भगवान मंडलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुढीपाडव्याच्या निमीत्ताने नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेले डोंबिवलीकर स्वागतयात्रेच्या मार्गात राजकीय नेत्यांनी उभारलेले फलक आणि रस्ते वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या कमानींमुळे गेले काही दिवस हैराण दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री रविंद्र चव्हाण या तिघा नेत्यांची छबी असलेले फलक डोंबिवलीच्या कानाकोपऱ्यात लागल्याचे पहायला मिळाले. अशा प्रकारे फलक उभारुन सोहळे साजरे करण्याची डोंबिवलीतील राजकीय नेत्यांची ही काही पहिली वेळ नाही. या शहरातील सण, उत्सवांना नेहमीच एक पारंपरिक बाज राहिला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ठाणे-डोंबिवलीसारख्या शहरांकडे पाहिले जाते, याचे कारणही येथील शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केल्या जाणाऱ्या उत्सवांच्या मुळाशी आहे. गेल्या काही वर्षात मात्र येथील चढाओढीच्या राजकारणामुळे या उत्सवांना राजकीय धसमुसळेपणाचे गालबोट लागले आहे. आले उत्सव की उभारा फलक, मिळाला निधी की बांधा कमानी असे प्रकार आता या शहरात नित्याचे होऊ लागले आहेत. यामुळे डोंबिवलीचे डोंबिवलीपण हरवत चालले आहे का, असा सवाल येथील सुजाण नागरिक दबक्या सुरात विचारू लागले आहेत.

डोंबिवलीचा इतिहास काय आहे?

उल्हास नदी काठचे शेती-खाजण जमिनी आणि मासेमारी हा व्यवसाय असलेल्या लोकांचे गाव म्हणजे पूर्वीचे डोंबोली. नंतर या शब्दाचा विस्तार होऊन डोंबिवली नाव पुढे आले. शंभर वर्षांचा इतिहास या गावाला आहे. आगरी समाजाचा त्यावेळी आणि आताही या भागात पगडा आहे. गांधी हत्येनंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्रातून एक मोठा वर्ग गाव खेड्यातून शहरी भागात आला. यामधील बहुतांशी वर्गाने मुंबईजवळचे परवडणाऱ्या घरांचे गाव म्हणून डोंबिवलीला पसंती दिली. शिक्षण, नोकरीत पुढे असलेल्या या गावातील सुशिक्षित मंडळींनी स्थानिकांना हाताशी धरून गावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत, नगरपरिषद, प्रशासक काळ असा प्रवास करत डोंबिवली शहराचे व्यवस्थापन आता महापालिकेच्या हाती आहे.

या शहराची सामाजिक, राजकीय परिस्थिती कशी होती?

स्थानिक आगरी समाज आणि विविध भाग, प्रांतामधून नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने डोंबिवलीत आलेला वर्ग असा समाज शहरात होता. शिक्षण, नोकरीमुळे आपल्या गावचा विकास करू, या भागातील मुलांना शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, गावचे गावपण जपले पाहिजे, लोकांना नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत, या विचारांतून शहरातील सुशिक्षित, स्थानिक मंडळी एकत्र येऊ लागली. यातूनच येथील राजकीय अंकुर फुलू लागले. स्वातंत्र्यानंतर ग्रामपंचायत, १९७० नंतर नगरपरिषद प्रशासन डोंबिवलीत आले. गावचा सर्वांगीण विकास हा उद्देश समोर ठेऊन एका व्यासपीठावर गावकी एकत्र येऊ लागली. खेड्यातून होरपळून आलेला सुशिक्षित वर्ग हिंदू विचारातून जनसंघ या पक्षीय झेंड्याखाली संघटित झाला. निष्ठा, चौकटीत काम करणारा सरळमार्गी वर्ग म्हणून जनसंघ कार्यकर्त्याची भूमिका असल्याने जनसंघाची डोंबिवली अशी ओळख या शहरावर कायम राहिली. संघ कार्यकर्त्यांची मोठी फळी या शहरात उभी राहिली.

डोंबिवलीची वाताहत नेमकी कशी झाली?

५० वर्षांपूर्वी नगरपरिषदेने बुलडोझर खरेदी केला होता. नंतर महापालिकेचा कारभार सुरू झाला. जनसंघातील निष्ठावान मंडळी हळूहळू मागे पडत गेली. ‘दाम करी काम’ महापालिका युग अस्तित्वात आले. तेथून डोंबिवली, कल्याण शहरांच्या उतरंडीला सुरुवात झाली. अनेक मार्गाने हे शहर ओरबडले जाऊ लागले. बेकायदा बांधकामांचा भस्मासुर याच काळात डोंबिवलीत उभा राहीला. या व्यवस्थेवर पोसली जाणारी राजकीय व्यवस्था येथे उभी राहीली. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारखे खासदार लाभलेल्या डोंबिवलीतील राजकीय वातावरण पुढे मात्र उतरंडीला लागले आणि तेथेच या शहराची वाताहत सुरू झाली.

डोंबिवलीचे भवितव्य काय आहे?

डोंबिवली शहर हे जनसंघ, संघ आणि भाजपचा वर्षानुवर्षे बालेकिल्ला राहिला आहे. येथील परंपरागत मतदारांच्या जोरावर भाजप उभा करेल तो उमेदवार याठिकाणी निवडून येत राहीला. जगन्नाथ पाटील, हरिश्चंद्र पाटील यांच्यानंतर आता रवींद्र चव्हाण शहराचे नेतृत्व करत आहेत. ज्या धडाक्याने विकास कामे या शहरात या तीन नेत्यांच्या काळात होणे आवश्यक होते, ती झालेली नाहीत हे मात्र वास्तव आहे. उत्सवप्रियता, प्रतिमापूजनात हरखून गेलेला डोंबिवलीकर फडके रोडवरील कार्यक्रमात नेहमीच दंग राहतो हे येथील नेत्यांनीदेखील हेरले आहे. अशाच उत्सवांमध्ये हा नागरिक दंग कसा राहील याची पद्धतशीरपणे मांडणी हे राजकीय नेते करू लागले आहेत. रस्ते, स्वच्छता, नियोजनाच्या आघाडीवर हे शहर पूर्णपणे फसले असतानाही हे असे का याचा जाब येथील राजकीय व्यवस्थेला मतदानाच्या माध्यमातून फारसा विचारला गेलेलाच नाही. त्यामुळे ठराविक विचारधारेचा आग्रह धरला की आपले काम फत्ते अशाच पद्धतीने येथील राजकारण चालत आले आहे.

डोंबिवलीत वर्चस्वाची लढाई का सुरू आहे?

मागील १८ वर्षांपासून डोंबिवलीवर रवींद्र चव्हाण यांचे वर्चस्व आहे. चव्हाण, भाजप आणि संघ यांच्या मेहनतीमधून आतापर्यंत शिवसेनेचा खासदार कल्याण लोकसभेतून निवडून गेला आहे. मागील तीन वर्षांपासून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, मनसेचे आमदार प्रमोद पाटील, डोंबिवलीकर चव्हाण यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. डोंबिवलीतील कोणताही कार्यक्रम या संघर्षाचे चित्र दाखवत राहतो. याच संघर्षाचे प्रतिबिंब यंदा स्वागतयात्रेच्या वाटेवर दिसू लागले आहे. स्वागतयात्रेच्या वाटेवर अन्यथा जागोजागी फलक, कमानींची गरजच काय असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is dombivli losing its cultural face due to the politics of competition print exp scj
First published on: 23-03-2023 at 10:03 IST