Iran Israel War IT Sector Impact: अमेरिकेने इराणविरोधातील युद्धावर तोडगा काढण्याची भाषा सुरू केली असली तरी इस्रायलने मात्र युद्धबंदीवर कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. उलट आम्ही इराणवर हल्ले करत राहू, असे विधान इस्रायलच्या राजदूतांनी केले आहे. यामुळे पश्चिम आशियातील संघर्ष अजून काही दिवस धुमसत राहिल, अशी शक्यता आहे. दरम्यान मंगळवारी इराणने बहरीनमधील ॲमेझॉन कंपनीच्या इमारतीवर ड्रोनने हल्ला केला. यामुळे आखाती प्रदेशातील ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे काम विस्कळीत झाले. युद्धाच्या एका महिन्यात ॲमेझॉनवर हा दुसरा हल्ला होता. या हल्ल्यामुळे आता आखाती देशातील आयटी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेच. पण त्याचबरोबर आता सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांना अमेरिकेबाहेर कार्यालये थाटायची की नाही? याचाही विचार करावा लागणार आहे.

१ मार्च रोजी इराणने युएइमधील ॲमेझॉनच्या डेटा सेंटरला लक्ष्य केले. ज्याप्रकारे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांवर हल्ले केले जात आहेत, त्या तुलनेत हल्ल्याची तीव्रता कमी असली तरी यामुळे सिलिकॉन व्हॅलीतील कंपन्यांना आता आखाती देशातील गुंतवणुकीबाबत पुनर्विचार करावा लागत आहे.

यापुढेही युद्ध सुरू राहिले तर ओपन एआय आणि एनव्हिडिया सारख्या कंपन्यांची गुंतवणूक खंडीत होऊ शकते. कारण या कंपन्यांनी आखाती देशात डेटा सेंटर्स उभी केली आहेत. याशिवाय तेलसंपन्न असलेल्या आखाती देशांकडून या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. ज्याचा उपयोग या कंपन्यांनी एआय संशोधनासाठी केला होता. हा निधी खंडीत झाल्यास या कंपन्या संशोधनात मागे पडू शकतात.

अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धाचा अमेरिकन कंपन्यांनाच धक्का

अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स आणि इतर आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आखाती देशातील गुंतवणूक धोक्यात आली असल्याचे म्हटले आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने लिहिले, अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात सुरू केलेल्या युद्धाची धग आता अमेरिकेतील टेक कंपन्यांना बसत आहे. या कंपन्यांच्या पर्शियन गल्फमधील इमारतींना लक्ष्य केले जात आहे. जर युद्ध असेच सुरू राहिले तर या प्रदेशातील कंपन्या अधिक असुरक्षित होतील.

इंडिया टुडेने प्रकाशित केलेल्या लेखानुसार, या घटनेचे दोन पैलू समोर येतात. एक म्हणजे, इराणच्या शाहेद ड्रोन्समुळे सिलिकॉन व्हॅलीची आखातामधील स्वप्नाच्या चिंधड्या उडत आहते. दुसरा पैलू, या कंपन्यांना बडे गुंतवणूकदार आणि आखाती देशांकडून मिळणाऱ्या भरमसाट निधीचे आता काय होणार?

आखाती देश आता सुरक्षित नाहीत

इराणच्या तुलनेने स्वस्त असलेल्या शाहेद ड्रोन्सनी या युद्धात मोलाची कामगिरी बजावली आहे. ॲमेझॉन डेटा सेंटरवर काही निवडक ड्रोनचे हल्ले झाले असले तरी यामुळे यामुळे भूराजकीय आव्हाने उभी राहिली आहेत. डेटा सेंटर्सची मालमत्ता आणि तिथे काम करणाऱ्या कुशल मनुष्यबळाच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आखाती देशांत कोणत्या आयटी कंपन्या?

दुसरीकडे इराणने मात्र त्यांचा हेतू स्पष्ट केला आहे. आखाती देशांत अमेरिकेच्या ज्या कंपन्या कार्यरत आहेत, त्या अमेरिकेच्या लष्कराला मदत करत असो किंवा नसो त्यांना लक्ष्य केले जाणार, हे इराणने आधीच म्हटले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, इराणने म्हटले की, शत्रू राष्ट्राच्या तंत्रज्ञान सुविधांवर आम्ही हल्ले करू. खालील काही कंपन्यांची कार्यालये या प्रदेशात आहेत.

  • ॲमेझॉन
  • गुगल
  • मायक्रोसॉफ्ट
  • एनव्हिडीया
  • आयबीएम

अमेरिकन-इराण युद्ध हे आता फक्त तेल, गॅस यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही, हे या परिस्थितीवरून लक्षात येते. इराणने मध्य पूर्वेत असलेल्या अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. याचा अर्थ हे युद्ध आणखी काही काळ लांबल्यास गल्फमधील टेक कंपन्यांना कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करून सुरू केलेल्या एआय प्रकल्पांना अर्ध्यातच सोडावे लागू शकते. अबू धाबीमधील स्टारगेट एआय डेटा सेंटर प्रकल्पावर याचा आधीच परिणाम झाला आहे.

स्टारगेटबरोबरच सौदी अरेबियासह संपूर्ण आखाती प्रदेशात छोटे मोठे एआय डेटा सेंटर प्रकल्प उभे राहिले होते. एनव्हिडीयाबाबत बोलायचे झाल्यास या कंपनीने पुढील काही वर्षात आखाती देशांमध्ये कोट्यवधींच्या एआय चिप्स विकण्याचे ध्येय ठेवले होते.

आखाती देशांमधून होणारी गुंतवणूक धोक्यात

अमेरिकन कंपन्यांना तेलसंपन्न असलेल्या आखाती देशांकडून मोठी गुंतवणूक मिळाली आहे. युद्धामुळे ही गुंतवणूक बंद होण्याची भीती आहे. या देशातील गर्भश्रीमंतांनी कोट्यवधी डॉलर्सचा निधी टेक कंपन्यांना देणार असल्याचे वचन दिले होते. यातील बराच निधी ओपनएआय आणि एक्सएआय कंपनीला मिळणार होता.

जागतिक आर्थिक परिषदेच्या मते, आखाती देशांकडून अब्जावधी डॉलर्सचा सार्वभौम निधी सिलिकॉन व्हॅलीमध्ये गुंतवला गेला आहे. अमेरिका-इराण युद्ध सुरू होण्यापूर्वी जागतिक आर्थिक परिषदेने लिहिले की, सौदी अरेबियाचा पीआयएफ हा सार्वभौम निधी, अबू धाबीचा एडीआयए आणि मुबादला, कतारचा क्यूआयए अशी एकूण १ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक एआय, जेनोमिक्स आणि क्लायमेट टेकमध्ये करण्यात आली आहे.

हा सर्व गुंतवणूक आता धोक्यात आली आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे संपूर्ण आखाती प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेलाच जबर हादरा बसला आहे. तेल निर्यात साखळी विस्कळित झाली आहे, तेलशुद्धीकरण कारखाने हल्ल्यांमुळे जळत आहेत. तसेच तेल उत्खनन प्रकल्प हल्ल्याच्या भीतीने ठप्प झाले आहेत. काढलेले तेल साठविण्याची आखाती देशांत व्यवस्था नसल्यामुळे या प्रदेशातील अर्थव्यवस्थेला मोठी खिळ बसण्याची शक्यता आहे.