Hormuz Strait news update regarding Iran’s shipping restrictions: कुवेतमधील ‘मिना अल-अहमदी रिफायनरी’ येथून एलपीजी घेऊन ‘जग वसंत’ ही जहाज भारतात शुक्रवारी (२७ मार्च) दाखल झाली. ही जहाज होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे भारतात आली. युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर प्रभावीपणे केला आहे. इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आल्याने जगाला होणारा २० ते २५ टक्के तेल व नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
अमेरिका, इस्रायल व त्यांच्या मित्रराष्ट्रांना होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल व नैसर्गिक वायूची वाहतूक केली जाऊ देणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे. तर भारत, चीन, रशिया, इराक आणि पाकिस्तान हे इराणचे मित्रराष्ट्र असून त्यांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ दिले जाईल, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे. म्हणजेच इराणने त्याच्या मित्रराष्ट्रांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली तर शत्रूराष्ट्रांसाठी बंद ठेवली आहे. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर व सुरक्षा पुरवण्यासाठी इराण जहाजांना टोल आकारत असल्याची माहिती समोर आली आहे. इराण खरंच टोल आकारत आहे का? कोणत्या देशांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली झाली आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी कशी केली?
युद्ध सुरू होण्याआधी होर्मुझ सामुद्रधुनीतून दररोज १३० हून अधिक जहाज जात होत्या. आता दररोज फक्त तीन किंवा चार जहाज जात आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून २० कमर्शियल जहाजांवर होर्मुझ सामुद्रधुनीत हल्ला करण्यात आला आहे. तर २००० हून अधिक जहाज सामुद्रधुनीच्या जवळ अडकले आहेत, अशी माहिती इंटरनॅशनल मरिटाइम ऑर्गनायझेशन सेक्रेटरी जनरल अर्सेनिओ डोमिंगिज यांनी दिली.

इराणचे मित्र असलेल्या देशांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली असेल, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे. “आम्ही मित्र मानत असलेल्या देशांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची मुभा दिली आहे. आम्ही चीन, रशिया, भारत, इराक आणि पाकिस्तान या देशांना परवानगी दिली आहे. यांपैकी ज्या देशांना सामुद्रधुनीतून जाण्यासाठी सुरक्षा हवी आहे, त्यांना आम्ही सुरक्षा दिली आहे”, असे अराघची म्हणाले.
इराणची सशस्त्र सेना असलेल्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोर्प्स’ने (IRGC) बुधवारी होर्मुझ सामुद्रधुनीच्या वापराबाबत माहिती दिली. अमेरिका व इस्रायल तसेच त्यांच्या मित्रदेशांच्या बंदरांवरून जहाजा येत असतील किंवा त्या बंदरांकडे जाणार असतील तर त्यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
होर्मुझ सामुद्रधुनीत इराण खरंच टोल आकारत आहे का?
होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना इराणकडून २ दशलक्ष डॉलर टोल आकारला जात आहे, असे इराणच्या एका खासदाराने सांगितले होते. त्यानंतर इराणच्या भारतातील दूतावासाने याबाबत माहिती दिली की, “होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना इराणकडून २ दशलक्ष डॉलर आकारले जात आहेत. हा दावा खोटा आहे. ज्यांनी हे विधान केले ते त्यांचे वैयक्तिक विधान होते. ते विधान म्हणजे इराणची अधिकृत भूमिका नाही.”
इराणच्या संसदेत होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना टोल आकारण्यासाठी कायदा करण्याची तयारी सुरू आहे, असे काही अहवालांतून समोर आले. दरम्यान, असा कोणताही कायदा अस्तित्वात नसताना इराणच्या सशस्त्र सेना असलेल्या IRGC कडून ‘टोल बुथ सिस्टिम’ होर्मुझ सामुद्रधुनीत लावण्यात आल्याचे वृत्त ‘लॉएड्स लिस्ट’ (Lloyd’s List) ने दिले. ‘लॉएड्स लिस्ट’ हे मरिटाइम इंडस्ट्रीशी संबंधित एक मासिक आहे.
‘लॉएड्स लिस्ट’च्या अहवालानुसार, २३ मार्चपासून आतापर्यंत २६ जहाज ‘टोल बुथ सिस्टिम’मधून गेल्या आहेत. त्यापैकी दोन जहाजांनी युआन (चीनचे चलन) मध्ये फी भरल्यानंतर त्यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देण्यात आले. एक चिनी कंपनी IRGC व जहाजांमध्ये मध्यस्थीचे काम करत आहे. जहाज ऑपरेटर्स मध्यस्थांना संपर्क साधतात. त्यानंतर मध्यस्थ IRGC कडून जहाजांना पुढे जाण्याची परवानगी देतात. या दरम्यान, जहाजाशी संबंधित सगळीच माहिती IRGC ला द्यावी लागते. जहाजावरील क्रू मेम्बर्सची यादीही IRGC ला द्यावी लागत आहे. त्यानंतर IRGC संबंधित जहाजाला कोणत्या मार्गाने जायचे ते सांगते. तसेच एक छोटी नौदलाची युद्ध नौका त्या जहाजाच्या संरक्षणासाठी IRGC कडून दिली जाते.
इराणला होर्मुझ सामुद्रधुनीत टोल वसुलीचा अधिकार आहे का?
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इराणला होर्मुझ सामुद्रधुनीत टोल आकारण्याचा अधिकार नाही. होर्मुझ सामुद्रधुनी ही नैसर्गिकरित्या तयार झाली आहे. ती मानवनिर्मित नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार इराणला टोल आकारण्याचा अधिकार नाही. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणला पूर्ण अधिकार द्यावा, तशी आंतरराष्ट्रीय मान्यता इराणला द्यावी, अशी अट इराणने युद्ध थांबवण्यासाठी ठेवली आहे. दरम्यान, इराणच्या संसदेत लवकरच याबाबत कायदा होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास इराणला या युद्धात आर्थिक मदत मिळवता येईल.
होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे भारताला तेल व नैसर्गिक वायू कसा मिळतोय?
युद्ध सुरू झाल्यापासून भारतात आतापर्यंत ५ जहाज होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे आल्या आहेत. त्यापैकी पाइन गॅस, जग वसंत, शिवालिक आणि नंदा देवी या चार जहाज एलपीजी घेऊन आल्या. तर जग लाडकी या जहाजाने कच्चे तेल भारतात आणले. होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करण्यासाठी भारताला कोणतीही रक्कम द्यावी लागत नसल्याचे मंगळवारी भारत सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. युद्ध सुरू झाल्यापासून भारताने इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांच्याशी दोनदा तर परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी पाचदा संवाद साधला आहे.
