अमेरिका आणि इस्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष वाढला आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रतिहल्ले केले असून युद्धाचा भडका उडाला आहे. इराणने अखाती देशांवरही हल्ले केले आहेत, त्यामुळे मध्यपूर्व व आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आता हल्ल्यांमुळे दुबई, अबू धाबी आणि दोहामध्ये भारतीय किती सुरक्षित आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. त्याच्या एका दिवसानंतर, रविवारी (१ मार्च) दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरूच होते.
तेहरानने अरब आखाती देशांवर पुन्हा हवाई हल्ले सुरू केले आहेत. संघर्षातील या वाढीमुळे जागतिक हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुबईसह पश्चिम आशियातील प्रमुख विमानतळ आज बंद ठेवण्यात आले आहेत. इराण, इस्रायल, इराक, कतार, बहरीन, कुवेत, सीरिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) वरील हवाई क्षेत्र बंद आहे; तर सौदी अरेबियाने अंशतः बंदी घातली आहे. हवाई वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पश्चिम आशियामध्ये लाखो भारतीय अडकून पडले आहेत. भारतीय अखाती देशांमध्ये किती सुरक्षित आहेत? भारत सरकारचे म्हणणे काय? जाणून घेऊयात…
इराणचे आखाती देशांवर हल्ले
इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी आखाती देशांना लक्ष्य केले आहे. तेहरानने युएई, कतार, बहरीन, कुवेत आणि ओमानवर हल्ले केले आहेत. त्यांनी या भागात असलेल्या अमेरिकन तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. एकट्या युएईला लक्ष्य करून २०० हून अधिक ड्रोन आणि १३७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, अशी माहिती युएईच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी दिली. यापैकी १४ ड्रोन वगळता सर्व हल्ले रोखण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले.
‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार, दुबईत पंचतारांकित हॉटेल्सना आग लागली, निवासी टॉवर्सच्या खिडक्यांचे नुकसान झाले आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नुकसान झाले. या हल्ल्यात एकूण सात जण जखमी झाल्याची माहिती आहे. अबू धाबी विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, एका ड्रोनचे अवशेष आंतरराष्ट्रीय विमानतळावर पडल्याने एका आशियाई नागरिकाचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले.
दुसऱ्या एका ड्रोनचे अवशेष अबू धाबीमधील इस्रायली दूतावास असलेल्या ‘इतिहाद टॉवर्स’ संकुलावर पडले, त्यामुळे एक महिला आणि तिचे मूल किरकोळ जखमी झाले. युएईच्या हवाई दलाने इराणची क्षेपणास्त्रे आणि ड्रोन पाडल्याने किमान तीन लोकांचा मृत्यू झाला असून ५८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. कतारमध्ये १८ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले असून, या हल्ल्यात १६ जण जखमी झाले आहेत. कतारमध्ये अमेरिकेचा मोठा हवाई तळ आहे. कुवेतमध्ये एका ड्रोनने विमानतळाला धडक दिली असून त्यात नऊ कामगार जखमी झाले आहेत.
कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या हल्ल्यांनंतर त्यांच्या हवाई दलाने ९७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि २८३ ड्रोन नष्ट केले आहेत. बहरीनमध्ये अमेरिकेचा मोठा नौदल तळ आहे, या ठिकाणी सरकारने ४५ क्षेपणास्त्रे आणि नऊ ड्रोन रोखल्याचे सांगितले. राजधानी मनामा येथील अनेक निवासी इमारतींना लक्ष्य करण्यात आल्याचे तेथील गृह मंत्रालयाने म्हटले आहे. सरकारी रुग्णालयांच्या माहितीनुसार, किमान चार जखमींवर उपचार सुरू आहेत. ओमानच्या किनारपट्टीवर एका ऑईल टँकरला लक्ष्य करण्यात आले असून त्यात चार जण जखमी झाले आहेत. या टँकरवरील १५ भारतीय आणि ५ इराणी नागरिकांसह सर्व २० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
पश्चिम आशियातील भारतीय नागरिक
जगातील सर्वाधिक परदेशस्थ भारतीय पश्चिम आशियात राहतात. अधिकृत आकडेवारीनुसार, या संघर्षाचा परिणाम झालेल्या देशांमध्ये सुमारे ९० लाख भारतीय राहतात. एकट्या पश्चिम आशियात सुमारे ९७ लाख भारतीय काम करतात. युएईमध्ये सुमारे ३९ लाख, सौदी अरेबियात २७.५ लाख, कुवेतमध्ये १०.१ लाख, कतारमध्ये ८.३० लाख, ओमानमध्ये ६.६२ लाख आणि बहरीनमध्ये ३.४७ लाख भारतीय आहेत. तसेच इराणमध्ये १०,७६५, इस्रायलमध्ये १.२३ लाख, इराकमध्ये १७,१०० आणि जॉर्डनमध्ये १७,०५० भारतीय आहेत. भारताला परदेशातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नात पश्चिम आशियाचा मोठा वाटा आहे. भारताच्या एकूण परकीय चलनापैकी ३८ टक्के वाटा आखाती देशांतून येतो आणि त्यातील निम्मी रक्कम केवळ युएईमधून येते.
पश्चिम आशियातील भारतीय सुरक्षित आहेत का?
वाढत्या संघर्षामुळे भारतीय नागरिक धोक्यात आले आहेत. एअर इंडियाने दिल्ली, मुंबई आणि अमृतसरहून युरोप आणि उत्तर अमेरिकेला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. इंडिगोने २ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत पश्चिम आशियाई हवाई क्षेत्राचा वापर करणाऱ्या फ्लाईट्स स्थगित केल्या आहेत. दुबईमध्ये अडकलेल्या एका मुलीच्या आईने सांगितले की, विमानतळ बंद असल्याने त्या हतबल झाल्या आहेत. कतारची राजधानी दोहा येथे राहणाऱ्या शैलजा यांनी सांगितले की, “मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. आम्ही घरातच थांबून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करत आहोत.”
पुण्यातील ‘इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज’ (आयएसबीएस) चे ८४ विद्यार्थी दुबईत अभ्यासासाठी गेले होते आणि ते आता तेथे अडकले आहेत. सर्व विद्यार्थी सुरक्षित असून त्यांना हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे, असे विद्यापीठाचे डीन जनार्दन पवार यांनी स्पष्ट केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, बल्लारीचे ३२ लोक दुबईत अडकले असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलली जात आहेत. जम्मू-काश्मीरमधील सुमारे १,२०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत.
त्यांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्यात आले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून आखाती देशांतील लाखो भारतीयांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याची विनंती केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सर्व भारतीयांना सतर्क राहण्याचे, भारतीय दूतावासांच्या संपर्कात राहण्याचे आणि स्थानिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तेहरान आणि इस्रायलमधील भारतीय दूतावासांनी नागरिकांना घरातच राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.
