India Medicine Shortage LPG Petrochemical Crisis: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतातील औषधे निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर होत आहे. गोळ्या व औषधे निर्माण करण्यासाठी कंपन्यांना एलपीजी (LPG) व पेट्रोकेमिकल्सची आवश्यकता असते. या दोन्हींच्या होणाऱ्या पुरवठ्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे औषधे निर्मिती करायची कशी? असा प्रश्न या क्षेत्रातील काही कंपन्यांसमोर निर्माण झाला आहे. पॅरासिटामॉल तसेच इंजेक्शन देण्यासाठी वापरले जाणारे सिरिंज यांच्या उत्पादनावर देखील परिणाम होत आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाची झळ आता देशातील औषधे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कशी बसत आहे? ते जाणून घेऊयात.
औषधे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची केंद्र सरकारकडे मागणी काय?
औषधे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्या समस्या केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय व केंद्रीय रसायने व खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल विभागाकडे मांडल्या आहेत. युद्धाचा परिणाम गोळ्या व औषधे यांच्या उत्पादनावर होत असल्याने करोना काळात जशी सूट दिली होती, तशी सूट आता कंपन्यांना द्यावी, अशी मागणी या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केली आहे. दरम्यान, औषधे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींची वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीत औषधे निर्मिती क्षेत्र एलपीजी व पेट्रोकेमिकल्सवर किती अवलंबून आहे, सध्याची परिस्थिती काय आहे, याचा आढावा घेण्यात आला.
देशात औषधांचा तुटवडा निर्माण होईल का?
देशातील औषधे निर्मिती करणाऱ्या कंपन्या एलपीजी व पीएनजीवर अवलंबून आहेत. त्यामुळे एलपीजी व पीएनजी या दोन गॅसचा पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे केली आहे. पुरवठा खंडित झाल्यास महत्वाच्या औषधांचा तुटवडा निर्माण होऊन त्याचा परिणाम देशात तसेच जागतिक पातळीवर दिसू शकतो, असे कंपन्यांनी म्हटले आहे.
एलपीजीचा वापर कसा केला जातो?
गोळ्या व औषधे निर्मिती करताना बॉइलर, ग्रॅनुलेशन, स्टेरिलायझेशन व इतर प्रक्रियांमध्ये एलपीजीची आवश्यकता असते. या प्रक्रियांसाठी छोट्या कंपन्या मुख्यत: एलपीजी व पीएनजीवर अवलंबून असतात. तर काही मोठ्या कंपन्यांकडे या प्रक्रियांसाठी गॅसऐवजी विद्युत ऊर्जा वापरण्याचे तंत्रज्ञान आहे. एलपीजी व पीएनजी पुरवठा खंडित झाल्यास त्याचा तात्काळ परिणाम औषधे निर्मितीवर होईल. बाजारात त्याचा परिणाम काही महिन्यांनी दिसून येईल. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, “बहुतांश कंपन्यांकडे १५ ते ३० दिवसांचा साठा असतो. काही मोठ्या कंपन्यांकडे तीन ते सहा महिन्यांचा साठा असतो. परंतु, उत्पादन थांबले तर काही महिन्यांनी त्याचा परिणाम दिसून येईल.”
कंपन्यांना पेट्रोकेमिकल्स मिळणे कठीण का झाले?
सरकारने उद्योगांना होणाऱ्या काही पेट्रोकेमिकल्सच्या पुरवठ्यावर निर्बंध लादले आहेत. घरगुती गॅसचा तुटवडा होऊ नये, म्हणून सरकारने असे केले आहे. परंतु, त्याचा परिणाम औषधे निर्मिती व उपकरणांच्या उत्पादनावर झाला आहे. सरकारच्या निर्बंधामुळे ‘रिफायनरी ग्रेड प्रोपिलिन’चा (Propylene) तुटवडा झाला आहे. याचा वापर ‘फार्माकोपोइया-ग्रेड इसोप्रोपील अल्कोहोल’ (IPA) बनवण्यासाठी केला जातो. औषधे उत्पादनात कोटिंग करण्यासाठी IPA चा वापर केला जातो.
२०० कंपन्या उत्पादन थांबवणार?
जामनगरमध्ये असलेल्या रिलायन्सच्या रिफायनरीमधून हे IPA औषधे निर्माण करणाऱ्या कंपन्यांना पुरवले जात होते. परंतु, सरकारच्या आदेशानुसार रिलायन्सने IPA देणे बंद केले आहे. त्यामुळे औषधे निर्मितीतील हा महत्वाचा घटक मिळणे अवघड झाले आहे. दरम्यान, पुढील ७ ते १० दिवसांत २०० औषधे निर्मिती कंपन्या उत्पादन थांबवण्याचा अंदाज आहे.
सरकारच्या निर्णयाने औषधांचा तुटवडा होणार?
“IPA ची आयात होऊ शकत नाही, कारण त्यात भेसळ होण्याची शक्यता खूप जास्त असते. प्रोपिलिनचा वापर करून IPA तयार केले जाते. हेच प्रोपिलिन एलपीजी (घरगुती गॅस) बनवण्यासाठी वापरले जाते. दरम्यान, प्रोपिलिनचा वापर एलपीजी (घरगुती गॅस) उत्पादनासाठी होत आहे. याचा परिणाम महत्वाच्या, जीवनावश्यक असलेल्या औषधांच्या उत्पादनावर होणार आहे. भारतात दर महिन्याला जितकी घरगुती गॅसची मागणी असते तिच्या फक्त ०.३६ टक्केच मागणी यातून पूर्ण केली जाईल. फारसा फरक पडणार नाही. परंतु, महत्वाच्या १४ प्रकारच्या औषधांवर याचा विपरीत परीणाम होईल”, असे सीडीईपीचे अध्यक्ष डॉ. जगजीत भट्टाचार्य म्हणाले.
पॅरासिटामॉल, सिरिंज, ग्लोव्ज मिळणेही अवघड होईल का?
एलपीजी व पीएनजीचा तुटवडा झाल्याने बेंझेनच्या पुरवठ्यावर देखील परिणाम झाला आहे. तापेच्या पॅरासिटामॉल या गोळ्या बनवण्यासाठी बेंझेनचा वापर केला जातो. प्रोपिलिन आणि बेंझेन हे औषधे निर्मितीत सर्वात महत्वाचे घटक आहेत. यांचा वापर करून ग्लोव्ज, पीपीई किट, सिरिंज तयार केले जाते. पेट्रोकेमिकल्स कंपन्यांना न मिळाल्यास या महत्वाच्या गोष्टींवर त्याचा परिणाम झालेला दिसून येईल. बाजारात त्यांचा तुटवडा निर्माण होईल.
