पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात हजारो नागरिक, सैनिकांचे बळी जात आहेत आणि जागतिक अर्थव्यवस्था ढासळत आहे. पण या संघर्षामुळे निसर्ग, हवामानावरही मोठा परिणाम होत आहे. त्याची हानी अपरिमित असून अलीकडच्या काळातील अनेक युद्धांच्या तुलनेत हे युद्ध अधिक विध्वंसक ठरू लागले आहे.
सैनिकांच्या तैनातीमुळे प्रदूषण
बॉम्बहल्ल्यांमध्ये वापरले जाणारे जेट इंधन, तसेच तेल साठवणूक डेपो जळाल्याने उठणारे आगीचे लोळ आणि धुरामुळे पर्यावरणाला मोठे नुकसान होत आहे. या युद्धामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी ‘एएफपी’ या फ्रेंच आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने काही तज्ज्ञांशी चर्चा केली. अमेरिका आणि इस्रायलची विमाने पर्शियन आखातापर्यंत पोहोचण्यासाठी आणि इराणवर हवाई मोहिमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधन वापरतात, असे लंडनमधील क्वीन मेरी विद्यापीठाचे संशोधक बेंजामिन नेइमार्क यांनी सांगितले. स्टेल्थ बॉम्बर्स आणि लढाऊ विमाने दिवस-रात्र तैनात ठेवल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढवणाऱ्या हरितगृह वायूंचे वातावरणात मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. अमेरिकेच्या नौदलाकडेही मोठा ताफा आहे आणि तो काही काळ समुद्रात कार्यरत राहणार आहे. त्या ताफ्यातील मोठ्या संख्येने सैनिकांना अन्न, निवास आणि सतत काम करण्यासाठी व्यवस्था करावी लागत आहे. समुद्रावर तरंगणाऱ्या या शहरांसारख्या जहाजांना सतत ऊर्जा लागते. ही ऊर्जा काही अंशी प्रदूषण करणाऱ्या डिझेल जनरेटरमधून मिळते. या मोठ्या विमानवाहू नौका अणुऊर्जेवर चालतात. त्यामुळे त्या जीवाश्म इंधनांच्या तुलनेत कमी प्रदूषण करतात, पण डिझेलमुळे अंशतः प्रदूषण होतेच.
जाळ, धुरामुळे घातक रसायने हवेत
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्षात तेलसाठे आणि क्षेपणास्त्र तळांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर दीर्घकालीन वाईट परिणाम होऊ शकतात, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा संघर्ष सुरू झाल्यापासून यूकेमधील कॉन्फ्लिक्ट अँड एन्व्हायर्नमेंट ऑब्झर्व्हेटरी (सीईओबीएस) या संस्थेने पर्यावरणाला संभाव्य नुकसान करणाऱ्या ३०० पेक्षा जास्त घटनांची नोंद केली आहे. यात क्षेपणास्त्र तळांवरील हल्ले तसेच पर्शियन आखातातील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यांचा समावेश आहे. मात्र संशोधकांचे म्हणणे आहे की प्रत्यक्ष नुकसान यापेक्षा खूपच जास्त असण्याची शक्यता आहे. सीईओबीएसचे संचालक डग वेअर म्हणाले, “हे फक्त हिमनगाचे टोक आहे. अमेरिका सांगते की त्यांनी ५,००० ठिकाणांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत दिसत असलेले नुकसान म्हणजे एक छोटासा भाग आहे.” तेलसाठ्यांवरील अलीकडील हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशात गंभीर पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात, याविषयी संयुक्त राष्ट्रांनीही इशारा दिला आहे. त्याचा परिणाम सुरक्षित पाण्याच्या उपलब्धतेवर, लोकांना श्वास घेण्यासाठी लागणाऱ्या हवेत आणि अन्नपुरवठ्यावरही होऊ शकतो. या धोक्याचे एक उदाहरण म्हणजे ‘काळा पाऊस’.
तेहरानमध्ये काळा पाऊस का पडला?
इस्रायलने अनेक तेलसाठ्यांवर हल्ले केल्यानंतर तेहरान शहरात तेल आणि पावसाचे मिश्रण असलेला काळा पाऊस पडल्याची नोंद झाली. तेलसाठ्यांवरील आगीतून दाट काळा धूर निघून जवळपास एक कोटी लोकसंख्या असलेल्या तेहरान शहरावर पसरला. इराणच्या रेड क्रेसेंट संस्थेने नागरिकांना विषारी धूर टाळण्यासाठी घरातच राहण्याचा सल्ला दिला. काही लोकांनी डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सांगितले. युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅमचे वातावरणशास्त्रज्ञ झोंगबो शी यांच्या मते, या धुरात सूक्ष्म धुलिकण, सल्फर डायऑक्साइड आणि इतर विषारी रसायने असण्याची शक्यता आहे. असे सूक्ष्म कण फुफ्फुसांच्या आतपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यामुळे श्वसनाचे तसेच हृदयविकारांचे धोके वाढतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आधीपासून आजार असलेल्या लोकांसाठी हा धोका अधिक असतो.
युद्धामुळे नेमके किती कार्बन उत्सर्जन?
संघर्षामुळे पर्यावरणावर किती परिणाम होतो याचा अंदाज घेताना अनेक तज्ज्ञ फक्त युद्धातील स्फोट किंवा हल्लेच नव्हे, तर शस्त्रे आणि स्फोटके तयार करण्यापासून ते युद्धानंतरच्या पुनर्बांधणीपर्यंत सर्व गोष्टींचा विचार करतात. ‘वन अर्थ’ या जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, पश्चिम आशियातील संघर्षामुळे सुमारे ३३ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य उत्सर्जन झाले. हे प्रमाण पेट्रोलवर चालणाऱ्या ७.६ दशलक्ष कारच्या उत्सर्जनाइतके आहे, किंवा जॉर्डनसारख्या छोट्या देशाच्या वर्षभराच्या उत्सर्जनाइतके आहे. तसेच एका अंदाजानुसार, युक्रेनमधील युद्धामुळे ३०० दशलक्ष टनांहून अधिक अतिरिक्त कार्बन उत्सर्जन झाले आहे. हे प्रमाण फ्रान्सच्या वार्षिक उत्सर्जनाइतके आहे. हा अंदाज इनिशिएटिव्ह ऑन जीएचजी अकाउंटिंग ऑफ वॉर या संस्थेने मांडला असून त्यात लष्करी कारवाया, पुनर्बांधणी, जंगलातील आगी आणि विमानांना घ्यावे लागणारे लांब मार्ग यांचाही विचार करण्यात आला आहे.
१९९० च्या दशकात पहिल्या आखाती युद्धात कुवेतमधील तेल विहिरींना आगी लावण्यात आल्या होत्या. त्या आगी विझवायला अनेक महिने लागले आणि त्यातून १३ कोटी ते ४० कोटी टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य उत्सर्जन झाले, असा अंदाज आहे.
जल प्रदूषणाचाही धोका?
हवामानावरील परिणामांव्यतिरिक्त, ऊर्जा प्रकल्प, तेलवाहू जहाजे आणि लष्करी लक्ष्यांवर होणारे हल्ले हवा आणि पाणी प्रदूषित करतात आणि अत्यंत विषारी रसायने दूरपर्यंत पसरू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. तेहरानमध्ये गेल्या आठवड्यात इंधन साठवणूक केंद्रांवर झालेल्या हल्ल्यांमुळे तेल जळल्याने उठलेल्या विषारी काळ्या धुरामुळे शहर अंधारात बुडाले. इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक रिलेशन्स (IRIS) येथील मॅथिल्ड जूर्दे यांच्या मते, अणुऊर्जा, लष्करी आणि ऊर्जा केंद्रांवर हल्ले झाल्यास हवा, पाणी आणि मातीवर अत्यंत प्रदूषणकारी परिणाम होतात. कॉन्फ्लिक्ट अँड एन्व्हायर्नमेंट ऑब्झर्व्हेटरी (CEOBS) चे संचालक डग वेअर यांनी सांगितले की इराण आणि आसपासच्या देशांमध्ये शेकडो ठिकाणी पायाभूत सुविधा खराब झाल्या असून त्यामुळे लोक आणि पर्यावरणाला प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.
तेलाशी संबंधित पायाभूत सुविधा, लष्करी ठिकाणे आणि पर्शियन आखातातील संवेदनशील सागरी पर्यावरण याबद्दलही डग वेअर यांनी चिंता व्यक्त केली.
स्थलांतरित पक्ष्यांना युद्धझळा?
अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे निर्माण होणारा धूर, प्रदूषण आणि स्फोट यामुळे आखाती भागातील नाजूक पर्यावरण आणि स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. वन्यजीव तज्ज्ञ डॉ. रेझा खान यांच्या मते, युद्धाचा परिणाम फक्त माणसांवरच होत नाही; स्फोट, जळणाऱ्या तेल-वायू प्रकल्पांमधून निघणारा धूर आणि प्रदूषण यामुळे वन्यजीव व परिसंस्थांवर मोठा ताण येतो. अरबी आखात हा युरोप, मध्य आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आशिया जोडणाऱ्या महत्त्वाच्या स्थलांतर मार्गावर आहे. फ्लेमिंगो, हेरॉन आणि इतर अनेक पक्षी प्रवासादरम्यान येथील पाणथळींवर विश्रांती व अन्नासाठी अवलंबून असतात. म्हणून येथे होणारा पर्यावरणीय त्रास अनेक खंडांतील पक्षीसंख्येवर परिणाम करू शकतो. स्फोट, विमानांची हालचाल आणि आगीमुळे पक्षी घाबरून अन्न शोधण्याची किंवा प्रजननाची ठिकाणे सोडू शकतात, तसेच स्थलांतर मार्गही बदलू शकतात. तज्ज्ञांच्या मते, युद्ध संपल्यानंतरही तेलाचे अवशेष आणि इतर प्रदूषक किनारी भागात राहू शकतात, ज्यामुळे समुद्री जीवसृष्टी आणि त्यावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांच्या अन्नसाखळीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. १९९१च्या आखाती युद्धानंतरच्या अभ्यासानुसार, मोठ्या तेलगळतीमुळे अरबी आखातात २० ते ३० हजार समुद्री पक्षी मृत्युमुखी पडले होते. काही भागात कॉर्मोरंट आणि ग्रीब्ससारख्या पक्ष्यांच्या २२ ते ५० टक्के संख्येचा नाश झाला होता. त्या युद्धात कुवेतमधील शेकडो तेलविहिरींना आग लावण्यात आली होती. त्यातून निर्माण झालेला प्रचंड धूर अवकाशातूनही दिसत होता आणि अनेक महिने आकाश काळवंडले होते. या धुरात काजळी, सल्फरयुक्त पदार्थ आणि विषारी वायू होते, ज्यामुळे पक्ष्यांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो.
