वयाच्या नवव्याच वर्षी वैभव सूर्यवंशीने क्रिकेट अकादमीत सरावाला सुरुवात केली. वयाच्या १२व्या वर्षी त्याने विनू मंकड करंडकात बिहारकडून पाच सामन्यांत ४०० धावा केल्या. काही महिन्यांनंतर भारतीय ‘ब’ संघाकडून तो १९ वर्षांखालील चार संघांच्या मालिकेत सहभागी झाला. यानंतर त्याने बांगलादेश, इंग्लंड यांच्याविरुद्ध भारताच्या १९ वर्षांखालील ‘अ’ संघात स्थान मिळवले. २०२४ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची संधी त्याला मिळाली. मग, त्याला बिहारच्या रणजी संघात जानेवारी २०२४ मध्ये स्थान मिळाले. मुंबईविरुद्ध त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पाच रणजी सामने खेळले आहेत. तो प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणारा चौथा सर्वांत युवा खेळाडू आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध सूर्यवंशीने ५८ चेंडूंत १०४ धावांची खेळी केली. १३ वर्षे १८७ दिवस वय असलेला वैभव त्यावेळी युवा क्रिकेटमध्ये शतकी खेळी करणारा तो सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला. यावर्षी झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवने इंग्लंडविरुद्ध ८० चेंडूंत १७५ धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या या खेळीत १५ चौकार व १५ षटकारांचा समावेश होता. २०२५च्या हंगामात सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्स संघाकडून पदार्पण केले. याच हंगामात त्याने गुजरात टायटन्स संघाविरुद्ध ३८ चेंडूंत १०१ धावांची खेळी केली. सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’मधील चार सामन्यांत त्याने २०० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने जसप्रीत बुमरा व जोश हेझलवूड सारख्या दिग्गज गोलंदाजांनाही अडचणीत आणले. सूर्यवंशीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ५२, गुजरातविरुद्ध ३१, मुंबई इंडियन्सविरुद्ध ३९ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून ७८ धावा केल्या आहेत.
आयुष म्हात्रे (चेन्नई सुपर किंग्ज)
आयुषला २०२४ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळाले. त्याने २०२५ मध्ये संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. भारताला यामध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली संघाने इंग्लंडच्या युवा संघाविरुद्ध ३-२ अशी मालिका जिंकली. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही आयुषच्या नेतृत्वाखालील संघाने एकदिवसीय व युवा कसोटी मालिकेत चमक दाखवली. आयुषच्या नेतृत्वाखाली भारताने याच वर्षी १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला. त्याने स्पर्धेतील सात सामन्यांत २१४ धावा केल्या. ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामासाठीच्या लिलावात आयुषला कोणीच घेतले नाही. मात्र, ऋतुराज गायकवाड जायबंदी झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने त्याला बदली खेळाडू म्हणून संधी दिली. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध पुनरागमन करताना १५ चेंडूंत ३२ धावा केल्या. यानंतर त्याने बंगळूरु संघाविरुद्ध ४८ चेंडूंत ९४ धावांची खेळी केली. या हंगामातही त्याने पंजाब किंग्जविरुद्ध ७३ आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५९ धावांच्या खेळी केल्या आहेत. मुंबईकडून आयुषने २०२४-२५ रणजी हंगामात इराणी चषकात पदार्पण केले. त्याने यानंतरच्या रणजी करंडक सामन्यात महाराष्ट्राविरुद्ध १७६ धावांची खेळी केली. सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’मध्ये आयुषकडे भरवशाचा फलंदाज म्हणून पाहिले जाते.
अंगक्रिश रघुवंशी (कोलकाता नाइट रायडर्स)
कोलकाता नाइट रायडर्स संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असला, तरीही त्यांच्याकडून अंगक्रुश रघुवंशी सर्वांचे लक्ष वेधत आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत १५५ धावा केल्या आहेत. यामध्ये मुंबईविरुद्ध ५१, हैदराबादविरुद्ध ५२ आणि लखनऊविरुद्ध त्याचे ४५ धावांचे योगदान आहे. रघुवंशी हा मूळचा दिल्लीचा असून तो क्रिकेटसाठी मुंबईला आला. २०२४ च्या लिलावात कोलकाताने त्याला २० लाख रुपयांना आपल्या संघात स्थान दिले. त्याने याच हंगामात ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केले. तर, आपल्या पहिल्याच सामन्यात दिल्लीविरुद्ध त्याने २७ चेंडूंत ५४ धावांची खेळी केली. रघुवंशीने २०२२ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. रघुवंशीने मुंबईकडून खेळताना हरियाणाविरुद्ध ऑक्टोबर २०२३ मध्ये ट्वेन्टी-२० सामन्यात पदार्पण केले.
समीर रिझवी (दिल्ली कॅपिटल्स)
समीर रिझवी उत्तर प्रदेश ट्वेन्टी-२० लीगमधून चर्चेत आला. त्यानंतर २०२४ च्या लिलावात त्याला चेन्नई सुपर किंग्जने ८.४ कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले होते. मात्र, त्यानंतर करारमुक्त केल्यावर या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने त्याला आपल्या संघात स्थान दिले. गेल्या हंगामात त्याला कमी संधी मिळाल्याने केवळ एक अर्धशतक त्याच्या नावे होते. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही त्याला फारसा प्रभाव या हंगामात पाडता आला नाही. मात्र, दिल्लीकडून खेळताना त्याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध नाबाद ७० आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध ९० धावांच्या निर्णायक खेळी केल्या. तो ऑफ स्पिन गोलंदाजी करण्यातही सक्षम आहे. सध्या त्याने दिल्लीकडून खेळताना १६६ धावा केल्या. एकीकडे दिल्लीचे आघाडीचे फलंदाज अपयशी होत असताना समीरने आपल्याला मिळालेल्या संधी सोने केले.
मुकुल चौधरी (लखनऊ सुपर जायंट्स)
मुकुल चौधरी हा यष्टिरक्षक-फलंदाज राजस्थानकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याला यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाने २.६ कोटी रुपयांना संघात स्थान दिले. मुकुलने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात लखनऊला आव्हानाचा पाठलाग करताना विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात २७ चेंडूंत नाबाद ५४ धावांची खेळी केली. मुकुलने आपले प्रथम श्रेणीमधील पदार्पण २०२३ मध्ये केले. तर, २०२५-२६च्या विजय हजारे स्पर्धेतही त्याने सहभाग नोंदवला होता. आपल्या आक्रमक फटक्यांमुळे त्याला लखनऊने संधी दिली.
प्रिन्स यादव (लखनऊ सुपर जायंट्स)
लखनऊ सुपर जायंट्स संघाने प्रिन्स यादवला २०२५च्या लिलावात संघात स्थान दिले. संघातील वेगवान गोलंदाज जायबंदी झाल्याने यादवला संधी मिळाली. संघात मोहम्मद शमी, मयांक यादव व मोहसिन खान तंदुरुस्त झाल्यानंतरही अंतिम अकरामध्ये त्याचे स्थान कायम राहिले. त्याने दिल्ली कॅपिटल्स व सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्ध आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना अडचणीत आणले. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत यादवने सहा गडी बाद केले आहेत. दिल्लीकडून खेळणाऱ्या यादवने संघासाठी सर्वच प्रारूपात आपले योगदान दिले आहे.
प्रफुल हिंगे (सनरायजर्स हैदराबाद)
विदर्भाचा वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगेने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या ‘आयपीएल’ सामन्यात सनरायजर्स हैदराबादकडून पदार्पणातच चुणूक दाखवली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात तीन फलंदाजांना बाद करीत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने सामन्यात चार गडी बाद करीत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला. प्रफुलचा हा वरिष्ठ स्तरावरील केवळ दुसराच ट्वेन्टी-२० सामना होता. प्रफुलने ऑक्टोबर २०२४ मध्ये विदर्भाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. प्रफुलने १० प्रथम श्रेणी सामन्यांत २७ बळी मिळवले आहेत. त्याने डिसेंबर २०२५ मध्ये आंध्रविरुद्ध एकमेव सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सामना खेळला होता. गेल्या वर्षी झालेल्या विदर्भ प्रो ट्वेन्टी-२० लीगमध्ये त्याने चमक दाखवली होती.
