AI vs Copyright Law: मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात चाकाचा शोध लागला आणि तंत्रज्ञानाच्या विकासाची गाडी भरधाव वेगाने निघाली. कधी काळी वन्य प्राण्याप्रमाणे भटकणाऱ्या माणसाने आता मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे (AI – एआय) तंत्रज्ञान विकसित करून मानवी बौद्धिक शक्तीचेच प्रतिरूप तयार केले आहे. किंबहुना एआय हे तंत्रज्ञान माणसाने तयार केलेले असले तरी ते मानवी बौद्धिक क्षमतेशीच स्पर्धा करणारे ठरते आहे.

३० मिनिटांचे काम ३० सेकंदात

काही दिवसांपूर्वी ‘गिबली/घिबली’ आर्ट’चा ट्रेण्ड क्षितिजावर होता. तसं पाहिलं तर, या कलेने एका जपानी कलाकाराच्या म्हणजेच हायाओ मियाझाकी (Hayao Miyazaki) यांच्या कुंचल्यातून जन्म घेतला आणि पडद्यावर मूर्त स्वरूपात अवतरली. स्टुडिओ गिबलीमध्ये एक चित्रपट तयार करण्यासाठी साधारण २ ते ५ वर्षे लागतात. प्रत्येक फ्रेम ही हस्तचित्रित असते. एका फ्रेमवर काम करण्यासाठी एका कलाकाराला ३० मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत वेळ लागू शकतो. तर, एआय हेच चित्र किंवा फ्रेम ५ ते ३० सेकंदात तयार करतं. यावरूनच या तंत्रज्ञानाची ताकद लक्षात येते.

प्रश्न कॉपीराइटचा

परंतु, ज्यावेळी ‘पॉवर’ किंवा ‘ताकद’ या शब्दाचा प्रयोग केला जातो, त्यावेळी मात्र त्या संबंधित असलेले चांगले-वाईट असे दोन्ही धोके स्वीकारावे लागतात. असंच काहीसं तंत्रज्ञानाच्या बाबतीतही घडतंय किंवा घडत आलेलं आहे. गिबली ही कला एका कलाकाराच्या सर्जनतेतून प्रकट झाली असली तरी जनरेटिव्ह एआयने काही सेकंदात त्याचे प्रतिरूप तयार केले आणि विशेष म्हणजे यासाठी मूळ कलाकृतीच्या निर्मात्याला विचारणाही करण्यात आली नाही. जगातील कोट्यवधी लोकांनी कोणताही विचार न करता या तंत्रज्ञानाचा मोकाट वापर केला, त्यात बहुसंख्य मान्यवरही होते. त्यामुळे साहजिकच येथे प्रश्न निर्माण होतो तो त्या मूळ कलाकारांच्या कॉपीराइटचा अर्थात स्वामित्वमूल्याशी संबंधित कायदेशीर हक्कांचा.

एआय आणि कॉपीराइट

एखाद्या बातमीच्या, लेखाच्या खाली, पुस्तकावर एका वर्तुळात सी © हे अक्षर आपण नेहमीच पाहतो. याचा अर्थही आपल्याला माहीत असतो. म्हणजेच तो दस्तऐवज हा कॉपीराइट या कायद्याअंतर्गत संरक्षित आहे. कॉपीराइट कायदा १७ व्या शतकात तंत्रज्ञानाचा परिणाम म्हणूनच अस्तित्त्वात आला. १७१० साली छपाई यंत्राच्या शोधानंतर निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला होता. या कायद्याचा हेतू मूळ प्रकाशकाचे अनधिकृत प्रकाशनापासून संरक्षण करणे, शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे आर्थिक हित साधणे हा होता. अगदी सुरुवातीपासून या कायद्याने बदलत्या तंत्रज्ञाप्रमाणे स्वतःला जुळवून घेतले आहे. हा बदल छपाई यंत्रापासून फोटोकॉपी मशीनपर्यंत, रेकॉर्डिंग उपकरणांपासून इंटरनेटपर्यंत सर्वच क्षेत्रात पाहू शकतो. परंतु, नव्या एआय तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र हा कायदा किती उपयोगी पडेल याबाबतीत मात्र शंका निर्माण झाली आहे.

कॉपीराइटसमोर एआयचे आव्हान

या कायद्याबाबत अशी शंका येणं हे काही नवीन नाही. प्रत्येक २० वर्षांनी नव्या तंत्रज्ञानाच्या आगमनाबरोबर अशा चर्चा पुन्हा उफाळून येतात. या कायद्यानेच आजवर मूळ साहित्याच्या अवैध पुनरुत्पादनावर प्रतिबंध घालण्यात यश मिळवलं आहे. सध्या या कायद्यासमोर एआय हे नवे आव्हान आहे. मूळ सर्जकांच्या शैलीचा वापर करून नवनिर्मिती करण्यापासून रोखण्याचे काम या कायद्याला करायचे आहे.

पूर्वी हा कायदा मूळ कलाकृतींचा किंवा साहित्याचा अवैध वापर, साहित्यकृतीची चोरी करण्यासंबंधी होता. आता मात्र एआयच्या प्रशिक्षणासाठी कॉपीराइट असलेले साहित्य वापरण्यास बंदी करण्यासाठीही या कायद्याचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. म्हणजेच, डमी प्रत तयार करण्यावर नव्हे, तर एआयच्या प्रशिक्षण प्रक्रियेवरही नियंत्रण ठेवण्याचं आव्हान कायद्यापुढे उभं आहे.

इंटरनेट स्क्रॅपिंग म्हणजे काय?

एआय प्लॅटफॉर्म्स ‘इंटरनेट स्क्रॅपिंग’ नावाचे तंत्रज्ञान वापरतात. यामध्ये Large Language Models (LLMs) या प्लॅटफॉर्मला उपलब्ध सर्व ज्ञानावर प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणासाठी एआय प्लॅटफॉर्म कॉपीराइट असलेलं किंवा नसलेलं अशा दोन्ही प्रकारचं मटेरियल वापरतो. एआय (Artificial Intelligence) प्लॅटफॉर्म इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचे मोठ्या प्रमाणात जतन आणि विश्लेषण करतात. ही प्रक्रिया ‘इंटरनेट स्क्रॅपिंग’ (Internet Scraping) किंवा वेब स्क्रॅपिंग म्हणून ओळखली जाते. या पद्धतीचा वापर करून विविध वेबसाइट्स, ब्लॉग्ज, लेख, पुस्तकं, गाणी, चित्रं अशा अनेक माध्यमांमधून माहिती गोळा केली जाते. ही माहिती त्यानंतर Large Language Models (LLMs) नावाच्या मॉडेल्सला शिकवण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच, ही मॉडेल्स इंटरनेटवरील भाषेचा, लेखनशैलीचा आणि ज्ञानाचा अभ्यास करून एआयला वेगवेगळी उत्तरं देण्यासाठी सुसज्ज करतात. थोडक्यात, एआय प्लॅटफॉर्म इंटरनेटवरून माहिती गोळा करतात आणि वापरकर्त्यांना प्रतिसाद देतात. गिबली हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मूळ कलाकाराची शैली शिकून वापरकर्त्याच्या गरजेनुसार नवनिर्मिती केली जाते. म्हणूनच आधी कायद्याला नक्कल करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी कार्यरत राहावे लागत होते, आता एआय प्लॅटफॉर्मच्या ट्रेनिंग प्रोसेसवर नियंत्रण ठेवण्याचे काम करावे लागणार आहे.

फेअर यूज

सध्या एआय विरुद्ध साहित्य, संगीत, छायाचित्रे यांसारख्या विषयांवर कॉपीराइट उल्लंघनाच्या केसेस जगभर लढल्या जात आहेत. अशाच प्रकारचे काही खटले अमेरिकेतील न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. अमेरिकेच्या कॉपीराइट कायद्याअंतर्गत ‘fair learning’ and ‘fair use’ हे तत्त्व अवलंबण्यात आले आहे. या प्रकरणांमध्ये OpenAI ने एक opt-out mechanism विकसित केली आहे. त्यामुळे प्रकाशक त्यांच्या साहित्याचा डेटा ट्रेनिंगसाठी वापर करू नये, यासाठी नोंद करू शकतात. मात्र ही मेकॅनिझम केवळ भविष्यातील प्लॅटफॉर्म्सना लागू होऊ शकते, विद्यमान प्लॅटफॉर्म्सना नाही.

भारतीय न्यायालयांना सूचना

भारतात प्रा. डॉ. अरुल जॉर्ज स्कारिया यांनी न्यायालयाला एक महत्त्वाची सूचना केली आहे. एआयच्या प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेल्या डेटामधील माहिती तांत्रिकदृष्ट्या व प्रत्यक्ष वापरातून काढून टाकणे शक्य आहे का? यावर विचार करणे आवश्यक आहे. शिवाय एआय तंत्रज्ञानाचा भारतातील विकास लक्षात घेता, कायदेशीर पद्धतीने एआय प्लॅटफॉर्मना माहितीचा ऍक्सेस मिळणे आणि OpenAI कडून चुकीच्या स्रोतांचे श्रेय दिले गेल्यास त्याबाबत योग्य स्पष्टीकरण किंवा सुधारणा करण्याचा न्यायालयाने आदेश द्यावा, यावरही त्यांनी विशेष भर दिला आहे.

फेअर यूजच्या लवचिकतेचा अभाव

भारतीय कॉपीराइट कायदा हा मूळ हक्कधारकांचे अधिकार संरक्षित करत असला तरी, तो ‘fair use’ सारख्या लवचिक चाचणीच्या अभावामुळे अनेकदा ज्ञानाच्या प्रसारावर मर्यादा घालतो. परिणामी, मूळ उद्देश शिक्षण-संवर्धन असतानाही, याच कायद्याचा वापर माहितीवर बंदी घालण्यासाठी होऊ शकतो. ज्यामुळे समाजातील मुक्त ज्ञानप्रवाहाला अडथळे येऊ शकतात.

प्रशिक्षणाच्या दर्जावर एआयची कार्यक्षमता अवलंबून

तर दुसऱ्या बाजूला OpenAI ने विकसित केलेले opt-out mechanism भविष्यातील जनरेटिव्ह एआयच्या विकासावर मोठा परिणाम करू शकते. एआयची कार्यक्षमता मुख्यतः त्याला मिळणाऱ्या प्रशिक्षणाच्या दर्जावर अवलंबून असते. जर, योग्य आणि उच्च प्रतीच्या माहितीवर आधारित प्रशिक्षण मिळाले नाही तर नव्याने विकसित होणाऱ्या एआय प्लॅटफॉर्म्ससाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे यातील समतोल राखण गरजेचं आहे.

एकुणातच कुठलीही नवनिर्मिती ही पूर्वसूरींच्या कामांवर आधारित असते. जनरेटिव्ह एआय असो किंवा मानवी सर्जनशीलता ही आधीच्या पूर्वनिर्मितीकडून शिकण्याच्या प्रक्रियेतूनच विकसित झालेली आहे. पूर्वनिर्मिती ही पुढील सर्जनासाठी आवश्यक असलेले खाद्य आहे. त्यामुळे कॉपीराइट कायद्याचा वापर करून भविष्यातील सर्जकांना हा स्रोतच बंद होईल, असं होता कामा नये. याशिवाय, सध्या सुरू असलेल्या खटल्यात प्रकाशकांनी मांडलेले युक्तिवाद भविष्यात मानवीनिर्मिती आणि मशीनद्वारे केलेल्या निर्मितीमध्ये फरक करण्याच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात आणि त्यानुसार वेगवेगळे कायदेशीर परिणामही निश्चित करू शकतात. मात्र हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की, एखाद्या माणसाला काहीही नवीन निर्माण करण्यासाठी आधी शिकावं लागतंच आणि सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याने मानवी आणि यंत्र निर्मिती यामध्ये कोणताही वेगळा कायदेशीर फरक केलेला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कायदेशीर समतोल आवश्यक

सध्याच्या समस्येवर उपाय शोधताना कॉपीराइट कायद्याच्या मूलभूत तत्वांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. कॉपीराइट ही संकल्पना केवळ कल्पना किंवा माहितीला लागू होत नाही; तर केवळ त्या माहितीच्या मांडणीवर, म्हणजेच अभिव्यक्तीवर लागू होते. एआय प्लॅटफॉर्म फक्त माहितीचा उपयोग प्रशिक्षणासाठी करत असेल आणि त्या कल्पनेची अभिव्यक्ती चोरत नसेल, तर त्याला कायद्यानुसार उल्लंघन मानलं जात नाही. मात्र, ज्यावेळेस एआय कॉपीराइट संरक्षित मजकूरच उचलतो, त्यावेळी मात्र सध्याच्या कॉपीराइट कायद्यातील नियम अशा उल्लंघनांना पकडण्यासाठी सक्षम आहेत. या कायद्याच्या मूलतत्त्वाशी तडजोड होऊ नये, कारण हे तत्त्व सर्जनशीलतेच्या हितासाठी आवश्यक आहे. याच तत्ानेत्व जनरेटिव्ह एआय आणि मानवी सर्जनशीलता यांच्यात समतोल राखण्याचं माध्यम म्हणून कार्य करणंही अपेक्षित आहे.