Iran Attacks US Data Centres इस्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. आम्ही पुढचे ४० दिवस युद्धासाठी तयार आहोत, असं अमेरिका आणि इस्रायलने म्हटले आहे. इराणकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. इराणने संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि बहरीनमधील ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या पायाभूत सुविधांना ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे लक्ष्य केले आहे. हे हल्ले आधुनिक युद्धातील एक मोठा बदल दर्शवतात. आता युद्धात ऑईल रिफायनरीज इतकीच डेटा सेंटर्सदेखील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची ठरत आहेत. डेटा सेंटर्सला लक्ष्य करण्यामागील कारणे काय? याचा काय परिणाम होणार? जाणून घेऊयात…

ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या डेटा सेंटर्सवर हल्ले

संयुक्त अरब अमिरातीमधील ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या दोन डेटा सेंटर्सवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इमारतींचे नुकसान झाले असून, तिथे आग लागली. बहरीनमधील इमारतीमध्येदेखील ड्रोनचा स्फोट झाल्याने तिचेही नुकसान झाले. या हल्ल्यांमुळे वीजपुरवठा खंडित झाला, संरचनेचे नुकसान झाले आणि आग विझवण्याच्या यंत्रणा सक्रिय झाल्यामुळे सर्व्हर रॅक्सचे पाण्याने अधिक नुकसान झाले. ॲमेझॉन EC2, ॲमेझॉन S3 व डायनॅमो-डीबी यांसारख्या प्रमुख सेवांमध्ये या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि व्यत्यय जाणवला.

ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने सोमवारी उशिरा सांगितले की, संयुक्त अरब अमिरातीमधील दोन डेटा सेंटर्सवर थेट हल्ले झाले असून, बहरीनमध्ये ड्रोन कोसळल्याने आणखी एका सुविधेचे नुकसान झाले आहे. “या हल्ल्यांमुळे संरचनेचे नुकसान झाले आहे, पायाभूत सुविधांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि काही ठिकाणी आग विझविण्याच्या प्रक्रियेमुळे पाण्याचा शिरकाव होऊन अतिरिक्त नुकसान झाले आहे,” असे ॲमेझॉनने त्यांच्या ऑनलाइन डॅशबोर्डवर स्पष्ट केले.

डेटा सेंटर्स म्हणजे काय? या हल्ल्यांचा अर्थ काय?

ॲमेझॉन डेटा सेंटर ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचा भाग आहे. डेटा सेंटर्समध्ये हजारो संगणक सर्व्हर, स्टोरेज सिस्टीम आणि नेटवर्किंग हार्डवेअर ठेवलेले असतात. हे सेंटर्स आधुनिक इंटरनेटचे इंजिन मानले जातात. हे डेटा सेंटर्स एआय मॉडेल्स, स्ट्रीमिंग सेवा, सरकारी यंत्रणा यांसारख्या अनेक गोष्टी चालवतात. त्यातील अनेक डेटा सेंटर्स ही ‘हायपर स्केल’ डेटा सेंटर्स असून, ती लाखो स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली असतात आणि प्रत्येकात पाच हजार ते ५० हजारहून अधिक सर्व्हर्स असतात.

२०२६ च्या सुरुवातीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस ५० हून अधिक देशांमध्ये ९०० पेक्षा जास्त सुविधा चालवते. प्रत्येक ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस रिजन किमान तीन ‘अॅव्हलेबिलिटी झोन्स’मध्ये विभागलेला असतो. हे झोन्स एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर असतात; परंतु ते १०० किलोमीटरच्या आत असून, ‘अल्ट्रा-लो-लेटन्सी नेटवर्क्स’नी जोडलेली असतात. त्यामुळे डेटा ट्रान्स्फरमधील वेळ कमी होतो.

ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या मते, त्यांच्या डेटा सेंटर्समध्ये पाणी, वीज आणि इंटरनेटसाठी पर्यायी व्यवस्था असते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही कामकाज सुरू राहावे. तिथे प्रत्यक्ष सुरक्षेसाठी रक्षक, कुंपण आणि सीसीटीव्ही असतात; परंतु या उपाययोजना घुसखोरांना रोखण्यासाठी असतात., क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी नाहीत. नोट्रे डेम विद्यापीठातील आयटी प्राध्यापक माईक चॅपल म्हणाले की, हे हल्ले म्हणजे एक आठवण आहे की, क्लाउड कॉम्प्युटिंगसाठी जमिनीवर भौतिक सुविधा लागतात आणि त्या कोणत्याही आपत्तीत असुरक्षित असतात.

युद्धात डेटा सेंटर्सला लक्ष्य का केले जात आहे?

तज्ज्ञांच्या मते, डेटा सेंटर्स आता युद्धातील नवे लक्ष्य ठरत आहे, याची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत :

  • एकवटलेला प्रभाव : डेटा सेंटर्समध्ये प्रचंड संगणकीय शक्ती एकाच ठिकाणी केंद्रित असते. एक सुविधा निकामी केल्यास बँकांपासून सरकारी संस्थांपर्यंत हजारो संस्थांचे कामकाज एकाच वेळी ठप्प होऊ शकते.
  • लष्करी आणि गुप्तचर माहितीची केंद्रे : आधुनिक सैन्य आणि सरकारे लॉजिस्टिक, संवाद आणि माहिती संकलनासाठी पूर्णपणे क्लाउड पायाभूत सुविधांवर अवलंबून आहेत.
  • आर्थिक अस्थिरता : क्लाउड सेवा डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स आणि आर्थिक बाजारांना आधार देतात. या सेवांमध्ये व्यत्यय आल्यास आर्थिक अराजकता आणि गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता निर्माण होऊ शकते.
  • एआयचा बदला: काही वृत्तांनुसार, अमेरिकेने इराणविरुद्ध हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी ‘अँथ्रॉपिकच्या क्लॉड’ सारख्या एआय साधनांचा वापर केला होता. त्यामुळे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसला लक्ष्य करणे हा त्या तंत्रज्ञानाला बळ देणाऱ्या डिजिटल पायाभूत सुविधांवरील प्रतिहल्ला असू शकतो.

‘या’ हल्ल्यांचा परिणाम काय?

ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस जगातील अनेक महत्त्वाच्या ऑनलाइन सेवांना आधार देते. कंपनीने मध्य पूर्वेतील सर्व्हर वापरणाऱ्या ग्राहकांना आपला डेटा इतर रिजनमध्ये हलवण्याचा सल्ला दिला आहे. प्राध्यापक माईक चॅपेल यांच्या मते, ॲमेझॉनने आपली सेवा अशा प्रकारे तयार केली आहे की, एका डेटा सेंटरच्या नुकसानाने त्यांच्या एकूण कामकाजावर फारसा परिणाम होत नाही. एकाच झोनमधील इतर डेटा सेंटर्स हे काम सांभाळून घेतात.

मात्र, एकाच वेळी अनेक सेंटर्स निकामी झाल्यास गंभीर समस्या उदभवू शकतात. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने मध्य पूर्वेतील ग्राहकांना डेटा बॅकअप घेण्याचा सल्ला दिला आहे. यूएईमधील सुविधा पूर्णपणे पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याचे ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने म्हटले आहे. मात्र, सध्याची सुरक्षा परिस्थिती पाहता, भविष्यात काय होईल हे सांगणे कठीण आहे.