Oman Iran US Conflict: जगाला होणाऱ्या एकूण पुरवठ्यापैकी २० ते २५ टक्के इंधन व नैसर्गिक वायू होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे पोहोचवला जातो. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून इंधन व एलएनजी वाहतूक करणाऱ्या तेलवाहू जहाजांना रोखून धरले आहे. त्यामुळे आशियातील देशांमध्ये इंधनाचा तुटवडा व किंमती वाढल्या आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीबाबत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमध्ये ओमानही सहभागी आहे, असे इराणकडून सांगण्यात आले. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओमानला हल्ल्याच्या धमक्या दिल्या. तेलवाहू जहाजांना किती टोल आकारायचा हे ठरवण्यात ओमानही सहभागी होता, असे इराणने सांगितले. दरम्यान ओमान हा देश पाकिस्तानप्रमाणेच इराण व अमेरिका या दोघांचाही विश्वासू देश आहे. जगात कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्यात व टंचाई निर्माण होण्यात ओमानचा हात आहे का? याबाबत जाणून घेऊयात.
होर्मुझ सामुद्रधुनीत नेमके काय घडले?
आखाती देशांत उत्पादन केले जाणारे कच्चे तेल हे पर्शियन गल्फमधून पुढे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे जगभरातील देशांमध्ये पोहोचवले जाते. होर्मुझ सामुद्रधुनी ही ओमान व इराण या दोन देशांमध्ये आहे. हा अत्यंत निमुळता आणि कमी रूंदी असलेला सागरी मार्ग आहे. याच मार्गाद्वारे जगातील २० ते २५ टक्के कच्चे तेल व इंधनाची वाहतूक जहाजांमार्फत केली जाते. त्यामुळे जगासाठी होर्मुझ सामुद्रधुनी अत्यंत संवेदनशील आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत होणाऱ्या घटनांचे पडसाद थेट आंतरराष्ट्रीय बाजारात उमटतात.
ऊर्जा निर्यात करणारे देश, इन्शुरन्स कंपन्या, जहाज वाहतूक करणाऱ्या कंपन्या यांचे होर्मुझ सामुद्रधुनीवर बारीक लक्ष असते. त्याचे कारण म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनीत घडणाऱ्या घटनांचे आर्थिक परिणाम तात्काळ समोर येतात. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलने इराणवर हवाई हल्ला करत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना ठार केले. त्यानंतर इराणच्या सशस्त्र दलाने (IRGC) होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांची वाहतूक रोखली. एकवेळ होर्मुझ सामुद्रधुनीत तब्बल १५५० हून अधिक तेलवाहू जहाज अडकून पडल्या होत्या. जहाजांना धोका वाढल्याने जहाजांच्या इन्शुरन्सची रक्कम तब्बल सहापट वाढली होती.
होर्मुझ सामुद्रधुनीमुळे आशियातील देशांच्या अर्थव्यवस्थांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. यात चीन, भारत, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांचा समावेश आहे.
ओमानची भौगोलिक परिस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनी
होर्मुझ सामुद्रधुनीची रूंदी सर्वात निमुळत्या ठिकाणी ३९ किमी आहे. प्रत्यक्षात मोठ्या तेलवाहू जहाजांना ये-जा करण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनीच्या या भागात फारच कमी जागा मिळते. जहाजांची धडक होऊ नये म्हणून साधारण तीन किमीच्या दोन लेन पाडण्यात आल्या आहेत. त्या लेनमधून जहाज ये-जा करतात.
होर्मुझ सामुद्रधुनीच्या उत्तरेकडील भागात इराणची किनारपट्टी आहे. या किनारपट्टीलगत पाण्याची खोली खूपच कमी आहे. तसेच हा भाग खडकाळ आहे. याशिवाय या भागात इराणने लष्करी पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. त्यामुळे इराणच्या किनारपट्टीजवळून जाणे भौगोलिकदृष्ट्या तेलवाहू जहाजांना धोकादायक ठरते. त्यांना ओमानच्या किनारपट्टीजवळील भागातून जावे लागते. होर्मुझ सामुद्रधुनीलगतच ओमानचा मुसंदम हा प्रांत आहे. मुसंदम प्रांत भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे वाहतूक करण्यासाठी जहाजांना ओमानलगत असलेल्या सागरी भागाचा वापर करावा लागतो. ओमानच्या मदतीशिवाय होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाज बाहेर पडून अरबी समुद्रात प्रवेश करू शकत नाहीत.
होर्मुझ सामुद्रधुनीत टोल आकारण्याने कोणता वाद?
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांना टोल आकारण्यास सुरूवात केली आहे. टोल किती आकारायचा याबाबत झालेल्या चर्चेत ओमान सहभागी होता, असे इराणने म्हटले आहे. इराणने ५ मे रोजी पर्शियन गल्फ स्ट्रेट ऑथोरिटीची स्थापना केली. या ऑथोरिटीमार्फत इराण जहाजांवर नियंत्रण व देखरेख ठेवणार आहे. जहाजांना टोलही आकारणार आहे. कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलसाठी इराण प्रत्येकी एक डॉलर टोल आकारत आहे. जहाजांना ईमेलद्वारे जहाजाची संपूर्ण माहिती इराणच्या सशस्त्र दलाला (IRGC) द्यावी लागते. त्यानंतर तपासणी करून इराण जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करण्याची परवानगी देतो. होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांना मुक्तपणे जाऊ द्यावे, अशी मागणी अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंग्डम या देशांनी इराणकडे वारंवार केली आहे.
अमेरिकेने ओमानला काय इशारा दिला?
युद्ध सुरू होण्यापूर्वी होर्मुझ सामुद्रधुनी जशी खुली होती, तशी तात्काळ खुली करावी, असे इराणला सांगण्यात आल्याचे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिले. काही अहवालांनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीचे व्यवस्थापन इराण व ओमान दोघे मिळून करत आहेत. या अहवालांमुळे ओमानची भूमिका तटस्थ नाही, असे समोर आले. होर्मुझ सामुद्रधुनीवर फक्त एकाच देशाचे नियंत्रण असल्याची शक्यता ट्रम्प यांनी बुधवारी फेटाळली. ते म्हणाले, “होर्मुझ सामुद्रधुनीवर कोणीच नियंत्रण मिळवू शकत नाही. तो आंतरराष्ट्रीय मार्ग आहे. इतर देश जसे वागतायेत तसेच ओमानला वागावे लागेल. अन्यथा आम्हाला ओमानवर हल्ले करावे लागतील. त्याच्यावर निर्बंध लादावे जातील.”, असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे कोषागार सचिव स्कॉट बेझेंट यांनीही इशारा दिला की, होर्मुझ सामुद्रधुनीवर उभारलेली कोणत्याही प्रकारची टोलिंग सिस्टिम सहन केली जाणार नाही. होर्मुझ सामुद्रधुनीवर टोल आकारणाऱ्यांवर किंवा तसा विचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यांच्यावर दंड आकारला जाईल, असे बेझेंट म्हणाले. त्यांनी ओमानचा उल्लेख करत हा इशारा दिला.
अमेरिकेच्या दबावाला ओमानने कसा प्रतिसाद दिला?
ओमानने आतापर्यंत इराणने घेतलेल्या कुठल्याच निर्णयाला उघडपणे संमती दिली नाही. ओमानने इराणच्या हालचालींवर शांतता बाळगली आहे. काही अहवालांतून आलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीत टोल व्यवस्था उभारण्यात ओमानचा काहीही हात नाही, हे सांगण्यासाठी ओमानचे अधिकारी अमेरिकेत गेले आहेत. इराणबरोबर लागेबांधे नाहीत हे सांगण्यावर ओमानकडून भर दिला जातोय. इराणबरोबर मिळून काम केल्यास अमेरिका आपल्यावरही आर्थिक निर्बंध लादेल अशी भीती ओमानला आहे.
ओमान सध्या इराण व अमेरिकेत समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही देशांशी ओमान संबंध दृढ करतोय. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले, होर्मुझ सामुद्रधुनी ही ओमान व इराणच्या सागरी प्रदेशात स्थित आहे. ती आंतरराष्ट्रीय नाही. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनासाठी ओमानबरोबर मिळून काम केले जात आहे, असे अराघची म्हणाले होते. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील घडामोडींमध्ये ओमानही सहभागी असल्याचा संशय अमेरिका व इतर देशांना आहे. मात्र, ओमानने या परिस्थितीत अत्यंत सावध भूमिका घेतली आहे.
