इराणवर अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या तीव्र हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. पण यामुळे इराणच्या प्रतिकाराची धग कमी झालेली नाही. संघर्ष सुरू झाल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी इराणने इस्रायलबरोबरच पश्चिम आशियातील अमेरिकेच्या जवळपास सर्व महत्त्वाच्या तळांवर हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान तीन सैनिक मारले गेल्याची कबुली अमेरिकेने दिली आहे. अत्यंत शस्त्रसुसज्ज असूनही आखातातील अमेरिकी तळांचे रक्षण करण्यात अमेरिका कमी पडत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. तसेच एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ले करण्याची इराणची क्षमताही दुर्लक्षिण्यासारखी नाही, हेही दिसून आले.

‘अमेरिकामित्र’ अरबी देश लक्ष्य

संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवेत, ओमान, बहारिन, जॉर्डन आणि आता सौदी अरेबिया अशा सर्व प्रमुख अरबी देशांवर इराणकडून क्षेपणास्त्र किंवा ड्रोन हल्ले झाले आहेत. अजूनही होत आहेत. अबूधाबीमध्ये इराणी क्षेपणास्त्राचा तुकडा पडून एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला. दुबईतील प्रसिद्ध पाम जुमेरा भागात एका लग्झुरी हॉटेलच्या जवळ एक क्षेपणास्त्र किंवा तुकडे येऊन पडले आणि हॉटेलच्या एका भागाला आग लागली. यात चार नागरिक जखमी झाले. कतारची राजधानी दोहा आणि बहारिनची राजधानी मनामा येथे इराणी क्षेपणास्त्रांचा वेध घेताना अमेरिकेच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेची दमछाक झाली. बहारिनमध्ये अमेरिकेच्या नाविक तळावर इराणचा ड्रोन आदळला आणि तेथील काही इमारतींचे नुकसान झाले.

कुवेत आणि कतारमध्ये हल्ले

कुवेतमध्ये एका इराणी ड्रोनने कुवेत सिटी विमानतळावर हल्ला केला. यात काही कर्मचारी जखमी झाले तसेच मालमत्तेचे नुकसान झाले. कुवेतच्या अली अल-सलेम हवाई तळावरही हल्ला झाला. पण हा हल्ला परतवून लावण्यात आल्याचे कुवेतने जाहीर केले. कतारच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने त्या देशाच्या दिशेने आलेली सगळी इराणी क्षेपणास्त्रे नष्ट केली. तरीही एका उत्तर करातरमध्ये एका रडार तळावर हल्ला झालाच.

सौदी अरेबिया, इराकवर हल्ले

हल्ल्याच्या पहिल्या दिवशी इराणने सौदी अरेबियाला लक्ष्य केले नव्हते. कारण इराणवर कोणत्याही कारवाईसाठी आमची भूमी वापरू देणार नाही असे सौदी अरेबियाच्या राजवटीने अमेरिकेला सांगितले होते. पण दुसऱ्या दिवशी इराणने हे पथ्य पाळले नाही आणि आपल्या एका कट्टर प्रतिस्पर्ध्याच्या दिशेने हल्ले केले. सौदीची राजधानी रियाध आणि उत्तरेकडील एका शहरावर हल्ल्यांचा प्रयत्न झाला, तो सौदी लष्कराने हाणून पाडला. इराकनमध्ये एर्बिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकी तळावर ड्रोन हल्ला झाला, पण तो हाणून पाडण्यात आला.

अब्राहम लिंकन युद्धनौकेवर हल्ला?

आखातामध्ये तैनात झालेली अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकनवर चार क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचा दावा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कोअरने केला. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या दाव्याचे खंडन केले. धादांत खोटा असा हा दावा असून, या नौकेवरून इराणवरील कारवाईसाठी लढाऊ विमाने नित्याने उडत आहेत, असे सांगण्यात आले. पण इराणचा दावा खरा असेल तर अमेरिकेसाठी ही बाब चिंताजनक ठरू शकते.

तीन सैनिक ठार झाल्याची अमेरिकेची कबुली

इराणच्या हल्ल्यामध्ये तीन सैनिक ठार झाल्याची कबुली अमेरिकेने कारवाईच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १ मार्च रोजी दिली. याशिवाय पाच सैनिक गंभीर जखमी झाल्याचेही सांगण्यात आले. नेमक्या कोणत्या तळावर ही जीवितहानी झाली हे स्पष्ट झालेले नाही. पण बहारिनच्या तळावर झालेला इराणी हल्ला खूप विध्वंसक होता, त्यामुळे तेथील तळावर असलेले अमेरिकी सैनिक ठार झाल्याची शक्यता आहे. इराणवरील कारवाईत अमेरिकेची मनुष्यहानी होऊ शकते असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दिला होता.

अमेरिकेच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेवर ताण

अमेरिकेची सुपरिचित पेट्रियट क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा या संघर्षात प्रामुख्याने वापरली जात आहे. पश्चिम आशियात अमेरिकेचे १३ लष्करी, नाविक आणि हवाई तळ आहेत. या तळांवर ३० ते ४० हजार अमेरिकी सैनिक तैनात आहेत. या यंत्रणेने कित्येक इराणी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केली. तरीदेखील काही अमेरिकी तळांवर आदळलेच. इराण खूप व्यापक भूभागावर आणि विलक्षण सातत्याने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स डागत आहे. विशेषतः खामेनी ठार झाल्यानंतर इराणच्या हल्ल्यांची तीव्रता आणि व्याप्ती वाढलेली दिसते. जोपर्यंत अमेरिका आणि इस्रायल इराणच्या क्षेपणास्त्र यंत्रणेची अपिरिमित हानी करत नाहीत तोवर इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले होतच राहतील.