच्या पलीकडे जाऊन, वेगळ्या ठिकाणी किंवा निराळ्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. ती गुंतवणूक आपल्याला भविष्यकाळात फार मोठा परतावा देऊ शकते .
१. मिश्र वापराची मालमत्ता:
या प्रकारच्या मालमत्तेमध्ये निवासासाठी वापरली जाणारी घरे किंवा सदनिका आणि व्यवसायासाठी वापरली दुकाने किंवा शोरूम्स एकाच इमारतींच्या एकाच संकुलात बांधलेले असतात . कधी कधी त्याच संकुलामध्येमध्ये औद्योगिक उत्पादनासाठी वापरले जाणारे गाळेसुद्धा उपलब्ध करून दिलेले असतात .
फायदे
- अ . या प्रकारच्या संकुलामध्ये गुंतवणूक केल्यास आपण आपल्या प्राधान्य क्रमाप्रमाणे , निवासी भाडेकरूंकडून स्थिर किंवा व्यावसायिक भाडेकरूंकडून जास्त उत्पन्न मिळवू शकतो .
- ब. विविध प्रकारच्या मालमत्ता एकाच संकुलात असल्याने येथील घरांना किंवा दुकानांना सतत मागणी असते. त्यामुळे उत्पन्न खंडित होण्याची शक्यता कमी असते.
- क . या प्रकारच्या संकुलांच्या व्यवस्थापनासाठी व्यावसायिक कर्मचारी नियुक्त केलेले असतात. त्यामुळे मालमत्तेची देखरेख करण सोपं होतं .
जोखीम
- अ . या संकुलाचे आकारमान मोठे आणि रचना गुंतागुंतीचीअसते. त्यामुळे इथे गुंतवणूक करण्यासाठी अधिक भांडवल लागते.
- ब . निवासी , व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्ता वापरणाऱ्या लोकांना एकमेकांच्या कार्यपद्धतीमुळे असुविधा निर्माण होते. त्यातून काही प्रमाणात संघर्ष निर्माण होऊ शकतो.
- क. निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक गाळ्यांना लागू असणारे सरकारी नियम आणि परवाने वेगवेगळे असतात. त्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागतो .
दूरदृष्टी असेल तर विकासाचे फायदे
सामान्यतः, औद्योगिक स्थावर मालमत्ता, मोकळी जागा किंवा मिश्र उपयोग करण्यासाठी विकसित केलेली मालमत्ता यासारख्या स्थावर मालमत्ता यामध्ये केलेली गुंतवणूक त्या शहर किंवा गावाच्या पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास यामध्ये केलेली गुंतवणूक ठरते. ही गुंतवणूक जर सखोल अभ्यास करून आणि दूरदृष्टी ठेऊन केली तर त्या विकासाचे थेट फायदे आपल्याला मिळतात. विचारपूर्वक केलेल्या या गुंतवणुकींमधून मूळ गुंतवणुकीपेक्षा कितीतरी पट जास्त परतवा मिळतो.
२. स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्त निधी (रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट – REIT):
या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना कोणतीही मालमत्ता प्रत्यक्ष विकत घ्यावी लागत नाही . यामध्ये आपण आपल्याला स्थावर मालमत्तेमध्ये जितकी गुंतवणूक करायची आहे तितकी रक्कम स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्त निधी या संस्थेकडे सोपवतो . ती संस्था मग आपला निधी वेगवेगळ्या स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवते . त्यानंतर स्थावर मालमत्ता विश्वस्त निधी ही संस्था त्यांना मिळालेला वार्षिक नफा आणि आपण त्यामध्ये गुंतवलेली रक्कम यांचे गणित मांडून आपल्याला त्या नफ्यातील आपला वाटा देते . स्थावर मालमत्ता विश्वस्त निधी त्यांचे सर्व करप्राप्त उत्पन्न गुतवणूकदारांमध्ये वितरीत करणे हे त्या संस्थेवर बंधनकारक असते. त्याच बरोबर, तिचे सर्व हिशोब गुंतवणूकदारांसमोर पारदर्शक पद्धतीने मांडणे संस्थेसाठी आवश्यक असते.
फायदे
- अ . कोणतीही मालमत्ता पूर्ण आणि प्रत्यक्ष विकत घ्यायची नसल्यामुळे अतिशय कमी भांडवलामध्येसुद्धा स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणूक करता येते.
- ब . स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्त निधी शेअर बाजारात सूचीबद्ध असतो. आपल्या गुंतवणुकीचे समभाग आपल्याला मिळतात. ते समभाग शेअर बाजारात सहजतेने विकले जाऊ शकतात. त्यामुळे तातडीची गरज असेल तर आपण आपल्या गुंतवणुकीतून रोख पैसे सहजतेने उभे करू शकतो.
- क. निवासी, व्यावसायिक औद्योगिक अशा विविध प्रकारच्या मालमत्तांमध्ये आपले पैसे गुंतवले जातात. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीला वैविध्याचे लाभ मिळू शकतात.
- ड . आपण विश्वस्त निधीकडे दिलेले पैसे गुंतवण्यासाठी विश्वस्त निधीने कुशल व्यावसायिक तज्ज्ञ नेमलेले असतात. त्यामुळे गुंतवणुकीमधून आपल्याला बहुतेक वेळेस फायदाच मिळतो.
जोखीम
- अ. आपल्याला मिळणारा परतावा हा पूर्णपणे विश्वस्त निधीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. संस्थेने एखादा चुकीचा निर्णय घेतला तर आपल्याला नुकसान भोगावे लागू शकते.
- ब. बदलत्या करप्रणालीनुसार आपल्या नफ्यामध्ये मोठ्याप्रमाणात चढ -उतार येतात.
- क . शेअर बाजारात होत असलेले स्थावर मालमत्तेतच्या समभागातील चढ -उतार आपल्या समभागांच्या किमतीवर थेट परिणाम करतात. समभागांच मूल्य कमी झालेलं असतानाच काही कारणपरत्वे आपल्याला ते विकावे लागले तर नुकसान सहन करावं लागतं
३. स्थावर मालमत्ता समूह निधी किंवा क्राउड फंडिंग :
जेव्हा एखाद्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी अनेक लोकांकडून पैसे घेऊन उभा केला जातो तेव्हा त्या निधीला समूहनिधी किंवा क्राउड फंडिंग म्हणतात. हा निधी बहुतेक वेळेस इंटरनेटच्या माध्यमातून उभारला जातो. भारतामध्ये आता रिअल इस्टेट उद्योगामध्ये क्राऊडफंडिंग लोकप्रिय होऊ लागले आहे. क्राऊडफंडींगमुळे, सामान्य गुंतवणूकदाराला सुद्धा, रियल इस्टेटमधील मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पांमध्ये आपली स्वतःची लहान- मोठी गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होते.
फायदे
- अ . मालमत्तेच्या मोठ्या प्रकल्पांमध्ये पूर्वी फक्त मोठे गुंतवणूकदार गुंतवणूक करु शकत. क्राउडफंडिंगमुळे आता मध्यम किंवा लहान गुंतवणूकदाराला सुद्धा अशा प्रकल्पात गुंतवणूक करता येते
- ब . मालमत्तेच्या, पायभूत सुविधांसारख्या महाकाय प्रकल्पांपासून औद्योगिक संकुल आणि निवासी इमारतींसारख्या विविध प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून आपल्या गुंतवणुकीमध्ये वैविध्य आणण्याची संधी उपलब्ध होते.
- क. गुंतवणूक डिजिटल पद्धतीने होत असल्याने ती सहजतेनेकरता येते.
- ड. योग्य प्रकल्प निवडल्यास अल्प गुंतववणुकीतून सुद्धा मोठा परतावा मिळतो.
जोखीम
- अ . प्रकल्पातून मिळणारा फायदा हा पूर्णपणे त्या प्रकल्पाचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या क्षमता आणि कौशल्यावर अवलंबून असतो. कंपनीच्या एखाद्या चुकीमुळे प्रकल्प तोट्यात जाऊ शकतो. त्याचे परिणाम सर्वच लहान -मोठ्या गुंतवणूकदारांना भोगावे लागतात .
- ब . प्रकल्प रखडल्यास किंवा पूर्ण न झाल्यास परताव्याचे प्रमाण कमी होते किंवा मोठे नुकसानसुद्धा होऊ शकते .
- क. भारतांमध्ये क्राउड फंडींगच्या नियमांची चौकट अजून निश्चित झालेली नाही . त्याचा फटका गुंवणूकदारांना बसू शकतो
- ड . आपला हिस्सा विकायचा असेल तर त्याला ग्राहक मिळण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे पैशाची गरज असल्यास या गुंतवणुकीमधून वेळेवर पैसे उभे करणे अवघड असते.
- इ . प्रकल्पाचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता असतेच असं नाही. त्यामुळे गुंतवणूक काही प्रमाणात धोक्यामध्ये येऊ शकते.
विचारपूर्वक गुंतवणूक धोरण
सारांश सांगायचा तर , भारतामध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास नियमित उत्पन्न, मालमत्तेची किंमत वाढ आणि करांमध्ये फायदे यासारखे महत्त्वाचे लाभ मिळू शकतात. तथापि, संभाव्य गुंतवणूकदारांनी बाजारातील चढ-उतार, प्रारंभीची मोठ्या भांडवलाची आवश्यकता आणि व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्यांसारख्या जोखमींचा देखील विचार करणे आवश्यक आहे. योग्य अभ्यास करून, विचारपूर्वक गुंतवणूक धोरण अंगिकारल्यास या जोखमी कमी करता येऊ शकतात.
शहाणपणाने खरेदी केलेली आणि योग्य प्रकारे सांभाळलेली स्थावर मालमत्ता ही, जगभरात सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते!

