इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचे क्रीडा जगतावरही गंभीर परिणाम होत आहेत. या वर्षी होणारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धादेखील याला अपवाद ठरलेली नाही. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. इराण फुटबॉल संघटना आणि जागतिक फुटबॉल महासंघ (फिफा) यांच्यामध्ये वेगळेच शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे इराण संघ विश्वचषकात खेळण्याबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. 

इराणच्या सहभागाबाबत चर्चा का? 

या वर्षी होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरणारा इराण हा पहिला संघ ठरला होता. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सगळ्यात आधी ‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फाटिनो यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह झालेल्या बैठकीचा हवाला देत इराणचे विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेत स्वागत असेल, अशी माहिती दिली. यानंतर दोन दिवसांनी ट्रम्प यांनी ‘स्वतःच्या हितासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने इराण संघाने विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणे योग्य नाही,’ अशी वादग्रस्त टिप्पणी केली. त्यावर इराण फुटबॉल महासंघाने ‘आम्हाला सहभागापासून कोणी रोखू शकत नाही. उलट एखाद्या पात्र संघाला रोखण्याची धमकी देण्याच्या कृतीमुळे अमेरिकेचे यजमानपदच काढून घ्यावे,’ अशी सनसनाटी मागणी केली. दरम्यान, इराणचे क्रीडामंत्री अहमद डोन्यामली यांनी देशाने विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यास सध्या योग्य परिस्थिती नसल्याचे म्हटले होते. 

‘फिफा’ इराणला काढू शकते का? 

एखाद्या संघाने विश्वचषकातून माघार घेतल्याचे किंवा त्या संघाला ‘फिफा’ने काढून टाकल्याचे आधुनिक काळात कोणतेही उदाहरण नाही. याच्याशी सर्वांत जवळची घटना १९९२ च्या युरोपीय अजिंक्यपद स्पर्धेत घडली होती. तेव्हा बाल्कन युद्धामुळे संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध लादल्यानंतर ‘यूएफा’ने स्पर्धेच्या १० दिवस आधी स्वीडनमध्ये युगोस्लाव्हियाच्या जागी दुसरा संघ घेतला होता. त्यांच्या जागी आलेल्या डेन्मार्कने तेव्हाची ‘युरो ९२’ स्पर्धा जिंकली होती. अर्थात, इराणच्या विश्वचषक सहभागावर अद्याप ‘फिफा’ने कोणताही निर्णय घेतलेला नाही. ‘फिफा’च्या ३० एप्रिल रोजी व्हँकुव्हर येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या तरी इराणने सहभागी व्हावे अशीच ‘फिफा’ची भूमिका आहे. ‘फिफा’चे नियम राजकीय आणि धार्मिक तटस्थतेवर भर देतात. त्यामुळे इराणने माघार घेऊ नये यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील. यापूर्वी १९८२ मध्ये विश्वचषक पात्रता फेरीत कुवेतविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे ‘फिफा’ने इराणला आशियाई पात्रता स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखले होते. 

इराण माघार घेऊ शकतो का? 

ट्रम्प यांच्या वादग्रस्त टिप्पणीपर्यंत इराणच्या माघारीविषयी कुठलीही चर्चा नव्हती. केवळ डोन्यामली यांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी योग्य परिस्थिती नसल्याचे म्हटले होते. अर्थात, हे मत वैयक्तिक असावे, कारण सरकारची अधिकृत भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. ‘फिफा’च्या नियमांनुसार सदस्य संघटनांना त्यांच्या स्पर्धांमधून माघार घेण्याची परवानगी नाही. तसे केल्यास इराणला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. यापूर्वी १९५० मध्ये प्रवास खर्चाचे कारण देत फ्रान्स आणि भारताने सहभाग घेतला नव्हता. त्यानंतर सामने निश्चित झाल्यानंतर कोणत्याही देशाने विश्वचषकातून माघार घेतलेली नाही. 

‘फिफा’चे स्पर्धा नियम काय सांगतात? 

‘फिफा’च्या स्पर्धा नियमांमध्ये संरक्षणात्मक तरतुदी आहेत आणि त्या तंतोतंत पाळल्या जातात. नियमांनुसार, स्पर्धेपूर्वी माघार घेतल्यास माघारीच्या तारखेनुसार २,७५,००० ते ५,५५,००० युरो इतका दंड आकारला जाऊ शकतो. माघारीचे प्रकरण ‘फिफा’च्या शिस्तपालन समितीकडे पाठवले जाते. ही समिती स्पर्धा बंदीसह क्रीडा निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेते. ‘फिफा शिस्तपालन समिती अतिरिक्त शिस्तभंगाचे उपाय करू शकते. माघार घेण्याची किंवा वगळण्याची वेळ, उल्लंघनाचे गांभीर्य, संभाव्य कमी करणारे घटक आणि इतर संबंधित परिस्थितींचा विचार करून निर्णय घेतला जातो.’ या शिस्तभंगाच्या कारवाईमध्ये संबंधित संघटनेला भविष्यातील ‘फिफा’ स्पर्धेतून वगळणे किंवा त्या संघटनेच्या जागी दुसऱ्या संघटनेला संधी देणे यासारखे निर्णय घेतले जाऊ शकतात. 

स्पर्धेतून इराण बाहेर गेल्यास कोणाला संधी? 

पात्र ठरलेल्या संघाच्या जागी बदली संघ घेण्याबाबत ‘फिफा’चे विश्वचषक नियम काहीसे अस्पष्ट आहेत. त्यात फक्त असे नमूद आहे की ‘आवश्यक वाटेल ती कार्यवाही करण्याचा पूर्ण अधिकार’ फिफाकडे आहे आणि ‘सहभागी सदस्य संघटनेच्या जागी दुसऱ्या संघटनेला स्थान देता येईल.’ इराणने माघार घेतल्यास इराक आणि संयुक्त अरब अमिराती हे संभाव्य पर्याय मानले जात आहेत. कारण ते आशियाई फुटबॉल महासंघातील पात्र न ठरलेले सर्वोच्च मानांकन असलेले संघ आहेत. मात्र, कोणताही बदल इतका सोपा नसेल. 

बदल झाल्यास कोणाचे पारडे जड? 

इराणने ‘एएफसी’ पात्रतेच्या तिसऱ्या फेरीतील ‘गट अ’मध्ये अव्वल स्थान मिळवून विश्वचषकातील आपले स्थान निश्चित केले होते. तर अमिरातीला इराकविरुद्ध ‘प्ले-ऑफ’मध्ये पराभव पत्करावा लागला होता. इराकच्या विजयामुळे त्यांना ३१ मार्च रोजी माँटेरे येथे बोलिव्हिया किंवा सुरीनामविरुद्ध आंतरखंडीय ‘प्ले-ऑफ’ खेळण्याची संधी मिळणार होती. त्या सामन्याचा विजेता अंतिम फेरीत पोहोचेल. इराकने युद्धामुळे हवाई क्षेत्र बंद असल्याने त्यांचे बहुतेक खेळाडू बगदादमध्ये अडकले आहेत, म्हणून हा सामना पुढे ढकलण्याची विनंती ‘फिफा’कडे केली आहे. इराणच्या जागी इराकचा समावेश करणे हा एक स्पष्ट उपाय वाटू शकतो, पण त्याचे राजकीय परिणाम होऊ शकतात. संयुक्त अरब अमिराती, जो अमेरिकेचा जवळचा धोरणात्मक मित्र आहे, तोही इराणची जागा घेण्याची मागणी ‘फिफा’कडे करू शकतो. आता अंतिम निर्णय काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.