इराणमध्ये जानेवारी महिन्यात सरकारविरोधी आंदोलनात सामील झालेल्या दोन जुळ्या बहिणींचा तेथील प्रशासनाने अमानुष छळ केला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करूनही एका तरुणीला थेट फाशी तर दुसरीला तब्बल २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तारानेह आणि रोमिना रहिमी असे शिक्षा झालेल्या १९ वर्षीय जुळ्या बहिणींची नावे असल्याचे सांगितले जाते. या घटनेबाबत पीडित तरुणींच्या कुटुंबियांनी एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला अत्यंत थरकाप उडवणारी माहिती दिली. दोन सख्या बहिणींवरील अत्याचाराची क्रूर घटना उघडकीस येताच जगभरात संतापाची लाट उसळली, त्याविषयी…

इराणमध्ये जुळ्या बहिणींवर अमानुष अत्याचार

द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, तारानेह आणि रोमिना यांनी जानेवारी महिन्यात इस्फहान येथे झालेल्या सरकारविरोधी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काही मुखवटाधारी व्यक्ती त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी दोन्ही बहिणींचे अपहरण केले. या घटनेनंतर तरुणींची आई नूरमोहम्मदी यांना आपल्या मुली नेमक्या कुठे आहेत याची कोणतीही माहिती मिळाली नाही. तारानेह आणि रोमिना यांचा शोध घेण्यासाठी त्यांनी रुग्णालये, न्यायालये तसेच सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिंजवले. अखेरीस दोघींना इस्फहान येथील दौलताबाद तुरुंगात डांबून ठेवण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यानंतर मुलींना तुरुंगात भेटण्यासाठी गेलेल्या नूरमोहम्मदी यांना समोरचे दृश्य मानसिक धक्का बसला. तुरुंगात असलेल्या तारानेह आणि रोमिना यांच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तसेच अमानूष मारहाणीमुळे दोघींचे चेहरे प्रचंड सुजलेले होते. त्यांच्या हाताच्या कोपरांना आणि पायाच्या सांध्यांना पायांना फ्रॅक्चर झाले होते. तसेच दोघींच्या डोक्यावरील केसही मोठ्या प्रमाणात उपटले गेले होते.

स्वतःच्याच मुलींना ओळखणे झाले कठीण

या घटनेबाबत तारानेह आणि रोमिना यांचा चुलत भाऊ मसूद यांनी द गार्डियनशी बोलताना थरारक प्रसंग सांगितला. माझ्या काकू दोघींना भेटण्यासाठी तुरुंगात गेल्यानंतर त्यांना आपल्याच पोटच्या मुलींना ओळखता आले नाही. माझ्या बहिणींना इतकी अमानूषपणे मारहाण करण्यात आली होती की- त्यांचे चेहरे प्रचंड सुजलेले होते. दोघींच्याही संपूर्ण शरीरावर मारहाणीचे काळे-निळे डाग होते आणि त्यांच्या हातापायाची बोटे मोडली होती. मारहाण करणारे क्रूर व्यक्ती तारानेह आणि रोमिना यांना एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत फरफटत नेत होते. त्यामुळेच त्यांच्या डोक्यावरील बरेच केस उपटून पडले होते. याशिवाय दोघींना दीर्घकाळ एकांतवासातही ठेवण्यात आले होते. केवळ आंदोलनात सहभाग घेतल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने तारानेहला फाशीची शिक्षा, तर रोमिनाला २५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा सुनावल्यापासून कुटुंबीयांना पुन्हा या दोघींना भेटू दिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले. तुरुंगात असताना आपल्या बहिणींवर अनेकदा बलात्कार झाला असावा, अशी भीतीही मसूद यांनी व्यक्त केली.

कबुलीजबाबासाठी छळ केल्याचा आरोप

आपल्या दोन्ही मुलींवर तुरुंगात अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप नूरमोहम्मदी यांनी केला. त्याचवेळी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी तारानेहचा छळ करून तिच्याकडून कबुलीजबाब घेतल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले. तसेच, कबुलीजबाबावर स्वाक्षरी केली न केल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. आंदोलनादरम्यान दोघींनीही कोणत्याही प्रकारचा हिंसाचार केल्याचा पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला नसल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, यापूर्वी दोन्ही बहिणी कधीही आंदोलनात सहभागी झाल्या नव्हत्या, अशी माहितीही नूरमोहम्मदी यांनी दिली.

iran-protest-twin-sisters-executed-torture-human-rights-violation
इराणी राजवटीच्या क्रूर शिक्षेला बळी पडलेल्या जुळ्या बहिणी (छायाचित्र सोशल मीडिया)

इराणमध्ये आंदोलकांना फाशी देण्याचे सत्र

द गार्डियनच्या वृत्तानुसार, २०२६ मध्ये इराणमध्ये आतापर्यंत ५०० हून अधिक जणांना फाशी देण्यात आली आहे. त्यापैकी जानेवारीतील आंदोलनांशी संबंधित किमान २९ जणांचा समावेश आहे. फाशी देण्यात आलेल्यांमध्ये किमान १६ महिलांचा समावेश असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. याशिवाय, शेकडो जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून अनेकांवर मृत्युदंडाची तरतूद असलेल्या गुन्ह्यांचे आरोप करण्यात आले आहेत. इस्फहानमध्येही ७० हून अधिक जणांना मृत्युदंडाची शिक्षा होण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले आहे. या आकडेवारीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. गेल्या महिन्यात ब्रिटनसह अन्य ३० देशांनी इराणमधील फाशीच्या शिक्षांचा निषेध करणाऱ्या निवेदनावर स्वाक्षरी केली होती. इराणी राजवटीत कोणत्याही कायद्याचे पालन केले जात नाही. एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्याच्या वकिलांना अपील करण्यासाठी १८ दिवसांची मुदत असते. मात्र, अलीकडील अनेक फाशीच्या प्रकरणांमध्ये ही प्रक्रिया झालेली नाही. ते थेट शिक्षा सुनावतात, मुलांना घेऊन जातात आणि त्यांना फाशी देतात, असे मसूद यांनी द गार्डियनला सांगितले.

जुळ्या बहिणींचे प्रकरण का ठरतेय महत्त्वाचे?

या प्रकरणाच्या माध्यमातून केवळ या दोन बहिणींनाच नव्हे, तर इराणमधील जनतेलाही एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मसूद यांचे म्हणणे आहे. यादरम्यान इराण इंटरनॅशनलने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या वृत्तानुसार, अली जारेई दूजदरेसी या आंदोलकाला इराणमध्ये परतल्यानंतर मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. २०२२ मध्ये झालेल्या ‘वुमन, लाइफ, फ्रीडम’ आंदोलनादरम्यान गोळी लागल्याने त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली होती. त्यानंतर ते जर्मनीत गेले होते आणि इराणमध्ये परतल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. वृत्तानुसार, तेहरानमधील रिव्होल्युशनरी कोर्टाने त्यांना ‘पृथ्वीवर भ्रष्टाचार पसरवणे’ यासह विविध आरोपांमध्ये दोषी ठरवले. कथित राजकीय कारवाया, खोट्या बातम्या पसरवणे, प्रचार करणे आणि इतर आरोपांच्या आधारे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यावरून इराणमधील अधिकारी अजूनही मतभेद आणि विरोधाचा आवाज दडपण्यासाठी मृत्युदंडाचा वापर करत असल्याचे दिसून येते. प्रशासनाच्या या आकडेवारीच्या पलीकडे, नूरमोहम्मदी यांच्यासाठी दोन निष्पाप मुलींवर झालेला हा अन्याय असह्य करणारा ठरला आहे. चार महिन्यांच्या अथक शोधानंतर त्यांच्या मुलींचा शोध लागला खरा, मात्र आता न्यायालयीन निर्णयानंतर आपल्या मुलींना पुन्हा एकदा डोळे भरून पाहण्यासाठी त्या आस लावून बसल्या आहेत.