‘ट्वेन्टी-२० क्रिकेट इज यंग मेन्स गेम’ असे म्हटले जाते. युवा खेळाडूंवर प्रतिष्ठा, लौकिक जपण्याचे दडपण नसते, त्यामुळे ते निडरपणे स्वत:चा खेळ दाखवू शकतात. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वांत मोठ्या आणि लोकप्रिय ट्वेन्टी-२० स्पर्धेतही याचाच प्रत्यय येत आहे. वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, अभिषेक शर्मा यांसारखे फलंदाज कसलीही पर्वा न करता प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर हल्ला चढवतात. परिणामी त्यांच्या संघांना मोठी धावसंख्या उभारणे सोपे जाते. मुंबई इंडियन्स संघ मात्र अजूनही आपल्या जुन्या रणनीतीतच अडकून पडला आहे. मुंबईकडून ‘पूर्वपुण्याई’लाच महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे गेल्या काही हंगामांपासून हा संघ अपयशाच्या गर्तेत अडकला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी बदलांची, नव्या चेहऱ्यांची, नव्या योजनांची आवश्यकता असून त्यासाठी मुंबईचे व्यवस्थापन तयार आहे का, याचा आढावा.
‘पूर्वपुण्याई’लाच महत्त्व
‘आयपीएल’मधील सर्वांत यशस्वी संघांमध्ये मुंबई इंडियन्सचे नाव घेतले जाते. मुंबई आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी प्रत्येकी पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. मात्र, मुंबईने अखेरचे जेतेपद २०२० साली मिळवले. त्यानंतर सहापैकी चार हंगामांत मुंबईचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. असे असले तरी मुंबईचे व्यवस्थापन संघात मोठे बदल करण्याचे धाडस करत नसल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामापूर्वी मुंबईने कर्णधार हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या नामांकित खेळाडूंना संघात कायम ठेवले. या पाचही जणांनी आधीच्या हंगामांत मुंबईसाठी उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र, तिलक वगळता हे सर्व जण तिशीत आहेत. रोहितने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटला अलविदा केले आहे. सूर्यकुमारच्या कामगिरीत सातत्य (गेला हंगाम अपवाद) नाही. हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्हे आहेत. तर बुमराच्या गोलंदाजीचा दर्जा वादातीत असला, तरी तो संपूर्ण हंगाम फिट राहू शकतो का याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मुंबईने तिलकसह इशान किशनसारख्या आणखी एखाद्या युवकाला संघात ठेवणे अधिक उचित ठरले असते, असे म्हटले जात आहे.
कर्णधार हार्दिकचे अपयश
मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने २०२४च्या हंगामापूर्वी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून पुन्हा आपल्याकडे घेतले आणि त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. गुजरात टायटन्सला पदार्पणाच्या हंगामात (२०२२) विजेते बनवणाऱ्या हार्दिकला मुंबई संघाचे नेतृत्व करताना मात्र यशाने हुलकावणीच दिली. रोहितला कर्णधारपदावरून हटवून ही जबाबदारी हार्दिकला देण्याचा निर्णय मुंबईच्या चाहत्यांना फारसा रुचला नाही. त्यामुळे मुंबई संघाचे घरचे मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवरही हार्दिकविरोधात शेरेबाजी झाली. परंतु भारतीय संघाच्या २०२४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक विजयात हार्दिकने महत्त्वाचे योगदान दिले आणि चाहत्यांना पुन्हा आपल्या बाजूने वळवले. त्यामुळे २०२५च्या ‘आयपीएल’ हंगामात परिस्थिती काहीअंशी सुधारली. हार्दिकला चाहत्यांचा पाठिंबा मिळाला, तसेच मुंबई संघाने ‘प्ले-ऑफ’मध्येही प्रवेश केला. मात्र, यंदाच्या हंगामात हार्दिकला पुन्हा कर्णधार आणि अष्टपैलू म्हणून सपशेल अपयशाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा संघही ‘प्ले-ऑफ’च्या शर्यतीतून बाद झाला आहे. त्यामुळे हार्दिकच्या भवितव्याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सूर्यकुमारला संघमुक्त करण्याची वेळ?
सूर्यकुमार यादवने ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता. मात्र, यंदाचा हंगाम त्याच्यासाठी विसरण्याजोगा ठरला आहे. त्याला ११ डावांत केवळ १९५ धावा करता आल्या आहेत. तसेच चेंडूचा टप्पा किंवा दिशा न बघताच, तो मागील दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याच्यावर टीकाही होत आहे. फलंदाज म्हणून त्याचे अपयश ‘आयपीएल’पुरते मर्यादित नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तो धावांसाठी झगडत आहे. त्याला गेल्या तीन वर्षांत ५३ ट्वेन्टी-२० डावांत मिळून केवळ आठ अर्धशतके करता आली आहेत. पुढील ‘आयपीएल’ हंगामाच्या वेळी सूर्यकुमार ३५ वर्षांचा असेल. त्यामुळे मुंबईने त्याला संघमुक्त करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.
तिलक, नमन यांच्यात गुंतवणूक?
‘आयपीएल’मध्ये आता युवकांचे वर्चस्व पाहायला मिळत असून मुंबई इंडियन्सनेही त्याच दिशेने विचार करणे गरजेचे आहे. डावखुऱ्या तिलक वर्माला यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नसली, तरी मुंबईचा संघ दडपणाखाली असताना त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार शतक, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु येथे रायपूरच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर अर्धशतक साकारत स्वत:चा वेगळा लौकिक सिद्ध केला. मुंबईच्या व्यवस्थापनाने आता २३ वर्षीय तिलकला भावी कर्णधार म्हणून तयार करण्याबाबत विचार केला पाहिजे. तसेच यंदाच्या निराशाजनक हंगामात २६ वर्षीय नमन धीरची कामगिरी मुंबईसाठी सकारात्मक बाब ठरते आहे. वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाल्यावर नमनने दोन अर्धशतके केली, तर अन्य दोन वेळा चाळिशीचा टप्पा ओलांडला. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने तिलक आणि नमन हे मुंबईचे मधल्या फळीतील आधारस्तंभ ठरू शकतील.
बुमराचा जोडीदार शोधण्याची गरज
मुंबई इंडियन्सने २०२०मध्ये अखेरचे जेतेपद मिळवले, त्यावेळी जसप्रीत बुमराला ट्रेंट बोल्टची मोलाची साथ लाभली होती. संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे झालेल्या या हंगामातील १५ सामन्यांत बुमराने २७, तर बोल्टने २५ गडी टिपले होते. मात्र, त्यानंतर वेगवान गोलंदाजीत बुमराचा जोडीदार शोधण्यात मुंबईला वारंवार अपयश आले आहे. मुंबईने काही हंगामांपूर्वी इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरला मोठ्या किमतीत खरेदी केले, पण दुखापतींमुळे तो सातत्याने सामनेच खेळू शकला नाही. त्यामुळे मुंबईने आर्चरला करारमुक्त केले आणि गेल्या खेळाडू लिलावात बोल्टला पुन्हा संघात घेतले. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला बोल्ट आता पूर्वीसारखा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे बुमरावरील भार वाढला आहे.
धाडसी निर्णय आवश्यक
यंदाच्या हंगामात बुमराला ११ सामन्यांत केवळ तीन बळी मिळवता आले असले, तरी तो किमान धावगतीवर नियंत्रण राखत आहे. दुसऱ्या बाजूने मात्र सहज धावा निघत असल्याने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर दडपण निर्माण करणे शक्य होत नाही. त्यामुळे मुंबईला गोलंदाजीतील बदलांबाबतही विचार करावा लागणार आहे. अफगाणिस्तान फिरकीपटू अल्ला घझनफर आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉश यांनी प्रभावित केले आहे. दीपक चहर आणि शार्दूल ठाकूर यांना मात्र संघमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सला पुन्हा विजयपथावर परतायचे असल्यास धाडसी निर्णय घेण्यावाचून पर्याय नाही, हे निश्चित.
