खामेनींच्या हत्येनंतर कोण?
देशाच्या सर्व महत्त्वाच्या निर्णयांमध्ये अयातोल्ला अली खामेनी यांचा शब्द अंतिम असे. इस्रायल, अमेरिकेने त्यांना ठार केल्यानंतर इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने त्यांचे चिरंजीव मोजतबा अली खामेनी यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, आम्ही अयातोल्ला मोजतबा खामेनी यांनाही ठार करू, अशी धमकी इस्रायलने दिली. तर ‘इराणच्या नेतेपदावर आमच्या पसंतीची व्यक्ती असेल,’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते. हल्ल्यामध्ये मोजतबा यांचाही मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. ती खोटी ठरली, पण ते जखमी झाल्याच्या वृत्ताला इराणच्या माध्यमांनी दुजोरा दिला आहे.
‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ची भूमिका काय?
‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ हे इराणचे मुख्य लष्कर नाही. ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कोअर’ (आयआरजीसी) या नावाने ओळखले जाणारे हे नियमित लष्कराव्यतिरिक्त विशेष सुरक्षा दल आहे. खडे सैन्य (दीड लाख सैनिक), नौदल (२० हजार नौसैनिक), हवाई दल (१५ हजार वैमानिक आणि सैनिक), बाहेरील देशांत सक्रिय असा कड्स फोर्स (पाच हजार) आणि ‘बसीज’ म्हणजेच राखीव दल (साडेचार लाख सैनिक) अशी क्षमता इराणकडे आहे. त्यांची सैनिकसंख्या जवळपास साडेसहा लाख आहे. तर नियमित लष्कराकडे साधारण सव्वाचार लाख सैनिक आहेत.
‘आयआरजीसी’ची रचना कशी?
वरिष्ठ नेते ठार झाले तरी त्या स्थितीला तोंड देऊन टिकून राहण्याच्या दृष्टीने ‘आयआरजीसी’ची रचना करण्यात आली आहे. या रचनेत ‘आयआरजीसी’ची सखोल नेतृत्व फळी तयार आहे. प्रत्येक कमांडरच्या उत्तराधिकार्यांची आणि त्यांच्याही उत्तराधिकार्यांची नावे आधीच निश्चित केलेली असतात. प्रत्येक युनिट ठरल्यानुसार स्वतंत्रपणे काम करण्यास सक्षम असते. गेल्या वर्षी आणि हे युद्ध सुरू झाल्यापासून झालेल्या हल्ल्यांमध्ये ‘आयआरजीसी’चे अनेक वरिष्ठ कमांडर मारले गेले. पण त्यांच्या जागी तातडीने इतर अनुभवी व्यक्तींची नियुक्ती झाली.
हयात असलेले बडे नेते कोणते?
‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’चे प्रमुख अहमद वाहिदी यांना इराक युद्धाचा, कड्स फोर्स चालवण्याचा अनुभव आहे, त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री म्हणून काम केले आहे आणि देशांतर्गत असंतोष दडपण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याच दलाचे २०२०पासून प्रमुख असलेल्या इस्माइल कानी यांनी पश्चिम आशियात इराण समर्थित बंडखोर गटांचे व्यवस्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’च्या नौदलाचे प्रमुख अलीरझा तांगसिरी यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यात लक्षणीय काम केले आहे. पार्लमेंटचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालिबाफ इराणमधील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. न्यायपालिकेचे प्रमुख अयातोल्ला गुलामहोसेन मोहसेनी-ईजेई, अध्यक्ष मसूद पेझेश्कियान, परराष्ट्रमंत्री सयद अब्बास अराघची हेही प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात.
अमेरिका, इस्रायलचे दावे फोल कसे?
अयातोल्ला अली खामेनी तसेच इराणच्या अन्य महत्त्वाच्या नेत्यांना, अधिकार्यांना ठार केल्यानंतर इराणमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण होईल, हा अमेरिका- इस्रायलचा अंदाज इराणने खोटा ठरवला आहे. इराण सध्या नेतृत्वहीन आहे, असा दावा बिन्यामिन नेतान्याहू यांनी करून पाहिला. पण त्याचा इराणच्या मनोधैर्यावर काहीही परिणाम झाल्याचे दिसत नाही. ट्रम्प यांनी इराणची सर्व लष्करी ताकद नष्ट केल्याचे अनेकदा सांगून पाहिले. विद्यमान स्थितीत इराणच्या नेतृत्वाला ठोस चेहरा नाही ही बाब खरी, पण आतापर्यंतच्या नेतृत्वाने आखून दिलेली घडी संकट हाताळण्यासाठी पुरेशी सक्षम असल्याचे सध्याचे चित्र आहे.
