Sejjil Missile Iran vs Israel Defense : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणात संयुक्त हल्ले केल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखातातील इस्रायल व अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. युद्धाच्या १७ व्या दिवशी इराणने आपल्या ताफ्यातील सर्वात घातक ‘सेज्जिल’ या क्षेपणास्त्राने इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काय आहे सेज्जिल क्षेपणास्त्र? ते नेमके किती घातक आहे? त्याविषयीचा हा आढावा…

इराणचे सेज्जिल क्षेपणास्त्र किती घातक?

सेज्जिल हे इराणच्या शस्त्रागारातील सर्वात प्रगत आणि घातक क्षेपणास्त्रांपैकी एक मानले जाते. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता सुमारे २,००० ते २,५०० किलोमीटरपर्यंत असल्याने पश्चिम आशियातील अनेक देश त्याच्या टप्प्यात येतात. सेज्जिल हे घन इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र आहे. द्रव इंधनाच्या क्षेपणास्त्रांच्या तुलनेत हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी अतिशय कमी वेळ लागतो. शत्रू देशावर दोन टप्प्यात मारा करण्यासाठी या क्षेपणास्त्राची रचना करण्यात आलेली आहे. सेज्जिल क्षेपणास्त्र आवाजाच्या वेगापेक्षा कित्येक पटीने जास्त वेगाने प्रवास करते. शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवा देण्यास ते सक्षम मानले जाते. हे क्षेपणास्त्र साधारण ५०० ते १,००० किलो वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते. २००८ व २००९ मध्ये पहिल्यांदा या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आणि २०१२ नंतर ते इराणच्या लष्करात समाविष्ट करण्यात आले. अमेरिका व इस्रायलबरोबरच्या युद्धात इराणने या क्षेपणास्त्राचा वापर करून आपली लष्करी ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. सेज्जिल क्षेपणास्त्राच्या समावेशामुळे मध्यपूर्वेतील युद्धाची तीव्रता आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इराणच्या हल्ल्यात आखाती देशांचे किती नुकसान?

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (आयआरजीसी) रविवारी इस्रायल आणि आखाती देशांविरोधातील युद्धात मोठी आघाडी उघडली. इराणने आपल्या ताफ्यातील सर्वात घातक ‘सेज्जिल’क्षेपणास्त्रासह इतर अनेक प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करून शत्रूच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यांत प्रामुख्याने अल-हरिर एअर बेस, अली अल-सालेम एअर बेस, कॅम्प आरिफजान कुवेत या लष्करी तळांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जात आहे. इराणने युद्धात पहिल्यांदाच सेज्जिल क्षेपणास्त्राचा वापर केल्याने इस्रायलच्या लष्करी तुकड्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे सांगितले जात आहे. रविवारी झालेल्या या हल्ल्यानंतर कुवेत आणि इतर आखाती देशांमधील अमेरिकन आणि स्थानिक लष्करी तळांवर हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आणखी वाचा : युद्धकाळात गुंतवणूक कशी करावी? अनिश्चिततेतही एसआयपी तारणार?

इराणने गेल्या वर्षीही केला होता ‘सेज्जिल’चा वापर

गेल्या वर्षी जून २०२५ मध्येही इस्रायल व इराण यांच्यातील संघर्ष उफाळून आला होता. जवळपास १२ दिवस चाललेल्या त्या युद्धात इराणने सेज्जिल क्षेपणास्त्राचा वापर करून अमेरिकेसह आखाती देशांना चकित केले होते. त्यावेळी इराणने तेल अवीवपासून ९० किमी अंतरावर असलेल्या ‘बेअर शेवा’ येथील दोन महत्त्वाच्या लष्करी लक्ष्यांना या सेज्जिल क्षेपणास्त्राद्वारे लक्ष्य केले होते. या हल्ल्यामुळे इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. सेज्जिल या क्षेपणास्त्राला ‘डान्सिंग मिसाईल’ असेही संबोधले जाते, कारण ते हवेत आपला मार्ग बदलण्यास आणि शत्रूच्या संरक्षण यंत्रणेला चकवा देण्यास सक्षम आहे. तज्ज्ञांच्या मते, इराणचे सेज्जिल क्षेपणास्त्र इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेला भेदू शकेल का हे सांगणं खूपच कठीण आहे. मात्र, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने असा दावा केलाय की, सेज्जिल क्षेपणास्त्रामुळे इस्रायलच्या प्रमुख शहरांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे इस्रायलने मात्र हा दावा खोडून काढला आहे.

युद्धात २,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

अमेरिका-इस्रायल व इराण यांच्यातील युद्ध सुरू होऊन जवळपास तीन आठवड्यांचा कालावधील लोटला आहे. या संघर्षात कोणीही माघार घेण्यास तयार नसल्याने परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. या युद्धात आतापर्यंत २,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून पश्चिम आशियात भीतीचे वातावरण पसरले आहे. इस्रायल सरकारने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या हल्ल्यात आतापर्यंत १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये १ मार्च रोजी जेरुसलेमजवळील ‘बीत शेमेश’ येथे झालेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्याचा समावेश आहे, ज्यात नऊ जणांना आपले प्राण गमावावे लागले आहे. प्रत्युत्तरात इस्रायली लष्कराने दक्षिण लेबनॉनमध्ये इराणचे दोन सैनिक मारल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाची एवढी भीती का? नेमके काय आहे या विधेयकात?

युद्धविराम शक्य नाही : इराणचा आक्रमक पवित्रा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना या युद्धावर भाष्य केले आहे. इराण युद्ध थांबवण्यास तयार आहे, पण आम्हाला आता ते मान्य नाही, कारण युद्धविरामाच्या अटी अजून पुरेशा समाधानकारक नाहीत. कोणत्याही करारासाठी अटी अत्यंत कडक आणि ठोस असाव्या लागतील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, इराणने युद्धविरामाची कोणतीही शक्यता फेटाळून लावली आहे. सध्या आम्ही युद्धविरामाबाबत कोणताही विचार करीत नसल्याचे इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही हीच भूमिका मांडली आहे. या युद्धाची ठिगणी डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे पडली आहे. आम्ही आमच्या देशातील नागरिकांचे संरक्षण करण्यात सक्षम आहोत. जोपर्यंत ट्रम्प स्वत:हून माघार घेत नाही, तोपर्यंत आम्हीही युद्धविराम करणार नाही, असे अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले, त्यामुळे मध्यपूर्वेतील हे युद्ध आणखी किती दिवस चालणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.