Supreme Court Same-Sex Marriage Judgement आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासंदर्भात निकाल दिला आहे. अशा स्वरूपाच्या विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास केंद्र सरकारचा विरोध होता. या संदर्भात न्यायालयात झालेला युक्तिवाद आणि येऊ घातलेला निवाडा याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले होते. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सलग १० दिवस सुनावणी घेऊन या संदर्भातील याचिकांवरील निर्णय ११ मे रोजी राखून ठेवला होता. आज सकाळीच यासंदर्भातल्या निकालाचं वाचन न्यायालयाने केलं. निकालाच्या शेवटी न्यायालयाने ३ विरुद्ध २ मतांनी समलिंगी विवाहांना मान्यतेची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. समलिंगी नातेसंबंधावर अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून भाष्य केले जाते. कधी बाजूने, तर कधी विरोधात अधिकारवाणीने मतप्रदर्शन केले जाते. पाश्चिमात्य देशांकडून हे फॅड भारतात आले आणि भारतात अशा स्वरूपाचे प्रकार कधी नव्हतेच असेही सांगितले जाते. प्राचीन काळातील पुढारलेला आणि समृद्ध भारत खरंच समलिंगी संबंधांच्या संकल्पनेपासून अनभिज्ञ होता का, हे पाहणे आवश्यक ठरते. त्यानिमित्ताने मध्ययुगीन भारताचा या संदर्भातील इतिहास जाणून घेणे,महत्त्वाचे ठरावे. प्राचीन भारत व त्रोटक माहिती प्राचीन भारताचा विचार करता आपल्याकडे लिखित पुराव्यांच्या अभावी फारच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. बहुतांश वेळा प्राचीन भारताचा कुठल्याही प्रकारचा इतिहास समजावून घेताना पुरातत्त्वीय पुराव्यांवर अवलंबून राहावे लागते.किंबहुना राजकीय इतिहासासाठी आपण परकीय देशातील साहित्याचाही वापर करतो. त्यामुळे प्राचीन भारतात समलिंगींची नेमकी स्थिति काय होती हे शोधणे म्हणजे अंधारात सुई शोधण्याइतके कठीण आहे. त्यामुळेच भारताच्या इतिहासात समलिंगी समूहाचा इतिहास दर्शविताना मध्ययुगीन काळाचा संदर्भ दिला जातो. आणखी वाचा: विश्लेषण: स्वस्तिक: मांगल्य ते रक्तरंजित इतिहास व्हाया अॅडॉल्फ हिटलर बाबराचे समलिंगी आकर्षण भारताचा मध्ययुगीन इतिहास हा प्रामुख्याने मुघलांच्या कारकीर्दीचा इतिहास आहे. त्यामुळे मुघल साहित्यात समलिंगी समूहाविषयी कोणत्या प्रकारचे संदर्भ आले आहेत,ते पाहणे गरजेचे ठरते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हा उभयालिंगी असल्याचे अभ्यासक मानतात.बाबर याने स्वतः बाजारातील एका तरुण मुलाविषयी वाटणाऱ्या आकर्षणाविषयी नमूद केले आहे. त्यामुळे मुघलांच्या काळात अशा प्रकारच्या संबंधांवर काही बंधने नव्हती,असे लक्षात येते.अशा प्रकारच्या नात्याविषयी कुठल्याही प्रकारची लाज किंवा भीती बाबर याला वाटत असावी असे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही.अशी बंधने अस्तित्त्वात असती तर बाबराने स्वतः आपल्या 'बाबरनामा'मध्ये असा संदर्भ नमूद केला नसता. किंबहुना बाबर याला आवडणारा तो मुलगा अवघ्या १७ वर्षांचा होता. बाजारातील या मुलाचे नाव बाबूरी असे होते. बाबर हा बाबूरी मुलाच्या वेड्यासारखा प्रेमात होता. त्याच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचे तो लालित्यपूर्ण वर्णन करतो. ऐतिहासिक दस्ताऐवजानुसार मुघल सैनिक उद्ध्वस्त केलेल्या भागातील स्त्रिया व लहान मुलगे बाबरच्या हरामात आणत असत. बाबरनाम्यातील संदर्भ: (बाबर स्वतः लिहितो.. ) “त्या निवांत दिवसांत मला स्वतःमध्ये एक विचित्र प्रवृत्ती दिसली…..कॅम्प-बाजारमधील एका मुलासाठी मी वेडा झालो आणि त्रस्त झालो, त्याचं नाव बाबुरी. तोपर्यंत माझा कोणाकडेही कल नव्हता, खरं प्रेम आणि इच्छा, एकतर ऐकून किंवा अनुभवाने मिळतात, मी त्याबद्दल ऐकले नाही, किंवा मी कधी बोललो नाही. बाबुरी वेळोवेळी माझ्या भेटीला येत असे,पण नम्रतेने मी त्याच्याकडे कधीच सरळ पाहू शकत नाही; मग मी संभाषण (इख्तिल्ड) आणि वाचन (हिक्द्यात) कसे करू शकेन? माझ्या आनंदात आणि आक्रोशात मी त्यांचे आभार मानू शकलो नाही (आल्याबद्दल); मला त्याची निंदा करणे कसे शक्य झाले? स्वत:च्या सेवेचे कर्तव्य बजावण्याची माझ्यात कोणती शक्ती होती?एके दिवशी, त्या इच्छा आणि उत्कटतेच्या काळात मी सोबत्यांसोबत एका गल्लीत जात असताना अचानक त्याला समोरासमोर भेटलो, तेव्हा माझी अशी गोंधळाची स्थिती झाली की मी जवळजवळ निघूनच गेलो. त्याच्याकडे सरळ पाहणे किंवा शब्द एकत्र करणे अशक्य होते. शंभर यातना आणि लाज घेऊन मी पुढे निघालो. (संदर्भ: बाबरनामा, खंड १, पृष्ठ १२०)“त्या इच्छा आणि उत्कटतेच्या भरात आणि तरुणपणाच्या मूर्खपणाच्या तणावाखाली, मी अनवाणी पायाने, रस्त्यावर, गल्ली, फळबागा आणि द्राक्षबागेत भटकायचो. मी कोणालाही सभ्यता दाखवली नाही , ना मित्राला, ना अनोळखी माणसाला, मी माझी किंवा इतरांची काळजी घेतली नाही. कधी कधी वेड्यांसारखा मी एकटाच टेकडीवर आणि मैदानावर भटकायचो; कधी कधी मी बागेत आणि उपनगरात, गल्लीबोळात जायचो. माझी भटकंती माझ्या आवडीची नव्हती, जायचं की राहायचं हे मी ठरवलं नाही. (संदर्भ: बाबरनामा, खंड १, पृ. १२१) आणखी वाचा: विश्लेषण: Camille Claudel: एका फ्रेंच (श)सकुंतलेची कहाणी नेमकी आहे तरी काय? सरमद दूसरा महत्त्वाचा संदर्भ औरंगजेबाच्या काळातील आहे. सरमद हा दारा शुकोहचा ज्यू साथीदार होता. तो भारतात स्थलांतरित झाला होता. अनेक अभ्यासक त्याने मुस्लिम धर्म स्वीकारल्याचा दावा करतात; तर काही तो नास्तिक असल्याचे सांगतात. परंतु त्याचे दारा शोकोहोचा निकटवर्तीय होता. तो एका हिंदू मुलाच्या प्रेमात पडला होता. त्या मुलासाठी आपल्याकडील सर्व संपत्ती देवून नग्न फकीर म्हणून तो फिरत होता. त्याचा संदर्भ हा स्वतः त्याने ‘तख्त या ताबूत’आपल्या दस्ताऐवजात दिला आहे. परंतु, देवाचे अस्तित्त्व नाकारल्यामुळे १६६० साली औरंगजेबाने त्याला देहदंडाची शिक्षा केली. यात कुठेही औरंगजेबाने तो समलिंगी म्हणून शिक्षा केलेली नाही. याचाच अर्थ मुघलांसाठी समलिंगी हा प्रकार नवीन नव्हता. जहाराना बेगम जहाराना बेगम ही शहाजहाँ याची कन्या होती. तिला गुलाम स्त्रिया आवडत असल्याचे संदर्भ सापडतात. एका नृत्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस एका गुलाम मुलीला वाचविण्याच्या प्रक्रियेत हिने स्वतःला भाजून घेतले होते. तिची जखम भरून येण्यासाठी बराच काळ गेला होता. ज्या मुलीला तिने वाचविले त्या मुलीवर तिचा विशेष जीव होता. त्यामुळे मुघल साम्राज्यात समलिंगी संबंध सहज अस्तित्त्वात असावेत, असे दस्तऐवजांतून लक्षात येते. मुघल साम्राज्यातील तृतीयपंथीय किंबहुना त्यांच्या राज्यकारभारात तृतीयपंथीयांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. ब्रिटीशांना या तृतीयपंथीयांमुळे राज्यकारभात हस्तक्षेप कठीण झाल्याने त्यांनी अनैसर्गिक संबंधांवर आळा घालणार कायदा आणला होता. आजही भारतीय दंड संहितेत लागू असणारे कलम ३७७ हे ब्रिटिश अधिकारी थॉमस बॅबिग्टंन मॅकोले याच्या पुढाकाराने संमत करण्यात आलेले कलम आहे. या कायद्याअंतर्गत जन्मठेप किंवा दहा वर्षांची शिक्षा अधिक रुपये दहा हजार दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली होती. हा आजामीनपात्र गुन्हा होता. याच कायद्याची परिणीती म्हणून त्यावेळी तब्बल ३० हजार तृतीयपंथीयांना ठार करण्यात आल्याचा संदर्भही इतिहासामध्ये येतो. एकूणच मध्ययुगीन भारत समलिंगी या संकल्पनेपासून अनभिज्ञ असावा, असे दिसत नाही.