भारताच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानमध्ये सध्या कमालाची शांतता आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या देशात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजधानी इस्लामाबादमधील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या असून शाळा, महाविद्यालयांना तातडीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पोलिसांसह लष्कराचा मोठा फौजफाटा तैनात असल्याने तेथील लोकांना पुन्हा एकदा करोना महामारीची आठवण झाली आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमधील या स्मशान शांततेचे नेमके कारण काय? त्याविषयीचा हा आढावा…
इस्लामाबादमधील शुकशुकाट नेमका कशामुळे?
पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तापत्राने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबाद शहरात सध्या लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहे. मात्र, त्यामागे कोणत्याही विषाणूचे कारण नसून अमेरिका आणि इराण यांच्यात होणारी ऐतिहासिक शांतता चर्चा आहे. या दोन्ही देशांमधील वाटाघाटींमुळेच इस्लामाबादला एका मोठ्या व्यासपीठाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण शहराला लष्करासह पोलिसांनी वेढा घातला आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका मजूर वर्गाला बसत आहे. काम बंद पडल्याने अनेक कामगारांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील या दीर्घकाळ चालणाऱ्या वाटाघाटी आणि शहरात लादण्यात आलेली टाळेबंदी, यामुळे सामान्य पाकिस्तानी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
इस्लामाबादमध्ये लॉकडाऊनचा विळखा कायम
अमेरिका-इराण यांच्यातील शांतता चर्चा पुढे ढकलण्यात आल्यानंतरही पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. इराणच्या प्रतिनिधींनी बैठकीला अनुपस्थित राहण्याचे संकेत दिल्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी पाकिस्तानचा नियोजित दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तरीदेखील पाकिस्तानी सरकारने शहरात लादलेली टाळेबंदी अद्याप मागे घेतलेली नाही. विदेशी शिष्टमंडळांची ये-जा सुलभ व्हावी आणि अमेरिकन मालवाहू विमानांतून येणारी साधनसामग्री पोहोचवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य महामार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या चर्चेच्या पहिल्या फेरीदरम्यान जे निर्बंध लादले गेले होते, ते चर्चा फिस्कटल्यानंतरही अद्याप कायम आहेत.
आणखी वाचा : भारताच्या दिशेने येणारे जहाज इराणने का जप्त केले? होर्मुझ सामुद्रधुनीत नेमके काय घडले?
चर्चा लांबणीवर पडल्याने नागरिक हवालदिल
‘डॉन’च्या वृत्तानुसार, राजधानीत कामासाठी आलेल्या कामगारांना या निर्बंधांचा मोठा फटका बसला आहे. त्यातच सरकारी आदेशाचे कारण देत शनिवार, १८ एप्रिल रोजी इस्लामाबाद आणि रावळपिंडीतील लॉजमधून अनेक कामगारांना अचानक बाहेर काढण्यात आले आहे, त्यामुळे हातावर पोट असलेल्या या वर्गासमोर राहण्याचा आणि रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या शांतता चर्चेसाठी शहर ओलीस धरले गेले, ती चर्चा अद्याप यशस्वी झालेली नाही. मात्र, दिवसागणिक या लॉकडाऊनचा कालावधी वाढतच चालला आहे. आपल्या उदरनिर्वाहावर गदा आल्याने, हा निर्बंधांचा जाच नेमका किती दिवस सहन करावा लागणार? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत.
टाळेबंदीमुळे पाकिस्तानी जनतेचा संताप
अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये लादण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे सामान्य नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. आम्ही जणू पिंजऱ्यात जगत आहोत, अशा शब्दांत स्थानिक रहिवाशांनी आपली व्यथा मांडली आहे. इस्लामाबादमधील सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या अरीज अख्तर यांनी द गार्डियनला सांगितले की, इस्लामाबादसाठी शनिवारचा दिवस अत्यंत गोंधळाचा होता. माझे गाव इथून तीन तासांच्या अंतरावर असल्याने मी सुदैवी आहे, पण दूरच्या शहरांतून आलेल्या अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्या पुढे म्हणाल्या की, आमच्यासारख्या अनेकांना स्वतंत्र फ्लॅट भाड्याने घेणे परवडत नाही, म्हणून आम्ही हॉस्टेलमध्ये राहत आहोत, पण तिथूनही बाहेर काढले गेल्याने आता आमच्यावर रस्त्यांवर झोपण्याची वेळ आली आहे. दुसरा एक कर्मचारी झैनाब अली उस्मानखैल यांनी सांगितले की, सध्या इस्लामाबादमधील प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे पर्यायी मार्गाने जाणाऱ्या वाहतुकीचे भाडे प्रचंड वाढले असून वाहनचालकांकडून आर्थिक लूट केली जात आहे.
पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटात
आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानमध्ये या टाळेबंदीचा सर्वाधिक फटका लहान व्यावसायिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना बसला आहे. भाजीविक्रेते मोहम्मद अहसान एएफपी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, बाजारपेठेत ग्राहकच नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारच्या एका दिवसाच्या लॉकडाऊनमुळे आम्हाला किती त्रास सहन करावा लागतो याची त्यांना कल्पनाही नाही. गेल्या सहा दिवसांपासून मला कोणतेही काम मिळालेले नाही. लॉकडाऊन म्हणजे काम नाही आणि काम नाही म्हणजे अन्न नाही. मुलाबाळांचे पोट भरण्यासाठी आम्हाला कामाची आवश्यकता आहे, पण या सरकारला गरिबांची काहीच पर्वा नाही. यादरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या परिस्थितीचे वर्णन करताना सांगितले की, अमेरिका आणि इराणच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असताना संपूर्ण देश जणू ठप्प झाला आहे. आम्ही सर्वजण लॉकडाऊनमध्ये आहोत आणि आम्हाला पुन्हा एकदा करोना काळातील भीषण दिवसांची आठवण होत आहे.
हेही वाचा : अमेरिका-इराण युद्धविरामानंतरही भारतातील बहाई समुदाय चिंतेत का आहे? कारण काय?
शांतता चर्चेवर अद्यापही प्रश्नचिन्ह
अमेरिका आणि इराणमधील शांतता चर्चा सध्या एका ऐतिहासिक आणि अत्यंत नाजूक वळणावर येऊन ठेपली आहे. पश्चिम आशियातील हा रक्तरंजित संघर्ष संपवण्यासाठी इराणने अखेर एक ‘एकत्रित प्रस्ताव’ सादर केला आहे. या प्रस्तावानंतर, शुक्रवारी पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात होऊ शकते, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. मात्र, तरीही या चर्चेबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती अमेरिकेने केलेल्या नौदल नाकेबंदीमुळे इराणचा परकीय व्यापार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. सध्या सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये हाच मुद्दा सर्वात कठीण आणि कळीचा ठरत आहे. इराणने आपली व्यापार कोंडी फोडण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे सुरक्षा व्यवस्थेवरून तणाव कायम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाचा कालावधी अनिश्चित काळासाठी वाढवल्याची घोषणा केल्यानंतरही परिस्थिती अद्याप निवळलेली नाही. अहवालानुसार, या घोषणेनंतर अवघ्या काही तासांतच इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणारी दोन जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसह जगभरातील अनेक देशांचे लक्ष आता शुक्रवारच्या प्रस्तावित चर्चेकडे लागले आहे, यातून पश्चिम आशियाला शांततेचा मार्ग सापडणार की संघर्षाची ही धग कायम राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
