इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या यंदाच्या हंगामाला शनिवारपासून (२८ मार्च) सुरुवात होणार आहे. दहा संघांचा सहभाग असलेल्या या लीगमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही जेतेपदासाठी चुरस पाहायला मिळेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघच जेतेपद राखणार की अन्य संघ त्यांना आव्हान देणार, याचा घेतलेला हा आढावा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु

गतहंगामात बंगळूरु संघाने जेतेपदाची प्रतीक्षा संपवली. यंदा बंगळूरुचा संघ आपल्या घरच्या मैदानावर सनरायजर्स हैदराबाद संघाविरुद्ध उद्घाटनीय सामना खेळेल. बंगळूरु संघ आपल्या मजबूत फलंदाजीसाठी ओळखला जातो. कर्णधार रजत पाटीदार, विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल आणि टीम डेव्हिडसारखे आक्रमक फलंदाज संघाकडे आहेत. यात यंदाच्या हंगामात वेंकटेश अय्यरला संघाने आपल्या ताफ्यात घेतले. आता गतवर्षीप्रमाणेच यंदाही चमकदार कामगिरीचा त्यांना प्रयत्न असेल.

  • बलस्थाने : पडिक्कल, विराट, रजत, सॉल्ट आणि डेव्हिड यांसारख्या फलंदाजांमुळे संघ मजबूत दिसत आहे. तसेच वेंकटेश अय्यर आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात चमक दाखविणारा जेकब बेथल यामुळे संघाकडे चांगले पर्याय आहेत. बंगळूरुकडे अष्टपैलूंचा भरणा आहे. त्यांच्या ताफ्यात तब्बल ११ अष्टपैलू असून त्यामुळे संघनिवडीत विविध पर्याय उपलब्ध होतील.
  • कच्चे दुवे : कृणाल पंड्या आणि सुयश शर्मा वगळता बंगळूरुकडे फिरकी गोलंदाजाचा अन्य चांगला पर्याय नाही. संघाकडे सर्वाधिक अष्टपैलू असल्याने अंतिम अकराची निवड करताना संघ व्यवस्थापनाचा चांगलाच कस लागेल.

मुंबई इंडियन्स

‘आयपीएल’च्या इतिहासात सर्वांत यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स संघाकडे पाहिले जाते. मुंबईचा संघ २९ मार्चला कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने गेल्या हंगामात ‘क्वॉलिफायर-२’पर्यंत मजल मारली होती. यंदा त्यांचे लक्ष्य सहाव्या जेतेपदाचे असेल. नुकताच भारताने आपला सलग दुसरा ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला. त्या संघातील चार खेळाडू मुंबईच्या संघात आहेत. त्यामुळेच जेतेपदासाठी त्यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे.

  • बलस्थाने : मुंबईच्या संघाकडे जागतिक दर्जाचे फलंदाज आहेत. सलामीला अनुभवी रोहित शर्मा व डिकॉक असतील. मधली फळी सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि विल जॅक्स सांभाळतील. मुंबईकडे चांगले अष्टपैलूही आहेत. त्यामुळे कर्णधाराकडे फलंदाजी व गोलंदाजीसाठी दर्जेदार पर्याय आहेत.
  • कच्चे दुवे : रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच जेतेपदे मिळवली. त्याची जागा घेणाऱ्या हार्दिक पंड्याला अद्याप चमक दाखवता आलेली नाही. पंड्याने गुजरात संघाचे नेतृत्व करताना संघाला दोन्ही वेळा अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले आणि एकदा जेतेपद मिळवून दिले. परंतु मुंबईतील वरिष्ठ खेळाडूंची मोट बांधताना त्याची पुन्हा परीक्षा लागेल. तसेच मयांक मार्कंडे वगळता मुंबईकडे चांगला भारतीय फिरकीपटू नाही.

चेन्नई सुपर किंग्ज

चेन्नई सुपर किंग्ज संघाला गेल्या हंगामात फारशी चमक दाखवता आली नव्हती. त्यांना १४ पैकी केवळ चार सामन्यांत विजय नोंदवता आले. त्यामुळे ते गुणतालिकेत तळाला होते. महेंद्रसिंह धोनीच्या ‘आयपीएल’ निवृत्तीची चर्चा असताना सर्व लक्ष या हंगामातही त्याच्याकडे असेल. चेन्नईने लिलावात तब्बल नऊ खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले. यामध्ये कार्तिक शर्मा (१४.२० कोटी) व प्रशांत वीर (१४.२० कोटी) यांनी सर्वांचे लक्ष वेधले. यंदा चेन्नई संघात रवींद्र जडेजाचा समावेश नाही. त्यामुळे संघाला युवा खेळाडूंकडून अधिक अपेक्षा असेल.

  • बलस्थाने : चेन्नईकडे कर्णधार ऋतुराज गायकवाड, युवा आयुष म्हात्रे, डेवॉल्ड ब्रेव्हिस, तसेच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू संजू सॅमसन असे दमदार फलंदाज आहेत. लिलावातील खेळाडूंच्या खरेदीमुळे चेन्नईकडे अष्टपैलूंचे चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. संघाकडे सध्या आठ अष्टपैलू आहेत. यामध्ये शिवम दुबे व मॅथ्यू शॉर्टसारखे खेळाडू मोठे फटके मारण्यास सक्षम आहेत.
  • कच्चे दुवे : गेल्या हंगामात ऋतुराज दुखापतीमुळे बरेचसे सामने खेळला नाही. आता संघाकडे सलामीला पर्यायही आहे. त्यामुळे ऋतुराजला कोणत्या स्थानी फलंदाजी करण्यास द्यावी याचा विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागेल. चेन्नईला रवींद्र जडेजाची कमतरता भरून काढावी लागणार आहे. नामांकित वेगवान गोलंदाज संघात नाहीत. त्यामुळे खलील अहमद, मॅट हेन्री यांच्यावर दबाव असेल.

दिल्ली कॅपिटल्स

अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाला गेल्या हंगामात ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवता आले नव्हते. यावेळी पूर्ण तयारीनिशी ते मैदानात उतरतील. यंदा तरी संघ जेतेपदाचा दुष्काळ संपवेल, अशी चाहत्यांना आशा असेल. केएल राहुल, डेव्हिड मिलर, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स यांसारखे फलंदाज दिल्लीकडे आहे. फिरकीची धुरा कर्णधार अक्षर आणि कुलदीप यादव सांभाळतील.

  • बलस्थाने : केएल राहुल, डेव्हिड मिलर आणि स्टब्ससारखे आक्रमक फलंदाज संघाकडे आहेत. त्यातच अक्षर पटेल मोठे फटके मारण्यास सक्षम आहे. काएल जेमिसन, मिचेल स्टार्क आणि लुंगी एन्गिडीच्या रूपात परदेशी वेगवान गोलंदाजांचेही पर्याय दिल्लीकडे आहेत. त्यांना मुकेश कुमार, टी. नटराजन यांची साथ लाभेल.
  • कच्चे दुवे : अक्षर पटेल वगळता दिल्ली संघात फारसे अष्टपैलू नाहीत. तसेच बेन डकेटने ऐनवेळी माघार घेतल्याने सलामीचा प्रश्न निर्माण झाला आहे. केएल राहुलच्या साथीने पथुम निसांकाला संधी मिळू शकेल. निसांकाला ‘आयपीएल’चा अनुभव नाही. त्यामुळे राहुलवर अतिरिक्त जबाबदारी असेल.

इतर कोणत्या संघांना संधी?

गुजरात टायटन्स : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने गेल्या हंगामात ‘प्ले-ऑफ’पर्यंत मजल मारली होती. मात्र, ‘एलिमिनेटर’मध्ये त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभूत व्हावे लागले. यावेळी संघाचा प्रयत्न जेतेपद मिळविण्याचा असेल. या हंगामासाठीच्या लिलावात गुजरातने जेसन होल्डर (सात कोटी) आणि टॉम बँटन (दोन कोटी) यांना संघात घेतले. संघाकडे गिल, जोस बटलर, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर, रशीद खान, कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराजसारखे चांगले खेळाडू आहेत.

पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाने गेल्या हंगामात चमकदार कामगिरी करताना उपविजेतेपद मिळवले होते. यंदा संघाचा प्रयत्न जेतेपदाचा असेल. चांगल्या अष्टपैलूंचा भरणा ही संघासाठी जमेची बाजू आहे. मार्कस स्टोइनिस, मार्को यान्सन, मुशीर खान, सूर्यांश शेडगे यांसारखे पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. गोलंदाजीत अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहलसारखे अनुभवी खेळाडू आहेत. श्रेयस (६०४ धावा) आणि प्रभसिमरन सिंग (५४९ धावा) यांनी गेल्या हंगामात चमक दाखवली होती. त्यांच्यावरच पंजाबची मदार असेल. पंजाबची पहिली लढत ३१ मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे.