बुधवारी (२२ एप्रिल) इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दोन जहाजे जप्त केली. यात गुजरातच्या दिशेने येणाऱ्या एका मालवाहू जहाजाचा समावेश आहे. ‘एमएससी फ्रान्सिस्का’ (पनामा ध्वज) आणि ‘इपामिनोड्स’ (लायबेरिया ध्वज) अशी या दोन जहाजांची नावे असून ती सध्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअर’च्या (IRGC) ताब्यात असल्याचे वृत्त आहे. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने दिलेल्या माहितीनुसार, ही जहाजे ताब्यात घेतल्यावर इराणला नेण्यात आली आहेत.
भारताकडे येणारी ही दोन व्यापारी जहाजे ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवसानंतर इराणने एक नाट्यमय व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये मुखवटा घातलेले कमांडो जहाजांचा पाठलाग करताना आणि त्यानंतर जहाजावर चढून अखेर ती ताब्यात घेताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ पार करण्याचा प्रयत्न करत असताना ‘जग अर्णव’ आणि ‘सनमार हेराल्ड’ या दोन भारतीय जहाजांवर हल्ला झाला होता; त्यानंतर ही आता ताजी घटना आहे.
इराणकडून जहाजे जप्त केल्याचा थरारक व्हिडिओ प्रसिद्ध
इराण सरकारशी संलग्न प्रसारमाध्यमे, ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग’ने शेअर केलेल्या एका नाट्यमय व्हिडिओमध्ये, इराणच्या लष्कराचे सशस्त्र जवान वेगवान बोटींमधून (speedboats) मालवाहू जहाजांच्या दिशेने जाताना दिसत आहेत. त्यानंतर, हातात रायफल्स घेतलेले आणि मुखवटे धारण केलेले इराणी कमांडो सैनिक शिडीवरून ‘एमएससी फ्रान्सिस्का’ जहाजावर चढताना दिसत आहे. तर ‘इपामिनोड्स’ जहाजावर चढलेल्या कमांडोंनी हातात रायफल्स घेऊन झडती घेतली आणि ते इंजिन रूममध्ये शिरले. व्हिडिओमध्ये पुढे सैनिक जहाजाच्या वरच्या मजल्यापर्यंत (top deck) चढताना दिसत आहेत.
‘एमएससी फ्रान्सिस्का’ (पनामा ध्वज) आणि ‘इपामिनोड्स’ (लायबेरिया ध्वज) अशी या दोन जहाजांची नावे आहेत. ‘इपामिनोड्स’ हे जहाज दुबईहून गुजरातच्या मुंद्रा बंदराकडे येत होते, परंतु सध्या ते इराणच्या किनाऱ्यावर परत नेण्यात आल्याचे वृत्त आहे.
इराणी सैनिकांनी त्यांच्या स्पीडबोटीतून गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले, यात भारताकडे येणाऱ्या ‘इपामिनोड्स’ जहाजाच्या ‘ब्रिज’ (जहाज नियंत्रण कक्ष) भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, जहाजावरील कर्मचारी सुरक्षित आहेत. इराणच्या किनाऱ्यापासून साधारण सहा मैल अंतरावर असलेल्या ‘एमएससी फ्रान्सिस्का’ या जहाजावरही गोळीबार करण्यात आला.
IRGC च्या (इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअर) दाव्यानुसार, या मालवाहू जहाजांकडे “आवश्यक परवानगी” नव्हती आणि त्यांनी नेव्हिगेशन सिस्टिममध्ये फेरफार करून नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे सागरी सुरक्षेला धोका निर्माण झाला, म्हणून कारवाई करण्यात आली.
IRGC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “नियमांचे उल्लंघन करणारी दोन जहाजे, ‘एमएससी-फ्रान्सिस्का’ (झिओनिस्ट राजवटीशी संबंधित) आणि ‘इपामिनोड्स’, यांनी आवश्यक परवान्याशिवाय प्रवास करून आणि नेव्हिगेशन सिस्टिममध्ये फेरफार करून सागरी सुरक्षेला धोका निर्माण केला होता, त्यांना IRGC नौदलाने जप्त केले असून इराणच्या किनारपट्टीवर नेले आहे.”
या निवेदनात पुढे असा इशाराही देण्यात आला आहे की, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील ‘शिस्तीत’ हस्तक्षेप करणारी कोणतीही कृती ‘रेड लाईन’ (धोक्याची रेषा) मानली जाईल. परंतु, BBC ने केलेल्या विश्लेषणानुसार, व्हिडिओमधील काही भाग बनावट किंवा आधीच शूट करून (staged) नंतर जोडण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळेच असे वाटते की, हे चित्रिकरण जहाजे इराणी सैन्याने ताब्यात घेतल्यानंतर काही तासांनी केलेले असावे. बीबीसीच्या वृत्तानुसार, त्यांनी सूर्यप्रकाशाच्या कोनाचेही (angle of sunlight) निरीक्षण केले आणि पुराव्यांच्या आधारे असे समोर आले की, काही क्लिप्स प्रत्यक्ष घटनेच्या साधारण ८ तासांनंतर चित्रित केलेल्या असण्याची शक्यता आहे.
‘तुस्का’च्या अटकेनंतर इराणची ‘जशास तसे’ कारवाई
ही घटना म्हणजे अमेरिकन सैन्याने ‘तुस्का’ (Touska) या इराणी मालवाहू जहाजाला जप्त केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर, इराणने दिलेले ‘जशास तसे’ उत्तर (tit-for-tat) होते, असे तज्ज्ञांना वाटते.
‘एमव्ही तुस्का’ हे जहाज ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण शिपिंग लाइन्स’च्या (IRISL) उपकंपनीच्या मालकीखाली असलेल्या ताफ्याचा भाग आहे. अमेरिकन विशेष दलाचा (US special forces) असा दावा आहे की, या जहाजाने इराणी बंदरांच्या नाकेबंदीतून निसटण्याचा प्रयत्न केला होता. ‘यूएसएस स्प्रुआन्स’ (USS Spruance) या मार्गदर्शित-क्षेपणास्त्र विनाशिकेने इराणचा ध्वज असलेल्या या मालवाहू जहाजाला इशारा दिला होता, मात्र ‘तुस्का’ थांबले नाही. भारताच्या दिशेने जाणाऱ्या जहाजावरील या हल्ल्यामुळे नवी दिल्ली आणि तेहरानमधील संबंध अधिक गुंतागुंतीचे होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात दोन भारतीय जहाजांवर हल्ला
शनिवारी (१८ एप्रिल), इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कोअर (IRGC) नौदलाने दोन भारतीय जहाजांवर गोळीबार केला. यामध्ये दोन दशलक्ष बॅरल इराकी कच्चे तेल घेऊन जाणारे ‘सनमार हेराल्ड’ (Suezmax tanker) आणि मालवाहू जहाज ‘जग अर्णव’ यांचा समावेश होता. या चकमकीच्या दरम्यान, ‘सनमार हेराल्ड’च्या कॅप्टनने इराणी अधिकाऱ्यांना रेडिओवरून अत्यंत निकडीचा संदेश पाठवला. त्या ऑडिओमध्ये कॅप्टन असे म्हणताना स्पष्टपणे ऐकू येतो की, “सेपाह नेव्ही! सेपाह नेव्ही! मी मोटर टँकर सनमार हेराल्डचा कॅप्टन बोलतोय! तुम्हीच मला पुढे जाण्याची परवानगी दिली होती! तुमच्या यादीत माझे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे! तुम्ही मला परवानगी दिली होती आणि आता तुम्हीच गोळीबार करत आहात! मला मागे फिरू द्या!”
काही वृत्तांनुसार, इराण सरकार आणि IRGC यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे (communication gap) हा गोळीबार झाला असावा. या प्रदेशात भारताने तटस्थ भूमिका स्वीकारलेली असूनही, दोन्ही जहाजे IRGC च्या अचानक वाढलेल्या नाकेबंदीच्या कचाट्यात सापडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नवी दिल्लीने इराणच्या दूताला पाचारण केले आणि तीव्र निषेध नोंदवला.
