Kamasutra History Richard Burton Myth: कामसूत्र या प्राचीन ग्रंथाला उगाचच बदनाम करण्यात आलं आहे. खुद्द त्याच्या जन्मभूमीतदेखील अश्लीलता पसरवणारा ग्रंथ म्हणूनच त्याकडे पाहिलं जातं. आज आपण लैंगिक स्वातंत्र्याविषयी बोलतो, चर्चा करतो किंवा ते का महत्त्वाचं आहे हे वारंवार अधोरेखित करण्यात येतं. २००० वर्षांपूर्वी याचं विषयावर कामसूत्र या ग्रंथात भाष्य करण्यात आलं होतं, याचा मात्र आपल्याला विसर पडतो. या ग्रंथाकडे केवळ एक अश्लील ग्रंथ म्हणूनच बहुतांश वेळेस पाहिलं जातं. केवळ भारतातचं नाही तर संपूर्ण जगात हा केवळ सेक्स पोझिशन विषयी माहिती देणारा ग्रंथ म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. पण, २००० वर्षांपूर्वी संस्कृतमध्ये लिहिलेल्या ग्रंथात नेमकं काय आहे हे जगाला कळलं कसं आणि तेच खरं आहे का? याचा साधा पुसटसा विचारही आपल्या मनात येत नाही. कामसूत्र बदनाम झालं खरं परंतु नेमकं कोणामुळे हे जाणून घेणही तितकचं महत्त्वाचं आहे.
मूळ कामसूत्र काय सांगतं?
वात्स्यायनांच्या मूळ संस्कृत कामसूत्र ग्रंथाची निर्मिती इ.स. दुसर्या-तिसर्या शतकात झाली (संदर्भ: दत्ता कुलकर्णी: संपूर्ण कामसूत्र). सात प्रकरणांचा हा ग्रंथ केवळ लैंगिक संबंधांवर केंद्रित नाही. या ग्रंथातील फक्त दुसरं प्रकरण मानवी समागमाशी संबंधित आहे. उर्वरित भागात सामाजिक नातेसंबंध, विवाह, स्त्री-पुरुष संवाद, शिष्टाचार, नैतिकता आणि जीवनदृष्टी यांवर चर्चा करण्यात आलेली आहे. एकूणच कामसूत्र हा ग्रंथ जीवनशास्त्राविषयी (art of living) आहे.
मग बदनामी सुरू कुठून झाली?
जगभरात कामसूत्र हा ग्रंथ म्हणजे लैंगिक खाजगी आनंदाचं पुस्तक अशीच ओळख आहे. परंतु, ही ओळख मूळ ग्रंथाची नाही, तर या ग्रंथाच्या पहिल्या इंग्रजी अनुवादाची आहे. या ग्रंथाचा पहिला अनुवाद १८८३ साली करण्यात आला होता.
हिंदू कामशास्त्र सोसायटी?
१८ व्या-१९ व्या शतकात ब्रिटनमध्ये लैंगिकतेविषयी सार्वजनिक चर्चा करणं हा देखील गुन्हा मानला जात होता. अशा परिस्थितीतही वाराणसीतील ‘हिंदू कामशास्त्र सोसायटी’ नावाच्या संस्थेने प्रसिद्ध केलला कामसूत्राचा अनुवाद ब्रिटनच्या वाचकांपर्यंत पोहोचला आणि जगाला प्रथमच लैंगिकतेवर भाष्य करणार्या प्राचीन ग्रंथाची ओळख झाली.
केवळ काल्पनिक संस्था
त्याकाळी ब्रिटनमधील वाचकांना ‘हिंदू कामशास्त्र सोसायटी’ नावाची संस्था प्रत्यक्षात अस्तित्त्वात नाही याची कल्पनाही नव्हती. दूर भारतात असलेल्या काही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कल्पनाशक्तीतूनच तिचा जन्म झाला होता. सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन या ब्रिटिश अधिकार्याने कामसूत्राचा पहिल्यांदा अनुवाद केला. त्यात अनेक त्रुटी असल्या तरीही कामसूत्र पश्चिमेतील नामांकित ग्रंथालयांमध्ये पोहोचत असतानाच, त्याचा खरा अनुवादक कोण होता, ही बाब या काल्पनिक संस्थेच्या आड अनेक वर्षे गूढच राहिली.

ब्रिटनमधील अश्लीलताविषयक कठोर कायदे
सर रिचर्ड फ्रान्सिस बर्टन यांनी या ग्रंथावर स्वतःची ओळख अनुवादक म्हणून उघडपणे नमूद करण्याबाबत भीती बाळगण्यामागे अनेक कारणे होती. त्या काळातील ब्रिटिश अश्लीलता-विषयक कायदे अत्यंत कठोर होते. लैंगिकतेचा अगदी अस्पष्ट उल्लेख जरी छापून आला, तरी लेखकाला थेट तुरुंगवास भोगावा लागू शकत होता. त्यामुळे पुढे जाऊन जागतिक बेस्टसेलर ठरणाऱ्या या पुस्तकावर आपले नाव छापणे हे त्यांच्यासाठी मोठा धोका पत्करणे होते.
शास्त्रीय संदर्भ अप्रासंगिक?
त्या काळात लागू असलेला Obscene Publications Act 1857 आणि Hicklin Test यांमुळे एखाद्या पुस्तकातील एखादा परिच्छेद सुद्धा नैतिकदृष्ट्या घातक ठरू शकत होता. त्याकाळी ग्रंथाचा शास्त्रीय किंवा ऐतिहासिक संदर्भ अप्रासंगिक मानला जात होता. अशा वातावरणात कामसूत्र प्रकाशित करणं म्हणजे कायदेशीर आत्मघात होता. Sir Richard Francis Burton यांनी स्वतःचं नाव लपवलं आणि Hindu Kama Shastra Society नावाची काल्पनिक संस्था उभी केली. कारण उघडपणे नाव छापलं असतं, तर तुरुंगवास, सामाजिक बहिष्कार, कारकीर्दीचा अंत हे सगळं अटळ होतं.
दांभिकता टाळण्यासाठी संस्कृतचा वापर
त्यामुळेच त्या काळात कामसूत्र प्रकाशित करण्यासाठी व्हिक्टोरियन काळातील नैतिक दांभिकतेला चकवा देणारी कल्पक शक्कल लढवावी लागली. उदाहरणार्थ, इंग्रजी अनुवादात स्त्री जननेंद्रियासाठी ‘योनी’ हा संस्कृत शब्द वापरण्यात आला. तो शब्द वात्स्यायनांनी मूळ संस्कृत ग्रंथात प्रत्यक्षात वापरलाच नव्हता, तरीही अशा भाषिक युक्त्यांमुळे अनुवादाला तुलनेने सुरक्षित स्वरूप देता आले. (संशोधक वेंडी डोनिगर यांच्या मते, वात्स्यायनांच्या मूळ संस्कृत कामसूत्रमध्ये yoni हा शब्द स्त्री जननेंद्रियासाठी अजिबात वापरलेला नाही आणि lingam हाही फार क्वचित येतो; त्याऐवजी इतर, अनेकदा अधिक तटस्थ शब्द वापरलेले आहेत-Doniger, Wendy, “On the Kamasutra,” Daedalus, American Academy of Arts and Sciences.)

प्रेम आणि लैंगिकता
Sir Richard Francis Burton यांचा हा धाडसी डाव अखेर यशस्वी ठरला. कालांतराने, या बनावट ‘कामशास्त्र सोसायटी’च्या अनुवादाने “इंग्रजी भाषेतील सर्वाधिक चोरून छापल्या गेलेल्या पुस्तकांपैकी एक” अशी ओळख कामसूत्राला मिळाली. प्रेम आणि मानवी लैंगिकतेशी संबंधित सर्व विषयांवरचा सर्वात जुना आणि प्रमुख शास्त्रीय ग्रंथ म्हणून तो जगभर नोंदवला जाऊ लागला. हे सगळं खरं असलं तरी हा अनुवाद शतकांपूर्वीच्या वात्स्यायनांच्या नैतिक दृष्टीकोनाशी पूर्णतः प्रामाणिक नव्हता.
लैंगिकतेबाबत ब्रिटनमधील नकारात्मक दृष्टिकोन
कामसूत्र म्हणजे केवळ शयनगृहातील कसरतींची यादी आहे, अशी सैलसर धारणा निर्माण होण्यामागेही हाच अनुवाद मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरला. त्यावेळच्या व्हिक्टोरियन समाजात लैंगिकतेभोवतीच्या विषयांकडे नकारात्मकतेने पाहिले जात असल्यामुळे, या ग्रंथातील सर्वाधिक रंगतदार भागांना स्वतःचीच एक वेगळी गती मिळाली. निषिद्धतेची भावना अधिकच चाळवणारी ठरली आणि त्या ग्रंथाविषयी एक खोडकर, कुतूहलपूर्ण ओढ निर्माण झाली.
निषिद्धतेचं आकर्षण
व्हिक्टोरियन समाजात जे जितकं निषिद्ध, ते तितकंच आकर्षक ठरलं. कामसूत्रावर अश्लील असा शिक्का बसताच;
- ते चोरून छापलं जाणारं पुस्तक ठरलं.
- ग्रंथालयांमध्ये कुजबुजत वाचलं जाऊ लागलं.
- ‘Forbidden Oriental Sex Book’ अशी त्याची ओळख तयार झाली.
- या प्रतिमेत शास्त्र, तत्त्वज्ञान आणि सामाजिक विवेक हरवून गेला.
व्हिक्टोरियन समाजाच्या ‘लैंगिक मुक्तते’साठी कटिबद्ध असलेले सर रिचर्ड यांनी या ग्रंथातील इतर घटकांना दुय्यम ठरवत लैंगिक पैलूंनाच अधिक ठळकपणे मांडले. तरीही, अशा हस्तक्षेपांनंतर आणि अतिरंजित मांडणीनंतरसुद्धा, १८८३ मधील त्या पहिल्याच सुमारे १७५ पानांच्या अनुवादात ते या विषयासाठी फक्त ४० पानेच देऊ शकले.
कामसूत्र बदनाम झालं कारण…
- ते व्हिक्टोरियन नैतिकतेच्या फिल्टरमधून जगासमोर आलं.
- कायदेशीर भीतीमुळे त्याचा अर्धवट आणि विकृत परिचय झाला.
- निषिद्धतेने त्याला लोकप्रिय केलं, परंतु, मूळ संदर्भ हरवून गेला.
म्हणूनच, कामसूत्राकडे केवळ लैंगिक पुस्तक म्हणून न पाहता, त्या काळातील प्रगल्भ भारतीय समाजव्यवस्थेचा आणि मानवी नातेसंबंधांचा आरसा म्हणून पाहणे गरजेचे आहे.
