America Air Strikes Iran Nuclear Sites : इस्रायल व इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असताना आता अमेरिकेने त्यात उडी घेतली आहे. शनिवारी अमेरिकन लष्कराच्या विमानांनी हवाई हल्ले करून इराणमधील प्रमुख आण्विक केंद्रांना उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी अत्याधुनिक स्टील्थ श्रेणीतील लढाऊ विमानाचा वापर केल्याचं सांगितलं जात आहे. ही विमानं इराणच्या रडारला चकवा देऊन तेहरानमध्ये शिरली आणि तेथील आण्विक तळे उद्ध्वस्त करून माघारी परतली असल्याचं अमेरिकन लष्करानं म्हटलं आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या हवाई हल्ल्यानंतर इराणने जमिनीखाली नेमकं काय लपवलंय? यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे, त्याबाबत जाणून घेऊ…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी असा दावा केला की, अमेरिकन लष्कराने इराणवर हवाई हल्ले करून त्यांच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमधील तीन अणु प्रकल्प उद्ध्वस्त केले आहेत. हे हल्ले अत्याधुनिक विमानांनी करण्यात आले असून आता ही सर्व विमाने इराणच्या हद्दीतून बाहेर आली आहेत. मागील चाळीस वर्षांपासून इराणकडून अमेरिकाविरोधात कुरापती केल्या जात होत्या, त्यामुळे आम्हाला त्यांचे अणु प्रकल्प उद्ध्वस्त करायचे होते, असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे. आता इराणने शांत बसावं अन्यथा त्यांना मोठ्या विनाशाला सामोरं जावं लागेल, असा इशाराही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला आहे.
इराणने जमिनीखाली नेमकं काय लपवलंय?
- इराणने आपल्या अणु कार्यक्रमाचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग जमिनीखाली गुप्त ठेवला असल्याचं सांगितलं जात आहे.
- यामागचा मुख्य उद्देश म्हणजे शत्रू देशांकडून होणाऱ्या संभाव्य हवाई हल्ल्यांपासून या आण्विक तळांना संरक्षण देण्याचा आहे.
- इराणने फोर्डो हा अणु प्रकल्प कुम (Qom) शहराजवळील एका पर्वताच्या आत सुमारे ८०–९० मीटर (२६०–३०० फूट) खोलवर सुरू केला आहे.
- हा प्रकल्प बंकर-बस्टिंग बॉम्बशिवाय इतर कोणत्याही सामान्य हल्ल्यातून सुरक्षित राहू शकतो, मात्र अमेरिकेने तो उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.
- इराणने काही प्रगत IR-6 आणि IR-8 सेंट्रीफ्यूज युनिट्स जमिनीखाली ठेवले आहेत, जे युरेनियमला जलद आणि मोठ्या प्रमाणात समृद्ध करू शकतात.
- इराणने काही बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची तळं आणि शस्त्रांचा साठा पर्वतांच्या आतमध्ये ठेवलेला असल्याचं सांगितलं जात आहे.
- इराणच्या लष्कराच्या उच्च अधिकाऱ्यांसाठी कमांड बंकर जमिनीखाली तयार करण्यात आले आहे, जेणेकरून ते युद्धाच्या काळात नेतृत्वासाठी सुरक्षित राहावे.
आणखी वाचा : Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ठाकरे सरकार? राजकीय वर्तुळात का होतेय चर्चा?
अमेरिकेची धडपड नेमकी कशासाठी?
इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात अमेरिकेने उडी घेण्याचं मुख्य कारण- इराणकडून सुरू असलेली अणुबॉम्बची चाचणी असल्याचं सांगितलं जात आहे. इराण हा अणुबॉम्ब तयार करण्याच्या अत्यंत जवळ येऊन पोहोचला होता, त्यामुळे अमेरिकेसह इस्रायलला त्याची चिंता लागून होती, असं हिंदुस्तान टाईम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. इस्रायलने आठ दिवसांपूर्वीच इराणच्या आण्विक तळावर हल्ला करून तेथील महत्त्वाचे लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांना ठार मारल्याचा दावा केला होता.
मात्र, त्यानंतरही इराणने अणुबॉम्ब तयार करण्याचे प्रयत्न सोडले नव्हते. त्यांच्याकडून दोन आण्विक तळांवर युरेनियमचा वापर करून प्रयोग सुरू होते, असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर इराणच्या भूमिगत क्षेपणास्त्र भंडाराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. इस्रायलला या भूमिगत तळांना लक्ष्य करता येत नव्हते. त्यांच्याकडे तेवढी संहारक शस्त्रं नव्हती, त्यामुळे अमेरिकेने या युद्धात उडी घेत अत्याधुनिक विमानांचा वापर करून इस्रायलवर बॉम्बहल्ले केल्याचे वृत्त समोर आले आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे किती नुकसान?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी पीट हेगसेथ यांनी असा दावा केलाय की, अमेरिकन हवाई दलाने इराणचे अणु प्रकल्प पूर्णपणे नष्ट केले आहेत. मात्र, अमेरिकेच्या संयुक्त लष्करी प्रमुख समितीचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी या संदर्भात सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अमेरिकेच्या हल्ल्यात इराणच्या अणु प्रकल्पांना नेमकं किती नुकसान झालंय हे काही आठवड्यांनंतरच स्पष्ट होईल. मात्र, प्राथामिक अहवालांनुसार, इराणच्या तिन्ही आण्विक केंद्रांचं मोठं नुकसान झालं असून तिथे विध्वंस झाल्याचं कळतंय. ‘New York Times’शी बोलताना एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, “इराणचा फोर्डो हा अणु प्रकल्प अतिशय सुरक्षित ठिकाणी असल्यामुळे तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही; पण त्याचं मोठं नुकसान झालं असून तो आता कार्यक्षमतेबाहेर गेला आहे.
इराण म्हणतंय – अमेरिकेच्या हल्ल्यात कोणतंही नुकसान नाही
याचदरम्यान एका इराणी अधिकाऱ्यानेही सांगितले की, अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणला कोणतंही मोठं नुकसान सहन करावं लागलं नाही. आम्हाला या हल्ल्याची पूर्वकल्पना असल्याने तिन्ही आण्विक तळे यापूर्वीच रिकामी करण्यात आलेली होती. मध्यपूर्वेतील एका भू-राजकीय विश्लेषकाने ‘Wall Street Journal’शी बोलताना सांगितलं की, अमेरिकेने इराणवर केलेला हवाई हल्ला किती यशस्वी झाला हे आताच सांगता येणं कठीण आहे. मात्र, इतकं नक्की आहे की, अमेरिकन लष्कराने फोर्डो अणु प्रकल्पाच्या कमकुवत भागांवर अचूक लक्ष्य करीत हल्ला केला आहे. अशाप्रकारचे हल्ले हे सुनियोजित असतात आणि त्यामुळे मोठं नुकसान होण्याची भीती असते.
हेही वाचा : हमासला शस्त्रे देणाऱ्या इराणी कमांडरचा इस्रायलकडून खात्मा; कोण होते सईद इजादी?
इराणचं अणु कार्यक्रमाचं भविष्य काय?
आता प्रश्न असा आहे की, या हल्ल्यांमुळे इराणचं अण्वस्त्र बनवण्याचं स्वप्न कायमचं संपलंय का? त्याबाबत तज्ज्ञांनी म्हटलंय की, इराणच्या अणु कार्यक्रमाचं संपूर्ण मूल्यमापन केल्याशिवाय तिथे किती नुकसान झालं हे सांगता येणं कठीण आहे. ‘Armed Conflict Location and Event Data Project (ACLED)’ या संघर्ष निरीक्षण संस्थेचे प्रमुख क्लिओनाध रॅले यांनी ‘The Telegraph’ ला सांगितलं की, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमुळे इराणच्या अणु कार्यक्रमाचा कालखंड निश्चितच बदलू शकतो; पण इराणी सत्ता आणि त्यांच्या हेतूंमध्ये फारसा बदल होणार नाही. इराणने त्यांची लष्करी व गुप्तचर रचना अत्यंत बुद्धिमत्तेने तयार केली आहे. त्यांची एखादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाली तरी ती स्वतःला जुळवून घेते आणि अनेकदा अधिक धोकादायक होते. या हल्ल्यांमुळे इराणचा अणु कार्यक्रम कायमचा थांबेल असं म्हणता येणार नाही; पण काही दिवसांसाठी तो नक्कीच विस्कळीत होऊ शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला काय इशारा दिला?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. “आम्ही इराणचे तीन अणु प्रकल्प अचूक लक्ष्यभेद करून उद्ध्वस्त केले आहेत. आता इराणने शांत बसावं. शांतता प्रस्थापित न झाल्यास पुढचे हल्ले आणखी भीषण असतील. शांतता प्रस्थापित करा किंवा विनाशाला सामोरे जा, असे दोनच पर्याय त्यांच्यापुढे आहेत,” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने रविवारी पहाटे देशातील फोर्डो अणुऊर्जा केंद्रावर हल्ला झाल्याची कबुली दिली आहे. इस्फहान आणि नतान्झ अणुऊर्जा केंद्रांनाही या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले असल्याचे त्यात म्हटले आहे. इस्फहानचे सुरक्षा प्रभारी अकबर सालेही यांनी सांगितले की, या केंद्रांभोवती हल्ले झाले आहेत, पण त्यांनी तपशीलवार माहिती दिली नाही.