Is Coughing a Sign of Heart Attack? खोकला हा फुफ्फुसे आणि घसा स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणारी एक नैसर्गिक क्रिया आहे. मात्र, त्याचे काम इतक्यावरच मर्यादित नाही तर काही वेळेस तो एखाद्या गंभीर समस्येचा संकेतही असू शकतो. एका संशोधनानुसार, खोकला दीर्घकाळ सतत होत राहिल्यास, त्याचा थेट संबंध हृदयाच्या आरोग्याशी असू शकतो हे अलीकडेच उघड झाले आहे. वेळीच लक्ष दिले नाही, तर असा सततचा खोकला पुढे जाऊन हृदयविकारास कारणीभूत ठरू शकतो. या लेखामध्ये खोकला आणि हृदयाशी संबंधित आजार यांच्यातील संबंधाचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे. तसेच ‘कार्डियाक कफ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खोकल्याची लक्षणे आणि पुरुष व महिलांमध्ये हृदयरोगाची सुरुवातीची चिन्हे याविषयी जाणून घेऊ.
कार्डियाक कफ म्हणजे काय?
खोकला हा शरीराचा एक नैसर्गिक संरक्षणात्मक उपाय आहे. तो फुफ्फुसांमधील कफ, धूळ आणि इतर हानिकारक घटक बाहेर टाकण्यास मदत करतो. फुफ्फुसांतील संवेदनशील रिसेप्टर्सना धूर, धूळ किंवा कफ यांसारखा त्रासदायक घटक आढळला की, ते मेंदूला संदेश पाठवतात. हा संदेश मिळताच मेंदू खोकल्याची क्रिया सुरू करतो, त्यामुळे हे त्रासदायक घटक बाहेर फेकले जातात आणि श्वसनमार्ग स्वच्छ राहतो.
खोकताना छाती आणि डायाफ्रामचे स्नायू आकुंचन पावतात, जेणेकरून शरीराला त्रास देणारा घटक बाहेर काढता येतो. मात्र, कार्डियाक कफच्या बाबतीत परिस्थिती वेगळी असते. इथे शरीराची प्रतिक्रिया फुफ्फुसांमध्ये पाणी साचण्यामध्ये (पल्मनरी एडिमा) होते. ही अवस्था प्रामुख्याने हृदयाच्या स्नायूंमध्ये बिघाड झाल्यावर उद्भवते. या स्थितीत फुफ्फुसांमध्ये द्रव साचतो आणि तो बाहेर काढण्याचा प्रयत्न शरीर खोकल्याच्या माध्यमातून करत असतं.
कार्डियाक कफची लक्षणे
सामान्य खोकला आणि कार्डियाक कफ यामध्ये फरक ओळखणे अनेकदा कठीण जाते. विशेषतः ज्यांना आधीच श्वसनाचे आजार किंवा अॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी हे अधिकच कठीण ठरते. तरीही काही ठराविक लक्षणे अशी आहेत, जी दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्यक असते.
- रात्री खोकला वाढणे:
रात्री झोपताना खोकला अधिक तीव्र होणे आणि त्यामुळे झोप न लागणे. - गुलाबी किंवा पांढरा कफ:
फेसाळलेला, पांढरा किंवा रक्तमिश्रित कफ येणे हे हृदयविकाराचे संकेत असू शकतात. - शारीरिक हालचालींमुळे खोकला:
व्यायाम करताना किंवा शारीरिक श्रम केल्यावर खोकला सुरू होणे किंवा वाढणे म्हणजे हृदयावर जास्त ताण येत असल्याचे लक्षण असू शकते. - जड श्वास आणि घरघर:
खोकल्यासोबत श्वास घेण्यास त्रास होणे किंवा घरघर जाणवणे हे धोक्याचे संकेत असू शकतात. - कोरडा खोकला:
खोकल्याची सवय नसताना देखील दीर्घकाळ टिकणारा कोरडा खोकला.
पुरुषांमधील हृदयरोगाची सुरुवातीची चिन्हे
हृदयरोगामुळे पुरुषांमध्ये इतर कोणत्याही आजारापेक्षा अधिक मृत्यू होतात. त्यामुळे कोणती लक्षणे ओळखायची, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही सुरुवातीची चिन्हे वेळेवर ओळखल्यास आजार अधिक गंभीर होण्यापासून रोखता येऊ शकतो किंवा किमान त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची संधी मिळू शकते.
पुरुषांमध्ये हृदयाच्या समस्यांकडे इशारा करणारी काही सुरुवातीची लक्षणे
- छातीत अस्वस्थता:
छातीत दडपण, जडपणा किंवा घट्टपणा जाणवणे. - श्वास घेण्यास त्रास:
हा त्रास व्यायामानंतर जसा दम लागतो तसा नसून, अगदी दैनंदिन कामे करतानाही श्वास कमी पडत असल्याची भावना येणे. - अत्याधिक थकवा:
नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणे किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना वारंवार अशक्तपणा जाणवणे, हे हृदयविकाराकडे नेणारे संकेत असू शकतात. - हृदयाचे ठोके अनियमित होणे:
हृदय धडधडणे, ठोके चुकल्यासारखे वाटणे किंवा अनियमित ठोके जाणवणे म्हणजे हृदयाशी संबंधित समस्या असण्याची शक्यता असते. - पसरत जाणारी वेदना:
छातीतून सुरू होणारी वेदना किंवा अस्वस्थता पाठ, हात, मान, जबडा किंवा दातांपर्यंत पसरू शकते.
महिलांमधील हृदयाच्या समस्यांची लक्षणे
- पूर्वी पुरुष आणि महिलांमधील हृदयविकाराची लक्षणे एकाच प्रकारात मोजली जात होती. मात्र, आता हे स्पष्ट झाले आहे की महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे अनेकदा पुरुषांपेक्षा वेगळी असू शकतात.
- दुर्दैवाने, या लक्षणांपैकी अनेक लक्षणं सुरुवातीला अगदी किरकोळ वाटू शकतात आणि त्यांचे खरे गांभीर्य लवकर लक्षातही येत नाही. म्हणूनच सुरुवातीपासूनच सतर्क राहणे आणि शरीरातील बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
महिलांमध्ये आढळणारी हृदयविकाराची काही नेहमीची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- श्वास घेण्यास त्रास:
चालताना, हालचाल करताना किंवा अगदी बसून असतानाही श्वास घेण्यास अडचण येणे किंवा दम लागल्यासारखे वाटणे. - सूज येणे:
पल्मनरी एडिमामुळे पोट, मनगट, पाय किंवा पायांच्या घोट्यांमध्ये सूज येऊ शकते. - सतत खोकला:
वर उल्लेख केल्याप्रमाणे, खोकला किंवा घरघर दीर्घकाळ थांबत नसेल किंवा कार्डियाक कफची लक्षणे दिसत असतील, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. - मळमळ किंवा उलटी:
या समस्यांमुळे भूक न लागणे, मळमळ किंवा उलटी होणे अशी लक्षणेही जाणवू शकतात. - वेदना:
महिलांमध्ये अनेकदा छातीत वेदना होण्याऐवजी जबडा, मान, घसा, पाठ किंवा पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवतात. दुर्दैवाने, अशा वेदनांची व्याप्ती मोठी असल्यामुळे त्या इतर आजारांशी संबंधित असल्याचा गैरसमज होऊ शकतो आणि त्यामुळे सुरुवातीला हृदयाशी संबंधित समस्या असल्याचा संशय येत नाही.
