पश्चिम आशियातील संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये गेल्या आठवड्यात एक शांतता बैठक पार पडली. मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्याने दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. इराणने अण्वस्त्र विकसित न करण्याची लेखी हमी देण्यास नकार दिल्यामुळे ही चर्चा फिस्कटल्याचा दावा अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी केला, तर पाकिस्तानमध्ये झालेली चर्चा अविश्वास आणि संशयाने भरलेली होती, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याच्या मुद्द्यासह इतर अनेक विषयांवर दोन्ही देशांमध्ये तीव्र मतभेद असल्याचे त्यांनी नमूद केले.

इराणच्या शिष्टमंडळात कोणाचा समावेश?

अमेरिका आणि इराण यांच्यात १९७९ नंतर पहिल्यांदाच झालेल्या ऐतिहासिक थेट चर्चेत कोणताही ठोस करार झाला नसला, तरी इराणच्या भूमिकेने जगाचे लक्ष वेधून घेतले. दोन्ही बाजूंनी सध्या तरी पुढची चर्चा नियोजित नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांचे ‘कूटनीती कधीच संपत नाही’ हे वाक्य चर्चेचा विषय ठरले. अमेरिकेबरोबरच्या वाटाघाटीच्या बैठकीकडे इराणने अत्यंत गांभीर्याने पाहिले होते. त्यांनी आपल्या शिष्टमंडळात ७० हून अधिक सदस्यांचा समावेश केला होता. त्यामध्ये अनुभवी राजनैतिक अधिकारी, आर्थिक व कायदे तज्ज्ञ आणि लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या चर्चेमार्फत आर्थिक निर्बंध आणि अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित दीर्घकालीन प्रश्न सोडवण्यावर इराणचा भर होता. या शिष्टमंडळाचे नेतृत्व इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघर घालिबाफ आणि परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी केले. यादरम्यान शिष्टमंडळातील अनेक प्रमुख नेत्यांनी चर्चेनंतर संयमाची भूमिका घेतली असून मतभेद कायम असले तरी संवादाची दारे पूर्णपणे बंद झाली नसल्याचा संदेश दिला.

आणखी वाचा : होर्मुझच्या नाकेबंदीचे ५ मोठे परिणाम; भारतासाठी धोक्याची घंटा? अमेरिकेच्या निर्णयामुळे चिंता का वाढली?

चर्चेनंतर मोहम्मद घालिबाफ काय म्हणाले?

अमेरिका व इराण यांच्यात संघर्ष सुरू झाल्यापासून मोहम्मद बाघर घालिबाफ यांचे राजकीय वजन कमालीचे वाढले आहे. त्यांच्या सार्वजनिक विधानांमुळे आणि इराणच्या सत्ताकेंद्रात व्यावहारिक कठोर भूमिका घेणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे, त्यामुळेच इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. अमेरिकेबरोबरची चर्चा फिस्कटल्यानंतर घालीबाफ यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. इराणी शिष्टमंडळाने या चर्चेत अत्यंत भविष्यवेधी पुढाकार मांडले होते. मात्र, वाटाघाटीदरम्यान इराणचा विश्वास संपादन करण्यात अमेरिका सपशेल अपयशी ठरली. मात्र, इराणच्या राष्ट्रीय संरक्षणाच्या ४० दिवसांच्या कामगिरीचे संवर्धन करण्यासाठी आम्ही एका क्षणासाठीही आमचे प्रयत्न थांबवणार नाही, असे घालीबाफ यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. त्यांच्या या विधानावरून या संघर्षातील परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.

इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची आक्रमक भूमिका

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची हेदेखील घालीबाफ यांच्यासोबत चर्चेत आघाडीवर होते. विशेषतः २०१५ मध्ये अमेरिका आणि इतर देशांसोबत झालेल्या इराण अणुकरारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, जो २०१८ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केला होता. अमेरिकेबरोबरची चर्चा फिस्कटल्यानंतर अराघची यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून नाराजी व्यक्त केली. इराणने युद्ध संपवण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे अमेरिकेशी संवाद साधला. जेव्हा ‘इस्लामाबाद सामंजस्य करार’ अंतिम टप्प्यात आला, तेव्हा अमेरिकेने पुन्हा एकदा अवाजवी मागण्या करून धरसोडीची वृत्ती आणि दबावतंत्राच्या धोरणाचा वापर केला, असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले. गेल्या अनुभवातून अमेरिकेने काहीही धडा घेतलेला दिसत नाही. चांगल्या हेतूला चांगलाच प्रतिसाद मिळतो; तर वैरातून वैरच निर्माण होते, असे म्हणत त्यांनी अमेरिकेला इशाराही दिला. अराघची यांच्या या विधानाने भविष्यात दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा : करोना लसीमुळे ६० हजार जणांचा मृत्यू? इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ; काय आहे यामागचं सत्य?

इराणचे पाकिस्तानमधील राजदूत काय म्हणाले?

इराणचे पाकिस्तानमधील राजदूत रेझा अमिरी मोघदाम यांनीदेखील या वाटाघाटींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. इराणच्या बाजूने येत असलेल्या सर्व प्रतिक्रियांमध्ये मोघदाम यांचे विधान सर्वाधिक सकारात्मक आणि आशादायक मानले जात आहे. इस्लामाबादमधील चर्चेबाबत माहिती देताना त्यांनी आपल्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली. इस्लामाबाद येथे झालेल्या बैठकीतून एका चांगल्या प्रक्रियेची पायाभरणी झाली आहे. जर दोन्ही देशांत परस्पर विश्वास आणि इच्छाशक्ती मजबूत झाली, तर या संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो, अशी आशा त्यांनी पोस्टमधून व्यक्त केली. मोघदाम यांच्या या विधानावरून असे दिसून येते की, इराणच्या वरिष्ठ नेत्यांनी अमेरिकेवर टीका केली असली तरी त्यांच्याकडून चर्चेची दारे पूर्णपणे बंद झालेली नाही. यादरम्यान अमेरिकेबरोबरच्या संघर्षात नौदलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतरही इराणने जागतिक अर्थव्यवस्थेची नाडी समजल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपले नियंत्रण कसे कायम ठेवले आहे, दुसरीकडे अमेरिकेने या महत्त्वाच्या जलमार्गाची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे; त्यामुळे दोन्ही देशांत वाटाघाटीची आणखी बैठक पार पडणार की संघर्ष आणखीनच वाढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.