Iran attacks on US tech data centers and AI warfare intent in West Asia: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाने आता वेगळे वळण घेतले आहे. यूएई, बहारिन मधील टेक कंपन्यांच्या डेटा सेंटर्सवर इराणकडून हल्ले केले जात आहेत. अमेरिकन लष्कर एआय व डेटा सेंटर्सचा वापर करून युद्धात इराणवर कुठे व कधी हल्ला करायचा याबाबतचे निर्णय घेत असल्याचा संशय इराणला आहे. तसेच अमेरिकेकडून होत असलेल्या हल्ल्यांचा वेग डेटा सेंटर्स व एआयमुळे वाढल्याचा संशय इराणच्या लष्करी नेतृत्वाला आहे. त्यामुळे इराणने अमेरिकन कंपन्यांवर हल्ला करण्याचा इशारा ३१ मार्च रोजी दिला होता. त्यानंतर सलग दोन दिवस इराणकडून डेटा सेंटर्सवर हल्ले करण्यात आले. इराणने बहारिनमधल्या अमेझॉनच्या डेटा सेंटरवर ड्रोनहल्ला का केला? युद्ध कुठल्या दिशेने चाललंय? युद्धात एआय व डेटा सेंटरचा वापर होत आहे का? सविस्तर जाणून घेऊयात.

युद्धात डेटा सेंटर्सला कसे लक्ष्य केले जात आहे?

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने इराणवर पहिला हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियात युद्ध सुरू झाले. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ मार्च रोजी इराणने शाहेद ड्रोन्सने यूएईमधील अमेझॉन कंपनीच्या दोन वेब सर्व्हिस सेंटर्सला लक्ष्य केले होते. त्यानंतर इराणकडून आता बहारिनमधल्या अमेझॉनच्या डेटा सेंटरवर १ एप्रिल रोजी, तर दुबईतील ऑरेकल कंपनीच्या डेटा सेंटरवर काल (२ एप्रिल) हल्ला झाला. दरम्यान, इराणमधील डेटा सेंटरवर देखील अमेरिका व इस्रायलकडून हल्ला झाला आहे. इराणची राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या ‘सेपाह’ या बँकेच्या तेहरान येथील डेटा सेंटरवर ११ मार्च रोजी हल्ला झाला होता, ‘द जेरूसलेम पोस्ट’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले होते.

डेटा सेंटर्सवर होणाऱ्या हल्ल्यांचा ट्रेंड बदलला?

डेटा सेंटर्सची हेरगिरी तसेच त्यावर सायबर हल्ला होण्याचे प्रकार या आधी घडत होते. पश्चिम आशियातील युद्धात आता डेटा सेंटर्सला प्रत्यक्षपणे लक्ष्य केले जात आहे. डेटा सेंटर्सच्या इमारतींवर ड्रोन्सने हल्ले करून त्यांना जमीनदोस्त केले जात आहे. दरम्यान, २०२४ मध्ये युक्रेनच्या हॅकर्सने रशियन लष्कराचे डेटा सेंटर हॅक केले होते. त्यातील सगळा डेटा त्यांनी उडवून टाकला होता. आखाती देशांमध्ये सध्या डेटा सेंटरलाच ड्रोन्स व मिसाइलने उडवले जात आहे.

कुठे व कसा हल्ला करायचा? एआय ठरवतंय?

अमेरिकन लष्कराकडून राबवल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये निर्णय घेण्यासाठी अतिप्रगत एआयचा (Advance AI) वापर केला जात आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडण्यासाठी तसेच सध्या इराणवर हल्ला करण्यासाठी घेतले जाणारे निर्णय ‘अॅडव्हान्स्ड एआय’च्या सहाय्याने घेतले जात आहेत. गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण एआयच्या माध्यमातून केले जात आहे. अमेरिका त्यासाठी ‘एन्थ्रोपिक क्लाउड’ या एआयचा वापर करत आहे. गुप्त माहिती साठवण्यासाठी तसेच एआयकडून मिळणारी माहिती सार्वजनिक होऊ नये, म्हणून अमेरिकन लष्कर एका विशेष एआय व क्लाउडचा वापर करत आहे. अमेरिकन सरकार तसेच लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती ही सध्या अमेझॉनच्या वेब सर्व्हिस डेटा सेंटरच्या क्लाउडमध्ये जतन केली जात आहे. त्यामुळे बहारिनमधील अमेझॉनच्या डेटा सेंटरवर हल्ला करण्यात आला. डेटा सेंटर्स व एआय एकमेकांशी संबंधित असल्यामुळे इराणने आखाती देशांमधील टेक कंपन्यांच्या इतर डेटा सेंटर्सवरही हल्ले सुरू केले आहेत. दरम्यान, इराणने यूएईमधील डेटा सेंटर्सवर हल्ला केल्यानंतर यूएईची बँकिंग यंत्रणा विस्कळीत झाली होती.

इराणकडून कोणत्या अमेरिकी कंपन्यांना धोका?

आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन कंपन्यांच्या डेटा सेंटर्सला इराणने ‘शत्रूच्या तंत्रज्ञान पायाभूत सुविधा’ असे घोषित केले आहे. त्यामुळे यापुढे इराण डेटा सेंटर्सला लक्ष्य करणार हे निश्चित झाले आहे. इराणने आतापर्यंत चार डेटा सेंटर्सवर हल्ला केला आहे. डेटा सेंटर्सला ‘हवाई सुरक्षा यंत्रणे’ने सुरक्षित केले नसल्याने त्यावर हल्ला करणे इराणसाठी अधिक सोईचे आहे. आखाती देशांमध्ये असलेल्या मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा, ऑरेकल, अॅपल, इंटेल, एचपी, आयबीएम, सिस्को, डेल, पॅलँटिर आणि एनव्हिडिया या कंपन्यांच्या डेटा सेंटर्सला लक्ष्य केले जाईल असा इशारा इराणने दिला आहे.

युद्ध किंवा संघर्षात इथून पुढे डेटा सेंटर्सवरही हल्ले होतील का?

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) वेगाने प्रगत होत असल्याने सध्या डेटा सेंटर्सचे महत्व वाढले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर करून अमेरिकी सैन्य युद्धकाळात निर्णय घेत आहे. इराणवर सध्या होत असलेल्या हल्ल्यांचा निर्णय एआयच्या माध्यमातून घेतला जात आहे, असा संशय इराणला आहे. डेटा सेंटर्स मधील माहिती व एआयचा वापर करून अमेरिका निर्णय घेऊन हल्ले करत असल्याचा संशय असल्याने इराणकडून डेटा सेंटर्सला लक्ष्य केले जात आहे. दरम्यान, इराणने ज्या डेटा सेंटर्सवर हल्ले केले, त्या डेटा सेंटर्सचा वापर अमेरिकेच्या लष्कराने केला आहे की नाही? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. यूएईची अमेरिकेबरोबर असलेली मैत्री पाहून देखील इराण यूएईला लक्ष्य करत आहे. डेटा सेंटर्स लष्कराला मदत करत आहेत किंवा नाही, हे न पाहताच यापुढे डेटा सेंटर्सला दोन देशांच्या संघर्षात अथवा युद्धात यापुढे लक्ष्य केले जाईल, हे यावरून स्पष्ट होत आहे.