अमेरिका, इस्रायल व इराण या देशांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. अमेरिका व इस्रायलकडून इराणवर हल्ले केले जात आहेत, तर दुसरीकडे इराणने त्याच्या आजूबाजूच्या देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. तिन्ही देशांमध्ये युद्धाजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आखाती देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने तेलाच्या, इंधनाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कधीकाळी याच तेलामुळे इराण व इस्रायलमध्ये अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. दोन्ही देशांनी गुप्तपणे एकत्र येऊन एक ‘सिक्रेट पाइपलाइन’ तयार केली होती.
१९६७ मध्ये इस्रायल व इजिप्त या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाले होते. ते युद्ध सहा दिवस चालले. त्यानंतर इजिप्तने सुएझ कालवा बंद केला. त्यामुळे इस्रायलची तेल आयात थांबली होती. इस्रायलला तेल आयात करणे अवघड होऊन बसले होते. तेल मिळवण्यासाठी दुसरा कोणता पर्यायी मार्ग आहे का? याची चाचपणी इस्रायल करत होता. त्यावेळी तेलाची विक्री करण्यासाठी इराण देखील पर्यायी मार्गांच्या शोधात होता. इजिप्तने १९६७ पासून ते १९७५ पर्यंत सुएझ कालवा बंद ठेवला होता. दरम्यान, सुएझ कालव्याचा वापर करून जगभरातील १२ टक्के व्यापार केला जातो. तर ३० टक्के कंटेनर वाहतूक ही सुएझ कालव्यातून होते. युरोप व आशियाला जोडणारा हा सगळ्यात जवळचा मार्ग मानला जातो.
इस्रायल, इराणने एकत्र येऊन टाकली ‘सिक्रेट पाइपलाइन’
इजिप्तने सुएझ कालवा बंद केल्यानंतर १९६८ मध्ये इस्रायल व इराण या दोन देशांमधील संबंध सुधारले. दोन्ही देशांनी एकत्र येऊन लाल समुद्रातील इस्रायलच्या दक्षिणेकडील ईलात बंदरापासून ते भूमध्य समुद्रातील अश्कलोन बंदरापर्यंत पाइपलाइन टाकली. ईलात ते अश्कलोन ही पाइपलाइन एकूण २५४ किमी लांब होती. तर त्याची रूंदी ही ४२ इंच होती. “या पाइपलाइन मधून इंधन पुरवठा करण्यासाठी इराण हा एकमेव स्रोत आहे.”, अशी माहिती त्यावेळी सीआयएने तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांना दिली होती. त्यात सीआयएने म्हटले होते, “या पाइपलाइनचा वापर करून पूर्व युरोप मध्ये इंधन पाठवले जाईल. इराणमधून आलेले मोठे टँकर ईलात बंदरावर रिकामे होतील, त्यानंतर अश्कलोन येथून छोटे टँकर तेल पुढे युरोपकडे वाहून नेतील. ‘केप ऑफ गुड होप’ व सुएझ कालव्यापेक्षा या मार्गाने तेल वाहतूक करणे अधिक स्वस्त, परवडणारे आहे.”
पत्रकार जेव्हिअर ब्लास आणि जॅक फार्ची यांनी ‘द वर्ल्ड फॉर सेल’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, पर्शियन आखातातून इराणमधील तेल टँकरमध्ये भरले जाते. टँकर भरल्यानंतर गिब्रालटार येथे तेल पोहोचवले जाणार आहे, असे बंदरावरील अधिकाऱ्यांना सांगितले जाते. परंतु, टँकर गिब्रालटारला कधीच जात नाहीत. ते गुप्तपणे इस्रायलच्या ईलात बंदरावर टँकर रिकामे करतात व पु्न्हा इराणमध्ये रिकामे टँकर घेऊन परततात. दरम्यान, इस्रायलने या तेल पुरवठ्याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. इराणमध्ये १९७९ मध्ये इराणी क्रांती झाली. तो पर्यंत इस्रायल व इराणमध्ये या पाइपलाइनच्या वापराबाबत सामंजस्य होते. परंतु, त्यावर सर्वाधिक अधिकार मात्र इस्रायलचा होता.
तेल वाहतूक करणाऱ्या पाइपलाइनवर नियंत्रण कोणाचे?
तेल वाहतूक करण्यासाठी टाकण्यात आलेली पाइपलाइन ‘ईलात अश्कलोन पाइपलाइन कंपनी’च्या नियंत्रणात होती. २०१७ मध्ये ४९ वर्षांचा करार संपुष्टात आला. त्यानंतर आता या पाइपलाइनवर २०१९ पासून इस्रायलचे नियंत्रण आहे. इस्रायलच्या अर्थव्यवस्थेत होणाऱ्या ऊर्जेच्या वापरापैकी एकूण ७५ टक्के ऊर्जा ही या पाइपलाइनमार्फत पुरवली जाते. दरम्यान, मागील दशकभराच्या कालावधीत ही पाइपलाइन अनेकदा चर्चेत आली आहे. डिसेंबर २०१४ मध्ये या पाइपलाइनमधून तेलाची गळती झाली होती. त्यामुळे इस्रायलवर संकट ओढवले होते. २५४ पैकी ११९ किमी पाइपलाइन ही पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील भागातून गेली आहे.
दरम्यान, इराणचा इस्रायलबरोबर या पाइपलाइनवरून वाद सुरू आहे. २.९ दशलक्ष टन कच्चे तेल १९७८ मध्ये इराणने इस्रायलला दिले, असा दावा इराणचा आहे. त्याची रक्कम अद्याप मिळाली नसल्याचे इराणचे म्हणणे आहे. मे, २०१५ मध्ये १.१ अब्ज डॉलर इराणला देण्यात यावेत, असा निर्णय स्वीस न्यायालयाने दिला होता. दरम्यान, जून २०१६ मध्ये या निर्णयाला कायम ठेवण्यात आले. त्यावेळी इस्रायलने शत्रू राष्ट्राला कोणतेही पैसे देण्यास कायद्यानुसार बंदी असल्याचे सांगितले होते. २०११ मध्ये इस्रायलने इराणला शत्रू राष्ट्र घोषित केले आहे.
