चीनच्या सिचुआन प्रांतामध्ये अण्वस्त्र तयार करणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये २०१९ पासून मोठी वाढ करीत आहे. उपग्रहीय छायाचित्रांच्या आधारे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने हे वृत्त दिले आहे. याबरोबरच २०२० मध्ये चीनने अण्वस्त्रचाचणी केल्याचा दावाही अमेरिकेने केला आहे. चीनने अमेरिकेचे आरोप फेटाळून लावले असले, तरी अण्वस्त्रस्पर्धेत चीनही मागे नाही, हे चीनकडील अण्वस्त्रांची अधिकृत आकडेवारीच सांगत आहे.

चीनची वाढती अण्वस्त्रशक्ती

जागतिक पटलावर अण्वस्त्रस्पर्धेचे ढग पुन्हा दाटू लागले आहेत. युद्ध टळावे आणि महासंहारक शस्त्राची जरब सर्वांवर बसावी यासाठी तयार करण्यात आलेल्या शक्तिशाली अण्वस्त्रांच्याच निर्मितीची स्पर्धा शीतयुद्धकाळानंतर पुन्हा एकदा होऊ घातली आहे. साऱ्या पृथ्वीला अनेकदा नष्ट करू शकतील, अशी महासंहारक अस्त्रे सध्या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. शीतयुद्धकाळात सामरिक शस्त्रमर्यादा करार (सॉल्ट), सामरिक शस्त्रकपात करार (स्टार्ट) केले गेले. अण्वस्त्रसंख्या आटोक्यात राहावी, यासाठीचे अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत संघ यांच्यातील हे करार होते. २०१० मध्ये अमेरिका आणि रशियामध्ये पुन्हा असा करार केला गेला. ‘न्यू स्टार्ट’ या नावाने तो ओळखला जातो. सुरुवातीला १० वर्षांसाठी करार करण्यात आला. २०२१ मध्ये पाच वर्षांसाठी कराराची मुदत वाढविण्यात आली. या कराराची मुदत नुकतीच, ५ फेब्रुवारी २०२६ मध्ये संपली आहे. कराराचे नूतनीकरण करण्याचा रशियाचा प्रस्ताव अमेरिकेने फेटाळला. नवा करार करायचा असल्यास चीनही त्यामध्ये हवा, अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे. जागतिक व्यवस्थेतील चीनचे महत्त्व यामुळे अधिकच अधोरेखित झाले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात चीन नैर्ऋत्येकडील सिचुआन प्रांतात अण्वस्त्रक्षमता वाढवीत असल्याचे म्हटले आहे. उपग्रहीय छायाचित्रेही वृत्तात दिली आहेत.

सिचुआन प्रांतात मोठ्या प्रमाणावर बंकर्स

सिचुआन प्रांतात झिटोंग खोऱ्यात चीन मोठ्या प्रमाणावर बंकर्स उभारत आहे. येथे ज्या प्रकारचे बांधकाम होत आहे, त्यावरून या ठिकाणी अतिशय घातक पदार्थांची हाताळणी होत असल्याची शक्यता आहे. याखेरीज पिंगटोंग खोऱ्यात चीन अण्वस्त्रांसाठी आवश्यक असलेले ‘प्लुटोनियम-पॅक्ड कोअर्स’ तयार करत आहे. येथील मुख्य इमारतीवर ३६० फूट उंच व्हेंटिलेशन स्टॅक आहे. अलिकडच्या वर्षांत येथे नवीन व्हेंट्स आणि ‘हीट डिस्पर्सर्स’ (उष्णता बाहेर टाकणारी यंत्रणा) बसवून त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. येथील अण्वस्त्र प्रकल्पांच्या प्रवेशद्वारावर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे एक ब्रीदवाक्य मोठ्या अक्षरांमध्ये कोरलेले आहे. ही अक्षरे उपग्रहीय छायाचित्रांतूनही स्पष्टपणे टिपली गेली आहेत. ‘आपल्या मूळ ध्येयाशी एकनिष्ठ राहा आणि आपले कर्तव्य नेहमी लक्षात ठेवा.’ असे हे वाक्य आहे. अमेरिका आणि सोव्हिएत संघाच्या हल्ल्यापासून बचावासाठी ही ठिकाणे सिचुआन प्रांतात सहा दशकांपूर्वी माओ यांच्या काळात निवडली गेली होती. गेल्या काही वर्षांत चीनने येथे बांधकामांचा विस्तार आणि सुविधा अद्ययावत केल्या आहेत. हा विस्तार २०१९ पासून होत असल्याचे वृत्तात म्हटले आहे. चीनकडे ६०० हून अधिक अण्वस्त्रे असून, २०३० पर्यंत १००० अण्वस्त्रांचा साठा चीनकडे असेल, असेही या वृत्तात पेंटागॉनच्या हवाल्याने म्हटले आहे.

कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे?

अण्वस्त्रमर्यादेपासून अण्वस्त्रविस्तार

‘सिप्री’च्या २०२५च्या अहवालानुसार, जगामध्ये जानेवारी २०२५ पर्यंत ९ देशांकडे १२,२४१ अण्वस्त्रे आहेत. जागतिक आण्विक क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि विस्तार होत आहे. त्यातील ९६१४ अण्वस्त्रे युद्धसज्ज अवस्थेत आहेत. चीनकडील अण्वस्त्रांची संख्या वाढत असली, तरी आजच्या घडीला अमेरिका आणि रशियाकडे जगभरातील एकूण अण्वस्त्रांपैकी ९० टक्के अण्वस्त्रे आहेत. अमेरिका आणि रशियानंतर मात्र चीनचा क्रमांक लागतो. त्यानंतर फ्रान्स, ब्रिटन, भारत, पाकिस्तान यांचा क्रमांक लागतो. इस्रायल, उत्तर कोरिया यांच्याकडेही अण्वस्त्रे असल्याचे मानले जाते. चीनकडील अण्वस्त्रांची संख्या ६००च्या घरात असून, २०३० पर्यंत १००० अण्वस्त्रे होतील, अशी शक्यता आहे. भारताकडे १८०च्या घरात अण्वस्त्रे असून, पाकिस्तानकडे १७० अण्वस्त्रे आहेत. अमेरिका आणि रशिया यांच्यातील अण्वस्त्र नियंत्रण करार संपल्यामुळे अण्वस्त्रस्पर्धा पुन्हा सुरू होण्याची भीती आहे.

चीन, रशियाच्या अणुचाचण्या?

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने नुकतेच नवीन पुरावे सादर केले आहेत. त्यांच्या मते, २२ जून २०२० रोजी चीनच्या लोप नूर या चाचणी केंद्रावर २.७५ रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. हा नैसर्गिक भूकंप नसून एक ‘गुप्त अण्वस्त्र स्फोट’ होता, असा अमेरिकेचा दावा आहे. सर्वसमावेशक अण्वस्त्रचाचणीबंदी करारावर चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांनी सह्या केल्या आहेत. पण, देशांतर्गत पातळीवर या कराराला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे या कराराशी दोन्ही देश बांधील नाहीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी चीन आणि रशिया दोन्ही देश अण्वस्त्रचाचण्या करीत असताना अमेरिकाही पुन्हा चाचण्या सुरू करील, असे विधान केले होते. चीनच्या २०२० मधील चाचणीबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे शस्त्रनियंत्रण आणि प्रसारबंदी विभागाचे सहायक मंत्री ख्रिस्तोफर यॉ यांनी विधान केले आहे. तसेच, अमेरिकाही आता अण्वस्त्रचाचणी करील, असे वक्तव्य केले. चीनने अमेरिकेचा दावा पूर्ण फेटाळून लावला आहे. दरम्यान रशियानेही अमेरिकेचा दावा फेटाळून लावताना चीन व रशियाने कुठल्याही प्रकारे गोपनीय अण्वस्त्रचाचण्या केलेल्या नाहीत, असे म्हटले आहे.

नवी अण्वस्त्रस्पर्धा

सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या भू-राजकीय स्थितीमध्ये आणि बहुध्रुवीय जगामध्ये आव्हानेही मोठी आहेत. अण्वस्त्रांचे महासंहारक संकट जागतिक आहे. राष्ट्रांच्या सीमांची मर्यादा या ठिकाणी कितपत लागू करावी, हा चर्चेचा विषय होईल. मात्र, जागतिक सत्तास्पर्धेत वर्चस्ववादाच्या लढाईत कोण मोठे, यासाठी चाललेल्या रस्सीखेचीत तणावामध्ये मोठी वाढ होत आहे. या अण्वस्त्रस्पर्धेत चीननेही खरेच उडी घेतली आहे, की अमेरिकेला चाचणीसाठी कारण मिळावे, यासाठी आरोपांचा खेळ सुरू आहे, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, नव्या अण्वस्त्रमर्यादासारख्या करारांमध्ये रशियाबरोबरच चीनचाही समावेश हवा, अशी अमेरिकेने व्यक्त केलेली इच्छा चीनचा वाढता वर्चस्ववाद अधोरेखित करते, हे नक्की ! भारतासमोरील आव्हानही त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

prasad.kulkarni@expressindia.com