Mojtaba Khamenei Injured News : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज (गुरुवार) तेरावा दिवस आहे. मध्यपूर्वेतील या युद्धामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका व इस्रायलने इराणवरील संयुक्त हल्ले सुरूच ठेवले आहे. इराणकडूनही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. यादरम्यान इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी हे गंभीर जखमी झाल्याची आवई उठली आहे. सध्या समाजमाध्यमांवर त्यांच्या प्रकृतीविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यादरम्यान न्यूयॉर्क टाइम्सने तीन इराणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने खामेनी यांच्या प्रकृतीविषयी सविस्तर वृत्त दिले आहे. त्याविषयीचा हा आढावा…

वडिलांच्या मृत्यूच्या ठिकाणीच जखमी?

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या काही दिवसांतच त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांची इराणच्या सर्वोच्चपदी निवड करण्यात आली. मात्र, ही नियुक्ती होऊन चार दिवस उलटल्यानंतरही मोजतबा खामेनी हे अद्याप सार्वजनिकरीत्या समोर आलेले नाहीत. अमेरिका व इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात ते जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, ज्या हवाई हल्ल्यात त्यांचे वडील अयातुल्ला अली खामेनी आणि कुटुंबातील इतर सदस्य मारले गेले, त्याच हल्ल्यात मोजतबा खामेनी यांनाही मोठी दुखापत झाली आहे. इराणने अधिकृतपणे त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली असली तरीही ते कुठेही न दिसल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतचे गूढ अधिकच वाढले आहे.

मोजतबा यांना काय झाली दुखापत?

इराणकडून नव्या नेत्याच्या प्रकृतीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने तेथील जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण आहे. मोजतबा खामेनी खरोखरच इराणची सूत्रे सांभाळण्याच्या स्थितीत आहेत का? असा प्रश्न समाजमाध्यमांवर उपस्थित केला जात आहे. सीएनएनने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ५६ वर्षीय मोजतबा खामेनी यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून इतर किरकोळ जखमा झाल्या आहेत. तसेच त्यांच्या डाव्या डोळ्याभोवती जखम आणि चेहऱ्यावर ओरखडे आहेत. मोजतबा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असली तरीही त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तीन इराणी अधिकाऱ्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिली आहे. सायप्रसमधील इराणचे राजदूत अलीरेझा सालारियन यांनी द गार्डियनला सांगितले की, सुदैवाने अमेरिका व इस्रायल यांच्या हल्ल्यातून मोजतबा खामेनी सुरक्षित आहेत. त्यांच्या पायाला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर केली जात आहे.

इराणी राजदूतांनी दिला वृत्ताला दुजोरा

मोजतबा खामेनी हे सध्या सुरक्षित ठिकाणी असले तरीही त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती सार्वजनिक करण्यासाठी नसल्याचे इराणी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. इराणी राजदूत सालारियन यांच्या मते, रमजान महिन्याच्या १० व्या दिवशी तेहरानमधील राष्ट्रपती संकुलाला लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात माजी सर्वोच्च नेते अली खामेनी, त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि अवघ्या १४ महिन्यांच्या नातवाचा मृत्यू झाला. हे सर्वजण त्यांच्या निवासस्थानी होते, जिथे काही वरिष्ठ कमांडरदेखील उपस्थित होते. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचे सुपुत्र युसूफ पेझेश्कियान यांनीही टेलिग्रामवर पोस्ट करून मोजतबा जखमी असल्याचे मान्य केले आहे, परंतु ते आता सुरक्षित आणि ठणठणीत असल्याचा दावा त्यांनी केला. इराणच्या सरकारी माध्यमांनी मोजतबा यांचा उल्लेख रमजान युद्धातील जखमी योद्धा असा केला आहे.

मोजतबा खामेनींवर पुन्हा हल्ल्याचे संकट?

मोजतबा खामेनी यांच्या जीवाला असलेला धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही दिवसांत अमेरिका आणि इस्रायलकडून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला होण्याची दाट शक्यता संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याच भीतीपोटी मोजतबा यांना दीर्घकाळ सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवले जाण्याची शक्यता आहे. मोजतबा खामेनी यांना दीर्घकाळ एखाद्या गुप्त बंकरमध्ये राहावे लागेल. त्यांनी आपल्या आई-वडिलांचा आणि पत्नीचा पहिल्याच हल्ल्यात झालेला मृत्यू जवळून पाहिला आहे. त्यामुळे ते सध्या कमालीचे सावध आहेत, असे एका इराणी अधिकाऱ्याने न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले. पाश्चिमात्य गुप्तचर यंत्रणांच्या मते, संभाव्य हत्येच्या भीतीमुळेच इराणने आपल्या नव्या नेत्याला लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले आहे.

मोजतबा खामेनी वादग्रस्त सर्वोच्च नेते?

इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून मोजतबा खामेनी यांची नियुक्ती झाली असली, तरी त्यांचे व्यक्तिमत्व नेहमीच गूढ राहिले आहे. सत्तेच्या सर्वोच्च पदावर पोहोचण्यापूर्वी ते फारसे सार्वजनिक जीवनात सक्रिय नव्हते, तरीही त्यांचे वडील अली खामेनी यांच्या प्रभावाच्या जाळ्यात ते एक अत्यंत महत्त्वाचे दुवे मानले जात होते. २०२१ मध्ये इराणमधील समाजमाध्यमांवर मोजतबा खामेनी यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते, ज्यामध्ये अली खामेनी यांचे वारसदार म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला होता. मोजतबा यांच्याकडे कोणतेही मोठे धार्मिक पद नसले तरी, इराणचे शक्तिशाली सैन्यदल इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत.

अमेरिकेचे निर्बंध आणि ट्रम्प यांची भूमिका

२००९ मध्ये महमूद अहमदीनेजाद यांच्या वादग्रस्त विजयानंतर इराणमध्ये मोठी आंदोलने झाली होती. त्यावेळी आंदोलकांनी मोजतबा यांच्यावर निवडणूक निकालात फेरफार केल्याचा आरोप केला होता. २०१९ मध्ये अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने मोजतबा यांच्यावर निर्बंध लादले होते. वडिलांच्या प्रादेशिक महत्त्वाकांक्षेसाठी देशांतर्गत दडपशाहीचा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मोजतबा यांच्या नव्या नियुक्तीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ही निवड अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. यादरम्यान अमेरिका व इस्रायल यांच्या हल्ल्यांपासून मोजतबा यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे.