अमेरिकेने हिंदी महासागरात इराणच्या नौदलाची युद्धनौका उद्ध्वस्त केली आहे. श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या इराणी युद्धनौकेला अमेरिकेने लक्ष्य केले. ‘आयआरआयएस देना’ (IRIS Dena) असे इराणी युद्धनौकेचे नाव आहे. या युद्धनौकेवर झालेल्या हल्ल्यात ८० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. युद्धनौकेवर एकूण १३० जण होते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही युद्धनौका भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या सरावात सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. भारतातून परतत असताना या युद्धनौकेवर हल्ला झाला. हिंदी महासागरात अमेरिकेने इराणी जहाजाला लक्ष्य केले. या हल्ल्याबाबत तसेच इराणी युद्धनौका भारतात का आली होती याबाबत अधिक जाणून घेऊयात.
अमेरिकेची प्रतिक्रिया
इराणच्या युद्धनौकेला उद्ध्वस्त केल्याच्या बातमीला बुधवारी अमेरिकेने दुजोरा दिला. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात युद्धनौकेवरील किमान ८० जणांचा मृत्यू झाल्याचे श्रीलंकेच्या उप परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले. ‘IRIS देना’ ही युद्धनौका भारतातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेल्या युद्ध सरावात सहभागी झाली होती. १७ व १८ फेब्रुवारी रोजी ‘इंटरनॅशनल फ्लिट रिव्हि्यू’ मध्ये ही युद्धनौका सहभागी झाली होती. दरम्यान, या युद्धनौकेवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेचे संरक्षण सचिव पेट हेगसेथ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “अमेरिकेच्या पाणबुडीने इराणची युद्धनौका बुडवली आहे. आंतरराष्ट्रीय समुद्रात युद्धनौका सुरक्षित असल्याचा त्यांचा (इराणचा) समज होता. टॉर्पिडोचा वापर करून तिला बुडवले आहे.” दुसऱ्या महायुद्धानंतर टॉर्पिडोचा वापर करून पहिल्यांदाच शत्रूच्या जहाजाला बुडवण्यात आल्याचे हेगसेथ म्हणाले.
८७ जणांचा मृत्यू
‘IRIS देना’ ही इराणच्या नौदलाची युद्धनौका श्रीलंकेच्या किनारपट्टीवरील ‘गॅले’ शहरापासून ४० नॉटिकल माईल्स दूर होती. परंतु, ती श्रीलंकेच्या इकॉनॉमिक झोनमध्ये होती. त्यावेळी तिच्यावर हल्ला झाला. बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास श्रीलंकेला या हल्ल्याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर श्रीलंकन नौदलाने बचाव मोहीम हाती घेतली होती. युद्धनौकेवरील ३२ जणांचा वाचवण्यात आल्याचे श्रीलंकेच्या नौदलाने ‘बीबीसी’ला सांगितले. तसेच युद्धनौकेवर एकूण १८० जण होते, असा अंदाज श्रीलंकन नौदलाने व्यक्त केला आहे. दरम्यान, किती जण बेपत्ता आहेत याबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नाही. तर ८७ जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती श्रीलंकेकडून देण्यात आली.
Welcome! | خوش آمدید!
— Eastern Naval Command ?? (@IN_HQENC) February 17, 2026
????? Indian Navy welcomes IRIS Dena, of the Iranian Navy, on her arrival at #Visakhapatnam to participate in #IFR2026_India and #MILAN2026, reflecting long-standing cultural links between the two nations.@India_in_Iran #BridgesOfFriendship… pic.twitter.com/O77v2qNJHJ
इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू
अमेरिका व इस्रायलने इराणच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. या युद्धाच्या पाचव्या दिवशी हा हल्ला झाला. अमेरिका व इस्रायलने इराणमधील लष्करी तळांना लक्ष्य केले. त्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. तसेच इराणचे काही लष्करी अधिकारी देखील मारले गेले. इराणने प्रत्युत्तरात पश्चिम आशियातील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून हिंदी महासागरात, श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ इराणी युद्धनौका उद्ध्वस्त करण्यात आली आहे.
इराणी युद्धनौका भारतात का आली होती?
भारतातील विशाखापट्टणम येथे ‘इंटरनॅशनल फ्लिट रिव्हि्यू २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्यासाठी इराणी युद्धनौका ‘IRIS देना’ भारतात आली होती. भारतीय नौदलाचे इतर देशांच्या नौदलांशी असलेले संबंध आणखी मजबूत व्हावेत म्हणून ‘इंटरनॅशनल फ्लिट रिव्हि्यू २०२६’चे भारतात आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण ८५ जहाज, युद्धनौकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १९ जहाज या आंतरराष्ट्रीय होत्या. भारतीय नौदलाच्या ६० जहाज तसेच युद्धनौका यात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, ‘इंटरनॅशनल फ्लिट रिव्हि्यू’बरोबरच यंदा ‘मिलान’ (MILAN) या युद्धसरावाचेही आयोजन भारतीय नौदलाकडून करण्यात आले होते.
‘IRIS देना’ युद्धनौका
‘IRIS देना’ ही इराणने विकसित केलेली युद्धनौका आहे. या युद्धनौकेतून क्षेपणास्त्र डागता येते. तसेच त्यावर अँटी शिप मिसाईल्स तैनात असतात. याशिवाय तोफ, टॉर्पिडो व मशिन गन देखील या युद्धनौकेवर लावण्यात आल्या आहेत. या श्रेणीतील युद्धनौकांवर अमेरिकेने २०२३ मध्ये निर्बंध लादले आहेत.
https://t.co/PiqQpVIrMu pic.twitter.com/Wc1e0B0um7
— Department of War ?? (@DeptofWar) March 4, 2026
अमेरिकेने केलेल्या हल्ल्याने अनेक प्रश्न उपस्थित
आंतरराष्ट्रीय समुद्रात एखाद्या जहाजावर हल्ला होणे कायदेशीर आहे अथवा नाही, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार आंतरराष्ट्रीय समुद्रात जहाजांवर हल्ला करण्यास प्रतिबंध आहे. आंतरराष्ट्रीय समुद्राचा वापर हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी करावा, असे आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार सांगण्यात येते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ द सी’ने आंतरराष्ट्रीय समु्द्राच्या वापरासंबंधित नियम आखून दिले आहेत.
अमेरिकेला त्यांच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करावा लागेल – अरागची
अमेरिकेला त्यांच्या या कृत्याबद्दल पश्चात्ताप करावा लागेल, असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांनी दिला आहे. एक्सवर अरागची यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले, “इराणच्या किनाऱ्यापासून २००० मैल दूर असलेल्या युद्धनौकेवर अमेरिकेने हल्ला केला. ही नौका भारताच्या निमंत्रणावर गेली होती. त्यात १३० खलाशी होते. कोणतीही पूर्वसूचना न देता आंतरराष्ट्रीय समुद्रात अमेरिकेने हा क्रूर हल्ला केला.”
