Iran Ghadir Submarine Vs US Navy In Strait of Hormuz Strategic Conflict: जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत सध्या इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात युद्धतणाव वाढला आहे. या संघर्षात इराणचे सर्वात मोठे शस्त्र अण्वस्त्रे नसून, त्यांच्या छोटेखानी ‘घादीर’ (Ghadir Class) या पाणबुड्या आहेत. या पाणबुड्यांनी सध्या अमेरिका आणि इस्रायलच्या नौदलाची झोप उडवली आहे.

समुद्राखाली सोनारलाही चकवा

जगातील तेलपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महत्त्वाचा असलेला मार्ग म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz). जागतिक तेलपुरवठ्यापैकी साधारण २० ते २५ टक्के आणि द्रवरूप नैसर्गिक वायू (LNG) पुरवठ्यापैकी सुमारे १९ टक्के वाहतूक दररोज याच मार्गाने होते. म्हणूनच, येथे निर्माण होणारा कोणताही तणाव थेट जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करतो. सध्या सुरू असलेल्या इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल युद्धात आज अमेरिकेच्या नौदलाला सर्वाधिक भीती आहे ती समुद्राखालच्या गोष्टींचा शोध घेणाऱ्या सोनारलाही चकवा देणाऱ्या इराणच्या छोटेखानी पाणबुड्यांचा. इराणी नौदलाच्या या छोटेखानी पाणबुड्या घदीर वर्गातील असून त्यांना इराणच्या ‘सायलेंट हंटर्स’ अर्थात आवाज न करणाऱ्या घातक शिकारी म्हटलं जातं.

घादीर पाणबुड्या नेमक्या आहेत काय?

घादीर वर्गातील पाणबुड्या आकाराने फक्त २९ मीटर लांब असून त्यांचे वजनही केवळ १२० ते १५० टन एवढेच असते. पारंपरिक पाणबुड्यांच्या तुलनेत हा आकार आणि वजन त्यांच्या केवळ एक १०% टक्क्यांएवढाच आहे. यांचा मुख्य फायदा म्हणजे डिझाइन. या पाणबुड्या खास करून पर्शियन गल्फसारख्या उथळ आणि रहदारी असलेल्या सागरी पट्ट्यात काम करण्यासाठी खास तयार करण्यात आल्या आहेत. मोठ्या पाणबुड्यांना खोल पाणी आवश्यक असते; पण घादीर केवळ ३० मीटर उथळ पाण्यातही सहज आणि परिणामकारक काम करू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पाणबुड्या सागरतळाशी शांतपणे दडून राहातात. वरून जाणाऱ्या जहाजांच्या आवाजात स्वतःचा आवाज लपवून त्या शत्रूच्या सोनारपासून जवळपास अदृश्य राहातात, त्यामुळेच त्यांना हुडकणे ही सर्वात कठीण गोष्ट असते.

Iran Ghadir Submarine in Strait of Hormuz | इराणची घादीर पाणबुडी आणि अमेरिकन नौदल | Iranian Silent Hunter Submarine US Navy threat | होर्मुझची सामुद्रधुनी इराण पाणबुडी हल्ला
होरमुझची सामुद्रधुनी (Photo- Gemini)

‘हिट अॅण्ड डिस्अपिअर’

या छोट्या पाणबुड्यांची खरी ताकद त्यांच्या शस्त्रास्त्रांमध्ये आहे:

  • पाणतीर (टॉर्पेडो) हल्ला: ५३३ मिमी टॉर्पेडो ट्यूब्सद्वारे अतिवेगाने हल्ला.
  • सुपरकॅव्हिटेटिंग टॉर्पेडो: पाण्यात ३५० किमी/ ताशी वेगाने जाणारे आणि जहाजांना चुकवणे जवळपास अशक्य असलेले पाणतीर त्यांच्या भात्यात आहेत.
  • क्रूझ मिसाइल (Jask-2): पाण्याखालूनच ३०० किमी अंतरावर हल्ला करण्याची क्षमता.
  • नौदलाचे पाणसुरुंग (Naval Mines): सर्वात धोकादायक शस्त्र. रात्रीच्या वेळी जहाजांच्या मार्गात हे पाणसुरुंग पसरण्याची त्यांची क्षमता शत्रूसाठी अतिशय घातक असते.

एका घादीर पाणबुडीने ४ ते ८ पाणसुरुंग पाण्याखाली पेरले, तरी संपूर्ण मार्ग काही आठवड्यांसाठी बंद पडू शकतो. कारण पाणसुरुंग शोधणे आणि निष्क्रिय करणे ही अत्यंत वेळखाऊ आणि धोकादायक प्रक्रिया असते.

किती पाणबुड्या सक्रिय?

उपलब्ध अंदाजानुसार, इराणकडे २० पेक्षा अधिक घादीर पाणबुड्या आहेत. मात्र, त्यापैकी सध्या साधारण १० ते १६ कार्यरत असल्याचे मानले जाते. या पाणबुड्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची ‘लाँचिंग पद्धत’. अनेक पाणबुड्या Hormozgan Province मधील डोंगरकड्यांमध्ये बनवलेल्या गुप्त बोगद्यांतून थेट समुद्रात प्रवेश करतात. त्यामुळे त्या उपग्रहांच्या नजरेपासूनही दूर राहतात.

होर्मुझ ‘डेंजर झोन’

घादीर पाणबुड्या होर्मुझला ‘डेंजर झोन’ ठरण्याची, तीन प्रमुख कारणे आहेत:

१. अरुंद आणि रहदारीचा समुद्रमार्ग

जहाजांची सततची वर्दळ आणि कमी खोली यामुळे सोनार प्रणाली इथे परिणामकारकपणे काम करत नाही.

२. ‘अॅम्बुश’ स्ट्रॅटेजी

या पाणबुड्या समुद्रतळावर शांतपणे थांबून टँकर्सवर अचानक हल्ला करू शकतात.

३. पाणसुरुंगांचा धोका

थेट हल्ल्यापेक्षा पाण्याखाला सुरुंग पेरून संपूर्ण मार्गच बंद करण्याची क्षमता अधिक प्रभावी ठरते.

अमेरिकन नौदलासाठी ‘ऑपरेशनल फ्रिक्शन’

या पाणबुड्या थेट युद्ध जिंकण्यासाठी नाहीत, तर शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी वापरल्या जातात. यालाच ‘असिमेट्रिक वॉरफेअर’ किंवा छुपे युद्ध म्हणतात. United States Navy साठी हा मोठा डोकेदुखीचा विषय आहे. कारण त्यासाठी…

  • सतत हवाई देखरेख (A-10, Apache) आवश्यक असते
  • युद्धनौकांना वेग कमी करावा लागतो
  • हल्ल्याच्या भीतीने सुरक्षित अंतर वाढवावे लागते

यामुळे त्यांच्या ऑपरेशन्सची गती कमी होते, एकूणच या साऱ्यामुळे इराणचा उद्देश साध्य होतो आहे.

घादीरव्यतिरिक्त इराणचा पाणबुडी ताफा

इराणकडे इतर प्रकारच्या पाणबुड्याही आहेत:

फतेह वर्गातील पाणबुड्या ( Fateh-class submarine)
६०० टन, ३५ दिवस पाण्याखाली राहण्याची क्षमता
सद्यस्थिती: बंदर अब्बास येथील हल्ल्यात बहुतांश नष्ट

किलो वर्गातील पाणबुड्या (Kilo-class submarine)
३००० टन, रशियन ‘ब्लॅक होल’ पाणबुड्या
सद्यस्थिती: बहुतांश पाणबुड्या हल्ल्यात क्षतिग्रस्त

Nahang submarine
विशेष ऑपरेशन्ससाठी
सद्यस्थिती: १ सक्रिय

तसेच, इराणकडे मानवरहित पाणबुडी (UUVs) आणि डायव्हर-डिलिव्हरी व्हेइकल्स (SDVs) देखील आहेत.

इराणची ‘पाण्याखालची’ रणनीती

इराणने तीन मुख्य झोनमध्ये आपली रणनीती आखली आहे:

१. अँबुश झोन

Qeshm Island आणि Larak Island परिसरात पाणबुड्या तैनात.

२. कोस्टल टनेल्स

डोंगरकड्यांमधून थेट समुद्रात प्रवेश.

३. चोक पॉइंट

Greater Tunb आणि Lesser Tunb येथे अरुंद मार्गाचा – पाणसुरुंग पेरण्यासाठी वापर.

आतापर्यंतची युद्धस्थिती

अलीकडच्या युद्धातील कारवाईबाबत अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा:

IRIS Fateh ३ मार्च रोजी नष्ट
११ मार्चपर्यंत इराणी पाणबुड्या बुडवल्याचा अमेरिकेचा दावा

तरीही, घादीर पाणबुड्या अद्याप कार्यरत आहेत आणि अमेरिकेविरोधात हाच इराणचा खरा गनिमी कावा आहे.

आकार लहान तरीही निर्णायक

घादीर पाणबुड्या युद्ध जिंकण्यासाठी नाहीत तर त्या अमेरिका आणि इस्रायलला गनिमी काव्याने युद्धात नामोहरम करण्यासाठी आहेत.

त्या थेट अमेरिकेसारख्या महासत्तेला हरवू शकत नाहीत. पण त्या होर्मुझसारख्या महत्त्वाचा मार्गा रोखून धरू शकतात.

आणि इथेच त्यातच त्यांची खरी ताकद आहे. हल्ला करण्यापेक्षाही होर्मुझचा मार्ग रोखून धरणं इराणसाठी अधिक प्रभावी शस्त्र ठरू शकतं, असं विश्लेषकांना वाटतं.

थोडक्यात महत्त्वाचे

१. छोट्याखानी पाणबुड्या म्हणजे काय?
तर आकाराने लहान, शांत आणि उथळ पाण्यात काम करणाऱ्या पाणबुड्या, ज्यांचा शोध घेणे आधुनिक यंत्रणांनाही कठीण जातं.

२. त्या धोकादायक का?
पाणसुरुंग पसरवून त्या संपूर्ण सागरीमार्ग बंद करू शकतात.

३. त्या मोठ्या नौदलाला आव्हान देऊ शकतात का?
थेट नाही. पण त्यांना नामोहरम करण्याची क्षमता राखतात. सागरी व्यापाराला विलंब लागू शकतो आणि त्यामुळे खूप मोठे आर्थिक नुकसान होवू शकते.