West Asia War 5 Things to Know: पश्चिम आशियात युद्ध सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले आहेत. हे युद्ध पुढील काही दिवसांत थांबण्याची कोणतीच चिन्हे अद्याप दिसत नाहीत. इराणचे खर्ग बेटावर तेल निर्यातीसाठी उभारलेले सर्वात मोठे टर्मिनल आहे. खर्ग बेटावर असलेल्या इराणच्या लष्करी तळांवर अमेरिकेने हल्ला केला. इराणमधील तेलाशी संबंधित पायाभूत सुविधांवर यापुढे हल्ला केला जाईल असा इशाराच अमेरिकेने या हल्ल्यातून दिला. त्यातच अमेरिकेच्या अनेक युद्धनौका आता पश्चिम आशियाच्या दिशेने सरकत आहेत.
मागील वर्षी जून २०२५ मध्ये इस्रायल-इराणमध्ये १२ दिवस युद्ध चालले होते. त्या युद्धापेक्षा सध्या सुरू असलेल्या युद्धाची तीव्रता अधिक आहे. त्याचा परिणाम जगावर होत आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद होणे, तेलाच्या किंमतीत वाढ होणे तसेच इंधन, गॅस यांचा तुटवडा होणे, अशा समस्यांचा जगाला सामना करावा लागत आहे. युद्धात फार काळ टिकण्याची क्षमता इराणकडे नाही, असा अमेरिकेचा समज होता. तो अमेरिकेसाठी गोडगैरसमज ठरल्याचे स्पष्ट होत आहे. या दरम्यान, इस्रायलचा आता लेबनॉनशी संघर्ष सुरू झाला आहे. लेबनॉनची राजधानी बैरुतवर इस्रायलने नुकतेच हल्ले चढवले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एकीकडे कस लागला आहे.
१. हे तिसरे महायुद्ध नाही, पण…
इस्रायल-इराणमध्ये मागील वर्षी झालेल्या युद्धापेक्षा सध्या सुरू असलेल्या युद्धाची तीव्रता अधिक आहे. अमेरिका व इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणने जोरदार प्रत्युत्तर देणे सुरू केले. इराणने ११ देशांवर बॅलेस्टिक मिसाइल व शाहेद ड्रोनने हल्ला केला. त्यात इस्रायल, सौदी अरेबिया, यूएई, बहरीन, कुवैत, कतार, ओमान, इराक, टर्की, अजरबैजान आणि सायप्रस या देशांचा समावेश आहे. या देशांमधील लष्करी तळ, तेलाशी संबंधित पायाभूत सुविधा व नागरी वसाहतींना इराणने लक्ष्य केले. दरम्यान, सायप्रस येथील ब्रिटिश एअरबेसला इराणने लक्ष्य केल्यानंतर युकेचे तिथे काय काम? असा प्रश्न उपस्थित झाला.
आतापर्यंत २० देशांनी पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचे म्हटले आहे. हे देश शस्त्र, दारूगोळा तसेच गुप्तचर माहितींची युद्धात देवाणघेवाण करत आहेत. या देशांमध्ये युरोपातील फ्रान्स, जर्मनी, इटली आणि रशिया या देशांचा समावेश आहे. या युद्धात चीन थेट सहभागी झाला तर युद्धाचे रूपांतर तिसऱ्या महायुद्धात होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, चीनने आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रिया पाहता तिसऱ्या महायुद्धाची शक्यता कमी आहे. जगाच्या एका भागात सुरू असलेल्या या युद्धाचा गंभीर परिणाम जगावर होत आहे. डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या प्रशासनाने इराणच्या युद्धक्षमतेबाबत लावलेला अंदाज साफ चुकीचा ठरला आहे.
२. इराण अजूनही ढासळलेला नाही
अमेरिका-इस्रायल यांच्याबरोबर सुरू असलेल्या युद्धात इराण अजूनही तग धरून आहे. इराणच्या युद्धक्षमतेवर अमेरिकन सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासगीत आश्चर्य व्यक्त केले. इराणच्या हवाई क्षेत्रावर अमेरिका व इस्रायलने पूर्ण नियंत्रण मिळवले आहे. तरीही इराण हार मानायला तयार नाही. इराणमध्ये ५ हजारांहून अधिक ठिकाणांवर अमेरिकेने हवाई हल्ले केले. त्यामुळे इराणला मोठे नुकसान झाले आहे. पण तरीही इराणने अद्याप माघार घेतलेली नाही. मागील वर्षी जून महिन्यात अमेरिकेने US B-2 बॉम्बर्स लढाऊ विमानांचा वापर करून इराणच्या फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन अणुतळांना लक्ष्य केले होते. तेव्हापासून इराणने भविष्यात मोठ्या युद्धाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, असे गृहीत धरून युद्धाची तयारी सुरू केली होती.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी त्यावेळी वरिष्ठ अधिकारी, नेते व क्लेरिक यांना बोलावून घेतले होते. युद्धाची परिस्थिती केव्हाही येऊ शकते, त्यामुळे तुमच्या पुढच्या चार वारसदारांची नावे द्या, असे खामेनी यांनी वरिष्ठ अधिकारी व नेत्यांना म्हटले होते. त्यामुळे इराणच्या विविध विभागांमधील, सैन्यांमधील टॉप अधिकारी मारले गेले, तरी पुढची फळी तयार आहे. खामेनी यांनी आखून दिलेल्या या रणनीतीने इराणची व्यवस्था ढासळण्यापासून बचावली आहे. व सध्या अमेरिकेशी दोन हात करत आहे.
३. फायदा कोणाला? बिन्यामिन नेतान्याहूंना?
इराणमध्ये ३७ वर्षांपासून सत्ता असलेले सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अमेरिका-इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर इराणने आजपर्यंत जे उभे केले उद्ध्वस्त करणे इस्रायलला शक्य होत आहे. हल्ले करून इराणला कमकुवत केले जात आहे. इस्रायल हा इराणला सर्वात मोठा शत्रू मानतो. ट्रम्प यांना या युद्धाने जितका फायदा होईल, त्यापेक्षा अधिक फायदा नेतान्याहू यांना होत आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. त्यात ११९५ इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नेतान्याहू यांनी बदला घेण्यासाठी गाझा पट्टीवर सतत हल्ले केले. त्यात ७३ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे २३ लाख लोकांना अन्न मिळणेही मुश्कील झाले. दरम्यान, तेव्हापासून इस्रायलने सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी, हमासचे इस्माईल हानियेह आणि याह्या सीनवर व हेजबोल्लाहच्या हसन नसरल्लाह यांना संपवले. इस्रायलमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये नेतान्याहू यांना या मुद्द्यांवर निवडणूक जिंकता येऊ शकते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
४. पश्चिम आशियातील युद्ध, भारताची सावध भूमिका
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर भारताने सावधगिरी बाळगली आहे. हा हल्ला होण्याचे चाळीस तास आधी पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये होते. त्यामुळे भारत इस्रायलच्या बाजूने आहे, असा आरोप देशातील विरोधकांकडून करण्यात आला. भारताने अमेरिका व इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा निषेध केलेला नाही. पण इराणने आखाती देशांवर केलेल्या हल्ल्यांचा भारताने निषेध केला. आखाती देशांमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला, असे इराणने म्हटले. आखाती देश हे व्यापाराच्या दृष्टीकोनातून भारतासाठी महत्वाचे आहेत. एक कोटीहून अधिक भारतीय कामानिमित्त पश्चिम आशियात राहतात. भारताला लागणारी ६० टक्के ऊर्जा ही आखाती देशांमधून आयात केली जाते. (जवळपास ५० टक्के तेल आणि ७० टक्के नैसर्गिक वायू)
आखाती देश अमेरिका व इस्रायलच्या लष्कराला व गुप्तचर यंत्रणांना आश्रय देतात, त्यामुळे त्यांच्यावर हल्ला केला, असे इराणने म्हटले आहे. दरम्यान, भारत व इराणचे संबंध ऐतिहासिक आहेत. जवळपास नऊ हजार भारतीय विद्यार्थी इराणमध्ये वास्तव्य करतात. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचा भारताने वरिष्ठ पातळीवर निषेध केलेला नाही. पण, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणच्या दुतावासात ठेवलेल्या शोक पुस्तिकेवर सही केली आहे.
पश्चिम आशियातील युद्धाची झळ भारताच्या जवळही दिसून आली. इराणी युद्धनौका आयआरआयएस देनाला अमेरिकेच्या पाणबुडीने श्रीलंकेच्या किनारपट्टीवर उडवले. या युद्धनौकेतील इराणी नौदलाचे जवान भारतात झालेल्या युद्धसरावानंतर परतत होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील आठ देशांच्या प्रमुखांशी फोनवर संपर्क साधला आहे. मागील दोन आठवड्यात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर चार वेळा चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसौद पेझिश्कियान यांच्याशीही फोनवरून चर्चा केली आहे. भारतात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा झाल्याने लोक परेशान आहेत. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपण्याची प्रतिक्षा भारत करत आहे.
५. युद्ध थांबेल का ?
इराणमध्ये आता काही शिल्लक नाही, हे युद्ध अमेरिकेने जिंकले आहे, असे ट्रम्प यांनी मागील काही दिवसांपासून सातत्याने म्हटले. त्यामुळे अमेरिकेकडून हे युद्ध थांबवले जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. परंतु, अमेरिकेने पश्चिम आशियात अतिरिक्त युद्धनौका तसेच सैन्य तैनात केले आहे. जागतिक पातळीवर तेलाच्या किंमती वाढत आहेत. बाजारपेठेवर परिणाम होत आहे, त्यामुळे ट्रम्प काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. दरम्यान, युद्ध सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे या युद्धात काय साध्य करायचे आहे, त्याबाबतचे मत सातत्याने बदलले. इराणमध्ये सत्तांतर करायचे, इराणच्या अणुकार्यक्रमांना बंद पाडायचे, इराणच्या मिसाइल व संरक्षण क्षमतेला उद्ध्वस्त करायचे अशी वेगवेगळी विधाने ट्रम्प यांच्याकडून एकापाठोपाठ करण्यात आली.
इराणच्या बुशेहर शहरात अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांनी इराणच्या औद्योगिक व लष्करी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेचे बॉम्ब फक्त युरेनियम साठ्यांवर अद्याप पडलेले नाहीत. अण्वस्त्र बनवण्यासाठी युरेनियमचा वापर केला जातो. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते, तसेच इराणची औद्योगिक व लष्करी क्षमता कमी करण्याचे श्रेय ट्रम्प घेऊ शकतात. इराणने हवाई क्षेत्र गमावले असले तरी पाण्यात मात्र इराण लढा देत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीच्या माध्यमातून इराण अमेरिकेला आव्हान देत आहे. या युद्धात सहभागी दोन्ही बाजू युद्धात विजयी झाल्याची घोषणा करू शकतात, पण हे युद्ध कधी थांबेल हाच खरा प्रश्न आहे.
