Iran India Kashmir Controversy: आंतरराष्ट्रीय राजकारणात शब्द आणि संदर्भांना कमालीचे महत्त्व असते. कधीकधी एका साध्या ‘धन्यवाद’च्या पोस्टमुळेही दोन देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो किंवा तिसऱ्या देशाच्या पोटात गोळा येऊ शकतो. सध्या भारत आणि इराणच्या संबंधांच्या बाबतीत असेच काहीसे घडले आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने इस्रायलच्या दिशेने डागलेल्या क्षेपणास्त्रांवर भारतीय जनतेचे आभार असा संदेश लिहिल्याचे समोर आले आहे. मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासाने आणि इराणी माध्यमांनी शेअर केलेल्या दृश्यांमध्ये, इराणच्या एरोस्पेस फोर्सचे कर्मचारी क्षेपणास्त्रांवर असे संदेश लिहिताना दिसतात. स्पेन, पाकिस्तान आणि जर्मनीसारख्या देशांमधील लोकांचेही याच माध्यमातून आभार मानण्यात आले.

या संदेशांमागे भारत-इराण संबंधांची पार्श्वभूमीही महत्त्वाची मानली जाते. अलीकडेच इराणने होर्मूज सामुद्रधुनीत भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग दिला आहे. परंतु, त्यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी इराणच्या युद्धग्रस्त नागरिकांसाठी केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर इराणच्या दूतावासाने केलेल्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि त्यानंतर त्या पोस्ट्स हटवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

वादाची नेमकी ठिणगी कशी पडली?

इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी कारवायांमुळे त्रस्त असलेल्या इराणी जनतेसाठी भारतातून मोठ्या प्रमाणावर मानवतावादी मदत पाठवण्यात आली. यामध्ये केवळ सरकारचाच सहभाग नव्हता, तर सामान्यांनीही आपले योगदान दिले होते. इराणमधील पीडितांसाठी काश्मीरमधून रोख रक्कम, दागिने, पशुधन आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवण्यात आली.

Iran's 'Thank You' message
Image: X/ @IRANinMumbai(

या मदतीची दखल घेत दिल्लीतील इराणच्या दूतावासाने त्यांच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून काही पोस्ट्स शेअर केल्या. यामध्ये काश्मीरमधील लोकांचे आभार मानताना त्यांनी थँक्यू इंडिया (Thank you, India) असे लिहिले होते. एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते, “इराणच्या जनतेला पाठिंबा देणाऱ्या काश्मीरमधील प्रेमळ लोकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. तुमचे हे प्रेम आम्ही कधीही विसरणार नाही. धन्यवाद भारत.”

इतकंच नाही, तर दूतावासाने एका विधवेची हृदयस्पर्शी कथाही शेअर केली होती, जिने आपल्या पतीची २८ वर्षांची आठवण म्हणून जपलेला सोन्याचा दागिना इराणच्या मदतीसाठी दान केला होता. मात्र, काही तासांतच या दोन्ही पोस्ट्स गुपचूप हटवण्यात आल्या आणि त्याऐवजी एक नवीन व्हिडिओ शेअर केला गेला, ज्यामधून ‘भारत’ आणि ‘काश्मीर’ या दोन्ही नावांचा उल्लेख डिलीट करण्यात आला होता.

पाकिस्तानचा आक्षेप आणि इराणची माघार

इराणने या पोस्ट्स का हटवल्या, याचे स्पष्टीकरण दिले नसले तरी सोशल मीडियावरील हालचालींनुसार त्याचे धागेदोरे पाकिस्तानशी जुळताना दिसतात. इराणच्या पोस्टमध्ये काश्मीरला भारताचा भाग म्हणून संबोधल्यामुळे पाकिस्तानातील युजर्सनी संताप व्यक्त केला होता. काश्मीर हा वादग्रस्त भाग आहे, असा दावा करत पाकिस्तानी युजर्सनी इराणला आपली भूमिका बदलण्याचे आणि माफी मागण्याचे आवाहन केले होते. इराणच्या दूतावासाला टॅग करून हजारो पाकिस्तानी हँडल्सनी #StandWithKashmir आणि इराणविरोधी ट्रेंड सुरू केला होता. इराण सध्या इस्रायलशी लढत असताना त्याला ‘पॅलेस्टाईन’च्या मुद्द्यावर मुस्लिम देशांचा पाठिंबा हवा आहे. पाकिस्तानने याच गोष्टीचा फायदा घेऊन इराणला सायबर ब्लॅकमेलिंग केले. म्हणूनच असे मानले जात आहे की, पाकिस्तानच्या या दबावामुळे आणि सायबर ट्रोलिंगमुळे इराणने तातडीने त्या पोस्ट्स हटवून केवळ “आम्ही तुमचे प्रेम विसरणार नाही” असा त्रोटक मेसेज पोस्ट केला. इराणच्या या भूमिकेमुळे भारतात मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

भारताची प्रतिक्रिया: केवळ राजनैतिकच नाही तर तात्विक विरोध

भारतातील अनेक विचारवंत आणि माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी इराणच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी या वादाला एक वेगळा पैलू दिला. त्यांच्या मते, इराणने केवळ पाकिस्तानी दबावामुळे पोस्ट हटवली हे चुकीचे आहेच, पण मूळ पोस्टमध्ये केवळ ‘काश्मीर’चा उल्लेख करणेही भारतासाठी आक्षेपार्हच होते.

सिब्बल यांच्या मते, इराणने विशेषतः काश्मीरमधील लोकांचे आभार मानणे म्हणजे या मदतीला धार्मिक रंग देण्यासारखे आहे. “केवळ काश्मीरमधील मुस्लिमांनीच मदत केली, असा अर्थ यातून ध्वनित होतो. यामुळे उर्वरित भारतातील मुस्लिम आणि इतर नागरिकांच्या योगदानाकडे दुर्लक्ष होते,” असे त्यांनी नमूद केले. म्हणजेच इराणने ‘काश्मीर’ हा वेगळा घटक म्हणून मांडणे भारताच्या अखंडतेच्या धोरणाशी विसंगत होते.

काश्मीर आणि भारत-इराण संबंधांतील गुंतागुंत

भारत आणि इराण यांचे व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध जुने आहेत. विशेषतः चाबहार बंदर आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. मात्र, काश्मीरच्या मुद्द्यावर इराणची भूमिका नेहमीच संवेदनशील राहिली आहे. २०१९ मध्ये भारताने काश्मीरमधील ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी काश्मीरमधील मुस्लिमांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती, ज्यावर भारताने कडक शब्दांत राजनैतिक आक्षेप नोंदवला होता.

भारत नेहमीच ठामपणे सांगतो की, संपूर्ण काश्मीर हा भारताचा अविभाज्य आणि सार्वभौम भाग आहे. अशा स्थितीत इराणने पाकिस्तानी दबावाखाली येऊन ‘भारत’ हा शब्द वगळणे, हे भारताच्या सार्वभौमत्वाचा अनादर करण्यासारखेच आहे.

नव्या वादाला तोंड फुटले

इराणच्या दूतावासाने पोस्ट हटवून वाद शमवण्याचा प्रयत्न केलेला असला तरी, प्रत्यक्षात त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. मानवतावादी मदतीला जेव्हा राजकारणाची आणि सीमावादाची किनार लागते, तेव्हा मदतीचा मूळ हेतू मागे पडतो. हा प्रसंग हेच सुचवतो की, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मित्र देशदेखील आपल्या अंतर्गत मुद्द्यांवर कधी आणि कशी भूमिका घेतात, यावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

इतिहास, भूगोल आणि राजकारण यांच्या या खेळात एका ‘डिलीट’ केलेल्या पोस्टने हे सिद्ध केले की, काश्मीरचा मुद्दा जागतिक व्यासपीठावर अजूनही संवेदनशील आहे.