World Environment Day : आज ५० वा जागतिक पर्यावरण दिन आहे. या वर्षीची थीम #BeatPlasticPollution आहे. पर्यावरणदिनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी खरगपूर यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, भारतातील ४९६ प्रमुख शहरांपैकी मुंबई हे प्लास्टिक प्रदूषणाचा सर्वात अधिक गंभीर धोका असलेले शहर ठरले आहे. याच अनुषंगाने मुंबई प्लास्टिकमय का होत आहे, हे जाणून घेणे उचित ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील प्रदूषणाबाबत संशोधन अहवाल काय सांगतात…

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. केवळ भारतात नव्हे तर जगाच्या नकाशावर मुंबईला महत्त्वाचे स्थान आहे. परंतु, सगळीकडे ‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ असे नारे सुरू असताना मुंबईच्या प्रदूषणाबाबत येणारे अहवाल सकारात्मक नाहीत. २०२२ मध्ये एल्सेव्हियर जर्नल रिसोर्सेस, कन्झर्व्हेशन ॲण्ड रीसायकलिंग या जर्नलमध्ये ‘रिस्क ऑफ प्लास्टिक लॉसेस टू दि एन्व्हायर्नमेंट फ्रॉम इंडियन लॅण्डफिल्स’ हा अहवाल सादर झालेला होता. या अहवालात भारतातील प्रमुख शहरांचे प्लास्टिक प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये मुंबई येथे असणाऱ्या डम्पिंग ग्राऊंडचा स्थळ आणि कार्यपद्धतीच्या दृष्टीने अभ्यास केला तर मुंबई हे सर्वात धोकादायक शहर आहे, असे निष्पन्न होते, असे हा अहवाल सांगतो. तसेच आयआयटी खरगपूर येथील संशोधकांनी सादर केलेल्या अहवालातसुद्धा भारतातील प्रमुख ४९६ शहरांमध्ये मुंबई हे प्लास्टिक प्रदूषणाचा सर्वात अधिक धोका असलेले शहर आहे, असे नमूद केले आहे. प्लास्टिकचा जास्त धोका असण्याचे एक कारण मुंबईतील डम्पिंग ग्राऊंड्स असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. वारा, पाऊस, पूर यामुळेही कचऱ्याची गळती होऊन, कचरा वाहून जाऊन प्रदूषणाचा धोका वाढत आहे, असे हा अहवाल सांगतो.

हेही वाचा : विश्लेषण : छ. शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे इंग्लंडला कशी गेली ? काय आहे या शस्त्रांचा इतिहास…

मुंबईतील डम्पिंग ग्राऊंड्स कशी ठरतात प्रदूषणाचे कारण!

देवनार, कांजूरमार्ग आणि मुलुंड येथे असणारी प्रमुख डम्पिंग ग्राऊंड्स ही समुद्राच्या अगदी जवळ आहेत. या डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा, प्लास्टिक विविध मार्गांनी वातावरणात आणि समुद्रात प्रवेश करत असते. वारा, पाऊस, पूर, भटके प्राणी, मानवाचा हस्तक्षेप यामुळे प्लास्टिक आणि कचरा वातावरणात प्रवेशित होतो. डम्पिंग ग्राऊंड किंवा लॅण्डफिल्स, कचरा साठवणुकीची ठिकाणे पाणथळ जागांच्या जवळ असतील तर कचरा पसरण्याचे काम अधिक जास्त होते. वाऱ्याने उडून जाणारा कचरा हा सहज पाण्यातून वाहून जातो. यामुळे कचऱ्याचे वहन होतेच, तसेच पाण्याचे प्रदूषणही होते. किनारपट्टीजवळील शहरांमध्ये उष्णतेचे आणि वाऱ्याचे प्रमाण अधिक असते. अधिक उष्णतेने आग लागणे, अधिकच्या वाऱ्याने कचरा पसरणे, हे धोके या शहरांना असतात. यामध्ये मुंबईचा क्रमांक प्रथम आहे.
मुंबई हे शहर लोकसंख्येच्या बाबतीत अधिक आहे. येथील लोक मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक वापरतात. ‘कोविड-१९’च्या काळात ‘एकवापर’ प्रणालीमुळे प्लास्टिकचा वापर अधिक वाढला. वापराच्या तुलनेत कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाले नाही. पर्यायाने प्रदूषणात वाढ झाले. भारतात दररोज साधारण २५ दक्षलक्ष पीपीई किट्स, जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये १०१ टन प्लास्टिक आणि साधारण १४.५ टीपीडी प्लास्टिक कचरा निर्माण होतो.

हेही वाचा : विश्लेषण : श्वेतक्रांतीची कल्पना युरोपची की भारताची ? मिल्क पावडरला कारण ठरली श्वेतक्रांती ?

मुंबईतील प्लास्टिकचा वापर

डिसेंबर २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेने सादर केलेल्या माहितीनुसार जानेवारी ते डिसेंबर २०२१ मध्ये ४६ लाख, ९८ हजार, १६४ किलो केवळ प्लास्टिकच्या बाटल्या मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत सापडल्या होत्या. जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये यात वाढ झाली असून, ५८ लाख ९८ हजार ११४ किलो प्लास्टिक बाटल्या सापडल्या. तसेच ‘वापरा आणि फेकून द्या’ प्रणालीतील कचरा हा अधिक आहे. कोरोना काळात यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. जेवणाच्या प्लास्टिकच्या डीश, थाळ्या, ग्लास, चमचे, पिशव्या, वाट्या, कंटेनर, स्ट्रॉ, कप यामध्ये समावेश आहे. २०२१ मध्ये अशा प्रकारचा ६८ लाख, ८२ हजार, ६८९ किलो कचरा आढळला. २०२२ मध्ये त्याचे प्रमाण काहीसे कमी झालेले आहे. २०२२ मध्ये ६७ लाख, १२ हजार, ५५७ किलो प्लास्टिक कचरा आढळला आहे. २०२२ च्या उत्तरार्धात महानगरपालिकेने २ हजार, ९०६ किलो प्लास्टिक जप्त केले होते.

मुंबईसमोरील प्लास्टिक नियंत्रणाचे आव्हान!

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये प्लास्टिकबंदीचे धोरण राबवले गेले. काही प्रमाणात ते यशस्वीही झाले. परंतु, लोकसंख्येच्या तुलनेत प्लास्टिकवर नियंत्रण आणणे अवघड होत आहे. आजही मुंबईतील प्लास्टिकचा दररोजचा वापर साधारण ९ हजार टन एवढा आहे. अनेक लोक प्लास्टिक बॅग्ज एकदा वापरून टाकतात, यामध्ये पुनर्वापर करता येऊ शकणाऱ्या प्लास्टिक बॅग्जचाही समावेश आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, सॅनिटरी पॅड्स, डायपर यांच्यामुळे निर्माण होणारा कचरा हा एकूण कचऱ्याच्या ६ टक्के आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अनेक भागांमध्ये लोक सॅनिटरी पॅड्स आणि डायपर गटारांमध्ये तसेच शौचालयांमध्ये टाकत असल्याचे आढळून येते. यामुळे पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढते. आयआयटी खरगपूरने सादर केलेल्या अहवालानुसार मुंबईतील डम्पिंग ग्राऊंड्स समुद्राजवळ असणे हे अत्यंत धोक्याचे आहे. या कचऱ्याचा मानवी जीवनावर तसेच, सागरी जीवांवर धोकादायक परिणाम होत आहे.

प्लास्टिकचे लवकर विघटन होत नाही. तसेच ते जाळणेही वातावरणाच्या दृष्टीने हानीकारक आहे. नद्यांमध्ये, समुद्रात फेकणेही हानीकारक आहे. त्यामुळे प्लास्टिकचा अत्यावश्यक कारणासाठीच वापर करणे योग्य ठरेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is mumbai becoming plastic why is mumbai getting stuck in plastic is mumbai becoming plastic why is mumbai getting stuck in plastic vvk
First published on: 05-06-2023 at 12:20 IST