गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल व इराण यांच्यात संघर्ष सुरू आहे. दोन्ही देशांतील परिस्थिती आता चिघळली आहे. इस्रायलकडून इराणवर हवाई हल्ले सुरू आहेत, तसेच इराणकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. सध्या दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. आतापर्यंत इराणमध्ये ६०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि १,३०० हून अधिक जखमी झाले आहेत. इराणनेही शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला केला असून, तेल अवीव, हैफा आणि रेहोवोट या इस्रायली शहरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा असल्याचं जाहीर करत इराणला इशारा दिला आहे, त्यामुळे या युद्धात अमेरिका हस्तक्षेप करू शकतो, अशी शक्यता आहे. दोन देशांतील या युद्धात अमेरिका सहभागी होऊ शकते का? डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका काय? अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा नक्की काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊयात..

डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका काय?

  • अमेरिका या युद्धात सहभागी होणार की नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही.
  • डोनाल्ड ट्रम्प इस्रायल-इराण संघर्षावर सातत्याने उलटसुलट बोलताना दिसत आहेत.
  • अमेरिका येत्या काही दिवसांत तेहरानवर हल्ल्या करण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे.
  • अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी इराणवरील हल्ल्याच्या योजनांना मान्यता दिली आहे, परंतु इराण आपला अणुकार्यक्रम सोडण्यास तयार आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी अद्याप अंतिम आदेश दिला नाही, असे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिले.
  • गुरुवारी (१९ जून) सकाळी, इस्रायल संरक्षण दलाने सांगितले की, त्यांनी सध्या तेहरान आणि इराणच्या इतर भागात हल्ले सुरू ठेवले आहे.
  • इस्रायलने पश्चिम इराणच्या अरक आणि खोंडाबमधील रहिवाशांना स्थलांतराचा इशारा सुद्धा दिला आहे. त्यांनी म्हटले की, या भागात राहिल्यास तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.”

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

इस्रायल आणि इराणमध्ये लष्करी शत्रुत्व सुरू झाल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळी विधाने करताना दिसले आहेत. या हल्ल्याच्या पहिल्या दिवशी (१३ जून), त्यांनी सांगितले की, इराणकडे अमेरिकेशी त्यांच्या अणुकार्यक्रमावर करार करण्याची दुसरी संधी आहे. “पुढील हल्ले आणखी क्रूर असल्याने, हा विनाश थांबवण्यासाठी अजूनही वेळ आहे,” असे ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले. परंतु, १६ जून रोजी, कॅनडामध्ये झालेल्या जी-७ शिखर परिषदेत ट्रम्प यांनी आश्वासन दिले की, इराणला करार करायचा आहे आणि मी येथून निघताच त्याबाबत काहीतरी करेन, असे ते म्हणाले.

इस्रायल आणि इराणमध्ये लष्करी शत्रुत्व सुरू झाल्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगवेगळी विधाने करताना दिसले आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

त्याच्या एका दिवसानंतर ट्रम्प यांची भूमिका लगेचच बदलली. “आता मी करार करण्याच्या मूडमध्ये नाही,” असे ते म्हणाले. त्यानंतर त्याच दिवशी त्यांनी इराणच्या आत्मसमर्पणाची मागणी केली आणि सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या विरोधात धमकी दिली. बुधवारी ते म्हणाले, “मी काय करू शकतो आणि काय नाही, हे कोणालाही माहीत नाही.” ते म्हणाले, “इराण संकटात आहे आणि ते वाटाघाटी करू शकतात. इराणचे भवितव्य ठरवण्यासाठी पुढील आठवडा खूप मोठा असणार आहे”.

ट्रम्प पुढे म्हणाले की, इराण करार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यांना व्हाईट हाऊसमध्ये यायचे आहे, मी ते करू शकतो. परंतु, त्यांनी असेही म्हटले की, आता चर्चेला खूप उशीर झाला आहे. एका आठवड्यापूर्वीच्या परिस्थितीत खूप फरक होता.” परंतु, इराणने अमेरिकेत आपले अधिकारी पाठवण्याची ऑफर नाकारली आहे. “कोणत्याही इराणी अधिकाऱ्याने कधीही व्हाईट हाऊसबरोबर बोलण्याची विनंती केलेली नाही,” असे इराणने स्पष्ट केले आहे.

अमेरिका सहभागी होणार? तज्ज्ञांचे मत काय?

पश्चिम आशियात घडणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून असणाऱ्या तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ट्रम्प इराणवरील हल्ल्यात सामील होण्यास तयार आहेत आणि हे दर्शविणारी अनेक चिन्हे आहेत. ट्रम्प यांचे संदेश युद्धात सामील होण्याची त्यांची तयारी दर्शवतात. त्यांनी सिच्युएशन रूममध्ये त्यांच्या सल्लागारांबरोबर एक बैठकही घेतली. या बैठकीत त्यांनी अमेरिकेच्या पर्यायांवर चर्चा केली आहे. गुरुवारी सिच्युएशन रूमध्ये ते आणखी एक बैठक घेणार असल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे, जेरुसलेममधील अमेरिकन दूतावासानेही घोषणा केली की, बुधवार ते शुक्रवार हे दूतावास बंद राहील. सध्याच्या सुरक्षा परिस्थिती आणि इस्रायल व इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे, अमेरिकन दूतावासाने सर्व अमेरिकन सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत त्यांच्या निवासस्थानांमध्ये आणि त्यांच्या जवळ असणाऱ्या सुरक्षित ठिकाणावर आश्रय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यासह अमेरिका आपली लष्करी मालमत्ता पश्चिम आशियाकडे वळवत असल्याचे चित्र आहे. एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या मते, या प्रदेशात अंदाजे ४०,००० अमेरिकन सैन्य आहे आणि अमेरिकेतील तळांवरून किमान ३० अमेरिकन लष्करी विमाने युरोपमध्ये हलवली जात आहेत. तसेच, यूएसएस निमित्झ विमानवाहू जहाज दक्षिण चीन समुद्रातून पश्चिम आशियाकडे अनेक क्षेपणास्त्र विनाशकांसह येत आहे. इतर युद्धनौका ओमानच्या आखात आणि पर्शियन आखातात तैनात आहेत. अमेरिकेने इस्रायलला इराणी क्षेपणास्त्रे पाडण्यास आधीच मदत केली आहे. ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अमेरिकेने एफ-१६, एफ-२२ आणि एफ-३५ लढाऊ विमानेदेखील मध्य पूर्वेत असणाऱ्या तळांच्या दिशेने पाठवली आहेत.

इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेच्या हस्तक्षेपाचा परिणाम काय?

ट्रम्प इस्रायलला पाठिंबा देण्याचा आणि इराणवर हल्ला करण्याचा निर्णय त्यांच्या काही समर्थकांना अमेरिकेसाठी योग्य वाटत नाही. त्यांच्या प्रशासनातील काहींचे असे सांगणे आहे की, या संघर्षात अमेरिकेने प्रवेश केल्यास हा संघर्ष आणखी लांबेल. इराणनेही अमेरिकेला थेट संघर्षात सहभागी होण्याचा इशारा दिला आहे. उपपरराष्ट्र मंत्री माजिद तख्त-रावांची यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, “जर अमेरिकेने लष्करीदृष्ट्या सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तर जिथे जिथे लक्ष्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे तिथे प्रत्युत्तर म्हणून हल्ला करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. कारण आम्ही स्वसंरक्षणार्थ काम करत करू.”

वॉशिंग्टन डीसी येथील क्विन्सी इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी उपाध्यक्षा त्रिता पारसी यांनी ‘सीएनएन’ला सांगितले की, “अमेरिकेने कोणताही हल्ला केल्यास इराणकडून या प्रदेशातील अमेरिकन तळांवर हल्ला होईल आणि अमेरिका व इराणमध्ये युद्ध होईल.” त्यांनी पुढे म्हटले, इराण अमेरिकेशी फारकाळ लढू शकणार नसला तरी, अमेरिकेसाठीही हे सोपे युद्ध नसेल. राजनैतिक आणि सुरक्षा विषयातील अध्यक्ष रायन क्रॉकर यांनी म्हटले की, इस्रायल-इराण संघर्षात अमेरिकेच्या सहभागामुळे इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीला रोखू शकतो, अरब आखातातील ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले करू शकतो किंवा या प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी आणि राजनैतिक ठिकाणांवर हल्ले करू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेलबर्न विद्यापीठातील फेलो आणि राज्यशास्त्राच्या व्याख्यात्या डॉक्टर दारा कॉन्ड्युट यांनीही अशीच भीती व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, इस्रायल आणि इराणमधील संघर्षात अमेरिकेचा सहभाग चांगली बातमी नाही. त्यांनी ‘बीबीसी’ला सांगितले. “त्यामुळे इराण माघार घेणार नाही,” असे त्या म्हणाल्या. इकॉनॉमिस्ट/युगोव्ह पोलमध्ये असे दिसून आले आहे की, २०२४ च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत त्यांना पाठिंबा देणाऱ्या ५३ टक्के मतदारांना असे वाटते की, देशाने इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये सामील होऊ नये. इस्रायल-इराण संघर्षाबाबत ट्रम्प यांचे पुढील पाऊल काय असेल हे अद्याप अस्पष्ट आहे.