scorecardresearch

विश्लेषण: अदानींच्या २०,००० कोटींच्या ‘एफपीओ’मध्ये गुंतवणूक करावी काय?

सध्याच्या अस्थिर बाजार स्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी नुकतेच बाळसे धरू पाहणाऱ्या या व्यवसायासाठी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याआधी पुढील काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक ठरेल.

विश्लेषण: अदानींच्या २०,००० कोटींच्या ‘एफपीओ’मध्ये गुंतवणूक करावी काय?
अदानींच्या २०,००० कोटींच्या ‘एफपीओ’मध्ये गुंतवणूक करावी काय? (संग्रहीत छायाचित्र – पीटीआय)

गौरव मुठे

बंदरांपासून ऊर्जा क्षेत्रापर्यंतच्या विविध क्षेत्रांत विस्तार फैलावलेल्या अदानी समूहातील अदानी एंटरप्रायझेसने ‘फॉलो-ऑन पब्लिक ऑफर -एफपीओ’द्वारे समभागांची विक्री करून २०,००० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या भागविक्रीतून ग्रीन हायड्रोजनसारख्या नव्या महत्त्वाकांक्षी व्यवसायात बस्तानाचा कंपनीचा मानस आहे. तथापि सध्याच्या अस्थिर बाजार स्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी नुकतेच बाळसे धरू पाहणाऱ्या या व्यवसायासाठी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याआधी पुढील काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक ठरेल.

‘एफपीओ’ म्हणजे काय?

भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपनीला भविष्यातील व्यवसाय विस्तारासाठी भांडवलाची आवश्यकता भासल्यास, कंपनी पुन्हा एकदा प्राथमिक बाजारात गुंतवणूकदारांना आजमावते आणि समभाग विक्री प्रस्तावित करते. अशा समभाग विक्रीला फॉलोऑन सार्वजनिक विक्री अर्थात ‘एफपीओ’ असे म्हणतात.

अदानी एंटरप्रायझेसच्या ‘एफपीओ’ कधी खुला होणार?

येत्या शुक्रवारी, २७ जानेवारीला अदानी एंटरप्रायझेसची समभाग विक्री खुली होत असून गुंतवणूकदारांना त्यात ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल. समभाग विक्रीसाठी कंपनीने किमान ३,११२ रुपये तर कमाल ३,२७६ रुपये किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या समभागाच्या बाजारभावापेक्षा १३.५ टक्के सवलतीच्या दराने त्यामुळे हा समभाग गुंतवणूकदारांना मिळविता येईल. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ४ आणि त्यानंतरच्या ४ च्या पटीत समभागांसाठी बोली लावून, कंपनीच्या या भागविक्रीत सहभागी होता येईल. गुंतवणूकदारांना १३,१०४ रुपयांची किमान गुंतवणूक करावी लागेल. या प्रस्तावित ‘एफपीओ’मधील ३५ टक्के समभाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ज्या गुंतवणूकदारांना ‘एफपीओ’च्या माध्यमातून समभाग मिळतील त्यांच्या डीमॅट खात्यात ते ७ फेब्रुवारीला जमा होतील आणि ८ फेब्रुवारीपासून ते त्या समभागांची खरेदी-विक्री करू शकतील. तसेच यातील ५० कोटी रुपये मूल्याचे समभाग कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

विश्लेषण: क्यूबाचे क्रांतिकारी चे ग्वेरा यांची मुलगी कोण आहे? भारताशी काय आहे नातं?

समभागाची आतापर्यंतची कामगिरी कशी?

अदानी एंटरप्रायझेसचा समभाग गेल्या वर्षी जानेवारी २०२२ मध्ये १,८२८ रुपयांवर व्यवहार करत होता. तो विद्यमान महिन्यात (जानेवारी २०२३) शुक्रवारच्या सत्रात ३,४५६.१५ पातळीवर बंद झाला. वर्षभरात समभागाचे मूल्य दुपटीहून अधिक वधारले आहे. तर त्या तुलनेत बाजारातील मोठ्या चढ-उतारांमुळे सेन्सेक्स जानेवारी २०२२ मध्ये असलेल्या ६१,०४५ अंशांच्या पातळीजवळच सध्या व्यवहार करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीच्या समभागाने ४,१९० रुपयांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र सध्या निफ्टी निर्देशांक समाविष्ट आघाडीच्या ५० कंपन्यांमध्ये सर्वाधिक सुमार कामगिरी करणारा हा समभाग आहे. महिन्याभरात समभागाने १७ टक्क्यांहून अधिक मूल्य गमावले आहे. शिवाय कंपनीकडून ‘एफपीओ’च्या घोषणेनंतर तीन दिवसांत तो ५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

‘एफपीओ’ गुंतवणूक करावी का?

कंपनीने गेल्या आठवड्यात बुधवारी ‘एफपीओ’ची घोषणा केली. त्या दिवसाच्या समभागाच्या बाजारभावाच्या म्हणजेच ३,५९५.३५ या किमतीच्या १३.४४ टक्के म्हणजेच ३१९ रुपयांच्या सवलतीसह ‘एफपीओ’च्या माध्यमातून समभाग मिळणार आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून, ‘एफपीओ’मध्ये सवलतीच्या किमतीत समभाग खरेदी करण्याची ही एक चांगली संधी असेल. कारण समभागाने भूतकाळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शिवाय किरकोळ गुंतवणूकदारांना प्रति समभाग ६४ रुपयांची अतिरिक्त सवलत मिळणार आहे. बाजारातील विश्लेषकांच्या मते, कंपनीने नवीन व्यवसायात प्रवेश केला असून त्यात वेगाने विस्तार तसेच त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल आहे. सप्टेंबरअखेर सरलेल्या तिमाहीच्या निकालांमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसून आले आहे. कंपनीचा निव्वळ नफा २१२ कोटींवरून दुपटीने वाढत ४६०.९४ कोटी झाला आहे. तसेच महसुलात देखील १८९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

विश्लेषण: ‘आयएनएस विक्रमादित्य’च्या दुरुस्तीची देशात चर्चा का? युद्धनौकेमुळे नौदलाची ताकद किती वाढणार?

गुंतवणूकदारांनी या गोष्टीही लक्षात घाव्यात?

कंपनीने भविष्यासाठी मोठी विस्तार योजना आखली आहे. सध्या ‘एफपीओ’च्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या २०,००० कोटी रुपयांपैकी १०,८६९ कोटी रुपये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, विद्यमान विमानतळांवरील कामे आणि एक्स्प्रेसवेच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार आहेत. तर ४,१६५ कोटी रुपये विमानतळ, रस्ते आणि सौर ऊर्जेतील उपकंपन्यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरले जाणार आहेत. कंपनीला ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी ५० अब्ज डॉलरच्या भांडवलाची गरज आहे. त्यामानाने सध्याची निधी उभारणी खूपच अत्यल्प आहे. ‘बीएसई’कडे दाखल केलेल्या मसुदा प्रस्तावानुसार, ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कंपनीवर एकूण ४०,०२३.५० कोटी रुपयांचे कर्ज आहे. कमी ते मध्यम जोखीम घेऊ इच्छिणारे गुंतवणूकदार आणखी काही काळ कंपनीची कामगिरी बघून थोड्या कालावधीने कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकतात. तर सध्याच्या काळात थोडी जोखीम घेण्यास तयार असणाऱ्या गुंतवणूकदारांनी सध्याच्या सवलतीच्या किमतीमध्ये गुंतवणूक करण्यात हरकत नाही,असे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

(अस्वीकरण : गुंतवणूकदारांनी स्वतःच्या जोखमीवर आणि आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा)

gaurav.muthe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 09:09 IST

संबंधित बातम्या