अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या ज्वाळा पश्चिम आशियत धगधगत आहेत. इराणची ‘आयआरआयएस देना’ ही फ्रिगिट प्रकारातील युद्धनौका अमेरिकेने श्रीलंकेजवळ, हिंदी महासागर क्षेत्रात टॉर्पिडो हल्ला करून बुडविली. अमेरिकेच्या या कृतीने आखातातील युद्ध हिंदी महासागर क्षेत्रापर्यंत आले. यामुळे केंद्र सरकारवर टीका होत आहे. त्याविषयी…

‘पाहुण्यां’वर हल्ला

भारतीय नौदलाने १५ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विशाखापट्टणम येथे ‘आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू’ (आयएफआर), ‘मिलान युद्धसराव’ आणि ‘इंडियन ओशन नेव्हल सिम्पोझियम’ (आयओएनएस) या अतिशय मोठ्या अशा आंतरराष्ट्रीय सागरी उपक्रमांचे आयोजन केले होते. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनीसह जगभरातून ७४ देश यामध्ये सहभागी झाले होते. एकाच वेळेला तीन वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन प्रथमच केले गेले. ‘आयएफआर’ उपक्रमाचे आयोजन यापूर्वी २००१ आणि २०१६ मध्ये करण्यात आले होते. १० वर्षांनंतर हा उपक्रम होत असल्याने त्याला वेगळे महत्त्व होते. ‘मिलान’ युद्धसरावाला १९९५ मध्ये सुरुवात झाली. दर दोन वर्षांनी याचे आयोजन केले जाते. भारताच्या सागरी शक्तीचे दर्शन हा याबरोबरच सागरी क्षेत्रातील भारताचे सामरिक महत्त्वही अशा कार्यक्रमांनी अधोरेखित होते. या मध्ये सहभागी होण्यासाठी इराणची ‘आयआरआयएस देना’ ही युद्धनौका भारतात आली होती. इराणबरोबरच ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, ओमान, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया, रशिया, सिशेल्स, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, थायलंड, यूएई, व्हिएतनाम या देशांच्या युद्धनौका या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १८ फेब्रुवारी रोजी ‘फ्लीट रिव्ह्यू’ घेतला. या कार्यक्रमांदरम्यान इराणमध्ये युद्ध पेटलेले नव्हते. मात्र, इराणची युद्धनौका माघारी परतताना अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले सुरू झाले होते. भारतातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन परत जाताना श्रीलंकेपासून जवळ आंतरराष्ट्रीय समुद्रामध्ये या नौकेवर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला केला. त्यात ही युद्धनौका नष्ट झाली. हल्ल्यात नौकेवरील ८७ जण ठार झाले. ३२ जखमी झाले आणि ६१ बेपत्ता झाले. अमेरिकेच्या या कृतीने आखातातील युद्ध हिंदी महासागर क्षेत्रापर्यंत आले.

हिंदी महासागर क्षेत्र

भारताच्या दृष्टीने हिंदी महासागर क्षेत्राचे सामरिक महत्त्व मोठे आहे. यामध्ये हिंदी महासागर आणि हिंदी महासागर क्षेत्र (आयओआर) हे दोन्ही वेगळे आहेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. हिंदी महासागर क्षेत्रात किनारी प्रदेशावरील सुमारे ३६ देश येतात. भारताच्या सागरी हितसंबंधांच्या दृष्टीने हा भाग पहिल्या प्राधान्यक्रमांकावर येतो. या बरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉरिशस येथील २०१५ आणि २०२५ मधील दौऱ्यांमध्ये ‘सागर’ (सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन) आणि ‘महासागर’ (म्युच्युअल अँड होलिस्टिक अॅडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अॅक्रॉस द रीजन) ही जाहीर केलेली उद्दिष्टेही लक्षात घ्यावी लागतील. ‘महासागर’ हे ‘सागर’ उद्दिष्टाचेच विस्तारित रूप आहे. या विभागातील भारताचे महत्त्व अधोरेखित करणे आणि या क्षेत्रामध्ये ‘नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर’ म्हणून भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट यात आहे. हिंदी महासागर क्षेत्र हे शांततेचे क्षेत्र म्हणून असावे, अशीही एक संकल्पना आहे. भारताची या क्षेत्रातील ही उद्दिष्टे, ‘इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू’सारख्या कार्यक्रमांचे आयोजन हे पाहता पाहुणे म्हणून आलेल्या इराणची नौका माघारी जाताना झालेल्या हल्ल्यामुळे भारताच्या हिंदी महासागर क्षेत्रातील सामरिक हितसंबंधांना ठेच बसल्याची टीका होत आहे.

टीका काय झाली?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी पंतप्रधान आणि केंद्र सरकारवर टीका केली. भारताच्या तटस्थ परराष्ट्र धोरणाला तडा गेल्याची टीका झाली. या क्षेत्रामध्ये भारताच्या ‘नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर’ या प्रतिमेला तडा गेल्याची टीका काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी केली. सामरिक तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी अमेरिकेवर टीका करताना भारताशी मित्रदेश या नात्याने वर्तणूक झाली नसल्याचा ठपका ठेवला. इराणचे परराष्ट्रमंत्री अराघाची यांनी अमेरिकेवर टीका करताना ‘आयआरआयएस देना’ ही नौका भारतीय नौदलाच्या आमंत्रणावरून तिकडे गेल्याचे म्हटले. भारताबरोबर सरावात भाग घेऊन परतताना झालेला हल्ला भ्याड असल्याचे ते म्हणाले.

सरकारची भूमिका

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ‘रायसिना डायलॉग’मध्ये यावर भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘इराणची नौका ‘फ्लीट रिव्ह्यू’साठी आली होती. एका अनपेक्षित घडामोडींच्या चक्रात ते सापडले.’ हिंदी महासागरात दिएगो गार्शिया (अमेरिकेचा लष्करी तळ) गेल्या पाच दशकांपासून अस्तित्वात आहे. जिबुती, हंबंटोटा यांचीही उदाहरणे त्यांनी दिली. हिंदी महासागरात परदेशी लष्करांचे अस्तित्व असल्याचे त्यांनी सूचित केले. तसेच, मानवतेच्या आधारावर ‘आयआरआयएस लावण’ या युद्धनौकेला कोची येथे येण्याची परवानगी दिल्याचेही त्यांनी सांगितले. संसदेत बोलताना, ९ मार्च रोजी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितले, की इराणने २८ फेब्रुवारी रोजी तीन युद्धनौकांना भारताच्या बंदरांवर येण्याची परवानगी मागितली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशीच ती आपण ती दिली, असे विधान त्यांनी केले. ‘आयआरआयएस लावण’ कोची येथे, तर अन्य एक युद्धनौका श्रीलंकेतील बंदरावर दाखल झाली. या युद्धाबाबत चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आणि शांततेचे आवाहन भारत सातत्याने करीत आहे.

आंतरराष्ट्रीय समुद्रात नौका लक्ष्य

या ठिकाणी आणखी एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. इराणची युद्धनौका हिंदी महासागर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय समुद्रात लक्ष्य केली गेली. ज्या ठिकाणी या नौकेला लक्ष्य केले गेले, ते ठिकाण कुठल्याही देशाच्या हद्दीत येत नव्हते. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भारताचा नौकेवरील हल्ल्याशी संबंध येत नाही.

माहिती व्यवस्थापनात भारत कमी? माहिती व्यवस्थापन आणि अधिकृत प्रतिसाद

सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या भूराजकीय स्थितीमध्ये आणि बदलणाऱ्या युद्धपद्धतीमध्ये तंत्रज्ञानाचेच महत्त्व केवळ वाढलेले नसून, माहिती व्यवस्थापनाचाही खूप मोठा प्रभाव राहिला आहे. घटना घडल्यानंतर अधिकृत प्रतिसादास वेळ लागला, तर त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. माहिती व्यवस्थापन, घटनेवर सरकारचा अधिकृत प्रतिसाद देण्याचा कमीत कमी वेळ सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या काळात अतिशय महत्त्वाचा आहे. बऱ्याचदा सरकारचा अधिकृत प्रतिसाद येईपर्यंत एखादे चुकीचे कथन समाजमनावर बिंबण्याचा धोका असतो.

आत्मनिर्भरता हाच पर्याय

इराणच्या नौकेवरील अमेरिकेचा हल्ला, त्यावरून होणारी टीका आणि केंद्र सरकारची भूमिका पाहिली, तर सातत्याने या साऱ्याची उत्तरे आत्मनिर्भरतेमध्ये मिळतात. इतर देशांवरील विविध कारणांसाठी असलेल्या अवलंबित्वाला पर्याय मिळाला, तर होणारी भूराजकीय कोंडी कमी राहण्याची शक्यता राहते. आत्मनिर्भर भारत ही मोहीम आपण सुरू केलीच आहे. तिचा कालमर्यादेत आणि क्षेत्रे निश्चित करून विस्तार होणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न आवश्यक आहेत.

prasad.kulkarni@expressindia.com