Johnson & Johnson baby powder controversy: संध्याकाळी तीटलावणीची वेळ झाली आणि तशी लहानग्या बाबूची घरभर धावपळ सुरू! आजीनं शेवटी दोन पायांमध्ये धरलं आणि उचलून अंघोळीला नेलं. अंघोळीनंतर अंगावर पंचा गुंडाळून बाबूचा घरभर खेळ चालू होता. आजीनं प्रेमानं बाबूला मांडीवर घेतलं आणि नेहमीप्रमाणे त्या  टाल्कम पावडरच्या डबीत तो मऊ पफ बुडवून, बाबूच्या अंगावरच्या प्रत्येक घडीवर बेबी पावडर थापली जायची. पावडरचा तो ओळखीचा सुवास संपूर्ण खोलीत पसरला; पण तितक्यात, बाबूला एकदम ठसका लागला आणि तो खोकू लागला…

तेवढ्यात बाबूच्या आईनं आजीच्या हातातून हळूच पावडरची डबी बाजूला केली आणि म्हणाली, “आई डॉक्टरांनी बाळाला पावडर लावायला स्पष्टपणे नाही सांगितलं आहे.”

आजीनं आश्चर्यानं विचारलं, “अगं, आम्ही तर तुम्हा सगळ्यांना हीच पावडर लावून मोठं केलं! मग आताच काय असं बदललं?”

हा प्रश्न केवळ बाबूच्या आजीचा आणि आईचा नाही, तर सध्या भारतातील घरोघरी विचारला जाणारा प्रश्न आहे. अंघोळीनंतर बाळाला पावडर लावणं गरजेचं आहे का? 

बेबी पावडर का लावली जाते?

आपल्या अंगाला जिथे जिथे घडी बसते शक्यतो, त्या त्या ठिकाणीही पावडर लावतो. त्वचा कोरडी राहावी, रॅशेस येऊ नयेत आणि फ्रेश वाटावं यासाठी पावडर वापरली जाते. तुम्हाला जाणवलं असेल, तर आजकाल अंगाला थंडावा वाटण्यासाठीसुद्धा कूलिंग पावडर बाजारात विकली जाते. 

जॉन्सन अँड जॉन्सनचा खटला

जॉन्सन अँड जॉन्सन (J&J) कंपनीविरुद्ध टाल्कम पावडरचा खटला हा मुख्यत्वे पावडरमधील ‘ॲस्बेस्टॉस’ या कर्करोगजन्य खनिजाच्या भेसळीशी संबंधित आहे. टाल्क हे खनिज जमिनीतून काढताना त्यात ‘ॲस्बेस्टॉस’ मिसळल्यामुळे ही पावडर वर्षानुवर्षं वापरणाऱ्या हजारो महिलांना अंडाशयाचा व फुप्फुसाचा कर्करोग झाल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. कंपनीला या धोक्याची पूर्वकल्पना असूनही त्यांनी ही माहिती लपवून ठेवल्याचं उघडकीस आल्यानंतर, न्यायालयानं J&J ला कोट्यवधी डॉलर्सचा दंड ठोठावला. त्यानंतर वाढत्या कायदेशीर त्रासामुळे कंपनीनं जगभरात टाल्क-बेस्ड पावडरची विक्री पूर्णपणे बंद केली आणि त्याऐवजी कॉर्नस्टार्च (मक्याचं पीठ)वर आधारित सुरक्षित पावडरचा पर्याय स्वीकारला.

बेबी पावडर खरोखरच गरजेची आहे का?

जयपूरमधील ‘नारायणा हॉस्पिटल’चे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश पाठक यांच्या मते, लहान बाळाला रोजच्या रोज त्वचेची काळजी घेण्यासाठी बेबी पावडरची अजिबात गरज नसते. तिचा नियमित वापर आरोग्यासाठी धोक्याचा ठरू शकतो. 

गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय न्यायालयात ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीच्या बेबी पावडरबाबत खटल्यांमुळे कर्करोग आणि ॲस्बेस्टॉसच्या दूषिततेची चर्चा जगभरात झाली. मात्र, डॉ. पाठक यांच्या मते, “पालकांनी कर्करोगाच्या भीतीपेक्षा एका अधिक जवळच्या आणि गंभीर धोक्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे; तो म्हणजे पावडरचे कण बाळाच्या श्वासात जाणं.

पावडर वापरण्याचे मुख्य धोके:

लहान मुलांच्या आरोग्यासाठी बेबी पावडरचा वापर का करू नये, याची कारणं खालीलप्रमाणे :

  • श्वासाचा त्रास: जेव्हा आपण बाळाच्या अंगावर पावडर थापतो, तेव्हा तिचे अत्यंत सूक्ष्म कण हवेत तरंगतात. बाळांची फुप्फुसं तेवढी पूर्णपणे विकसित झालेली नसतात. श्वासावाटे हे कण फुप्फुसात गेल्यानं बाळाला खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि काही प्रसंगी गंभीर आजार होऊ शकतात. 
  • त्वचेची छिद्र बुजणं : पावडरमुळे बाळाची नाजूक त्वचा कोरडी होण्याऐवजी घामासोबत मिसळून त्वचेची छिद्रं बुजू शकतात, ज्यामुळे पुरळ वाढण्याचा धोका असतो.

कर्करोग की श्वासोच्छवासाचा त्रास : नेमकी भीती कसली असावी?

अनेकदा पालक कर्करोग आणि श्वासोच्छ्वासाचा त्रास यामध्ये गल्लत करतात. आंतरराष्ट्रीय खटल्यांमध्ये टाल्कम पावडरचा संबंध दीर्घकालीन वापरामुळे होणाऱ्या कर्करोगाशी जोडला गेला होता. मात्र डॉक्टरांच्या मते, “लहान मुलांच्या बाबतीत कर्करोग हा थेट किंवा तत्कालीन विषय नाही, तर हवेत उडणाऱ्या पावडरमुळे त्यांना होणारा श्वसनाचा त्रास हा सर्वांत मोठा आणि तत्काळ उद्भवणारा धोका आहे.

पावडरऐवजी काय वापरावं? 

बाळाची त्वचा मऊ आणि सुरक्षित ठेवण्यासाठी महागड्या किंवा रसायनांनी भरलेल्या पावडरची गरज नाही, केवळ काही सोप्या सवयी गरजेच्या आहेत:

त्वचा व्यवस्थित सुकवणं: अंघोळीनंतर मऊ पंचानं बाळाची त्वचा घासण्याऐवजी हळुवारपणे पुसा. विशेषतः जिथे घाम किंवा ओलावा साचतो; जसं की, मानेच्या घड्या, काखा, मंदीचे सांधे, गुडघ्याचा मागचा भाग. 

लंगोट/डायपर वारंवार बदलणं: बाळाला पुरळांपासून वाचवण्यासाठी वेळेवर लंगोट/डायपर बदल आणि त्वचा थोडा वेळ उघडी ठेवून नैसर्गिकरीत्या वाळू द्या.

बॅरियर क्रीमचा वापर: लंगोट/डायपर पुरळाची समस्या असल्यास टाल्कम पावडरऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्यानं झिंक ऑक्साईड (Zinc Oxide) असलेली ‘बॅरियर क्रीम’ वापरा. ती त्वचेच्या ओलाव्यापासून प्रभावी रक्षण करते.

तरी, तुम्हाला पावडर वापरायचीच असेल, तर ही काळजी नक्की घ्या:

काही वेळेला आपण सवयीमुळे पावडरचा वापर पूर्णपणे बंद करू शकत नाही. अशा वेळी डॉ. पाठक जो सल्ला देतात, तो खालीलप्रमाणे :

पावडर कधीही थेट बाळाच्या अंगावर किंवा चेहऱ्याजवळ लावू नका. आधी थोडी पावडर स्वतःच्या हातावर, बाळापासून दूर घेऊन चोळा आणि मग ती हळुवार बाळाच्या त्वचेवर लावा. त्यामुळे हवेत पावडर उडण्याचं प्रमाण कमी होतं.

तरीही पावडर अजिबात न वापरणे हाच सर्वांत सुरक्षित मार्ग आहे.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

बाळाच्या त्वचेवर हलका लालसरपणा येणं ही साधारण गोष्ट आहे; पण खाली नमूद केलेली लक्षणं जर दिसत असली, तर तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधावा :

  • त्वचेवरील पुरळ किंवा लालसरपणा दोन-तीन दिवसांनी कमी झाला नाही, तर डॉक्टरांना दाखवावं.
  • त्वचा सुजलेली, दुखत असली, किंवा त्यातून द्रव (ऊझिंग) येत असेल तर… 
  • पुरळसोबत बाळाला ताप चढला, तर डॉक्टरांना तातडीने गाठा.
  • घरगुती काळजी घेऊनही त्वचा वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

पिढ्यान् पिढ्या चालत आलेली सवय बाळासाठी योग्यच असेल, असं नाही. पूर्वीच्या काळात उपलब्ध पर्यायानुसार पावडरचा वापर केला जात होता. पण, आज वैद्यकीय विज्ञानानं अधिक सुरक्षित मार्ग दाखवले आहेत. बाळाची नाजूक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पावडरची डबी बाजूला ठेवून, स्वच्छता, कोरडेपणा व योग्य काळजी या त्रिसूत्रीचा अवलंब करणं हाच बाळाच्या आरोग्यासाठी सर्वांत उत्तम मार्ग आहे.