Islamabad Mosque Blast Marathi News : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील एका शिया मशिदीत नमाजाच्या वेळी शुक्रवारी आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात जवळपास ५० जणांचा मृत्यू झाला असून १६९ हून अधिक जण जखमी झाले. उझबेकिस्तानचे अध्यक्ष शावकत मिर्झियोयेव यांच्या दोन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान ही घटना घडली. अलीकडच्या वर्षांतील शिया समाजावर झालेल्या हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या स्फोटानंतर समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या चित्रफितीत मशिदीच्या आवारात मृतदेहांचा खच पडलेला दिसून आला. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोलीस व बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू होते. यापार्श्वभूमीवर हा स्फोट कसा आणि कोणी घडवून आणला? स्फोटाबद्दल प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं? त्याविषयीचा हा आढावा…
इस्लामाबादमध्ये स्फोट कसा झाला?
पाकिस्तानच्या डॉन वृत्तपत्राने इस्लाबादमध्ये झालेल्या स्फोटाबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. इस्लामाबादच्या बाहेरील तारलाई परिसरातील खादिजा अल-कुब्रा या शिया मशिदीत शुक्रवारी दुपारच्या सुमारास नमाजपठण केले जात होते. त्यावेळी एका संशयिताने जबरदस्तीने मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण त्याला सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वारावरच रोखले. त्याचवेळी या संशयिताने स्वत:ला आत्मघातकी स्फोटाने उडवून दिल्याचे डॉनच्या वृत्तात नमूद आहे.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?
प्रत्यक्षदर्शींनी बीबीसीला सांगितले की- स्फोटापूर्वी गोळीबाराचा आवाज आला होता. मशिदीत नमाज पठण करत असलेले झहीर अब्बास यांनी सांगितले म्हणाले, “मी नमाज अदा करत होतो, तेव्हा गोळ्यांचा आवाज आला. त्यानंतर आम्ही सजदा केला आणि अचानक मोठा स्फोट झाला. परिस्थिती इतकी भीषण होती की मशिदीबाहेर मृतदेहांचा खच पडलेला होता. सुदैवाने या स्फोटात मला फार गंभीर इजा झाली नाही. काही काळ मला शुद्ध हरपल्यासारखे वाटले आणि बचाव पथकांनी रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला.”
आणखी वाचा : जम्मू-काश्मीरबाबत पाकिस्तानची चिथावणीखोर भाषा; भारतासाठी धोक्याची घंटा? पाकव्याप्त काश्मीरमध्ये काय घडले?
घटनास्थळी मृतदेहांचा खच
मशिदीची देखभाल करणारे सैयद अशफाक यांनीही गोळीबार ऐकू आल्याचे सांगितले. शुक्रवारी नमाजपठणासाठी शिया बांधव मशिदीत आले होते. त्याचवेळी अचानक गोळीबाराचा आवाज सुरू झाला. मी बाहेर येईपर्यंत स्फोट झाला होता आणि सर्वत्र मृतदेह पडले दिसत होते. काहींचे हात तर काहींचे पाय तुटलेले होते. गंभीर जखमींना आम्ही स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात नेले, असे अशफाक यांनी डॉन वृत्तपत्राला सांगितले. या स्फोटात इस्लामाबादचे पोलीस महानिरीक्षक सय्यद अली नासिर रिझवी यांचे चुलत भावाचा मृत्यू झाला असून त्यांचा अन्य एक नातेवाईक जखमी झाल्याचे वृत्त आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने मृतांचा आकडा आणखीनच वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पाकिस्तानमध्ये हाय अलर्ट
इस्लामाबादमधील आत्मघातकी स्फोटानंतर पाकिस्तानमधील अनेक शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सरकारकडून नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्फोटातील जखमींना पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि पॉलिच्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी इस्लामाबादला २५ रुग्णवाहिका पाठवल्या असून रावळपिंडीतील रुग्णालयांनाही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या तीन वर्षांतील इस्लामाबादमधील हा सर्वात भीषण हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानमध्ये कोणाची दहशत?
दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान सध्या त्याच दहशतवादाच्या छायेत सापडला आहे. आधीच बलुचिस्तानातील बंडखोरांनी पाकिस्तान सरकारला जेरीस आणले आहे. त्यातच देशात शरणार्थी असलेल्या दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा कोणीतरी सपाटाच लावला आहे. गेल्या दोन वर्षांत भारतातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांच्या पाकिस्तानात एकपाठोपाठ एक हत्या झाल्या आहेत. २०२५ हे वर्ष पाकिस्तानसाठी गेल्या एका दशकातील सर्वात हिंसक वर्ष ठरले आहे. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये हिंसाचारातील मृत्यूंचे प्रमाण ७४ टक्क्यांनी वाढले आहे.
पाकिस्तानला दहशतवादाचा विळखा
पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीजने दहशतवादी हल्ल्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या हिंसाचारात तीन हजार ४१३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये दोन हजार १३८ जण दहशतवादी असल्याचे सांगितले जात आहे. २०२४ मध्ये बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मृतांचा आकडा एक हजार ९५० होता. विशेष म्हणजे चीन सोडून दुसरा कोणताही देश पाकिस्तानबद्दल सहानुभूती दाखवताना दिसून येत नाही. भारताने आजवर कोणत्याही हिंसक कारवायांचे कधीही समर्थन केलेले नाही. त्याचबरोबर अशा संघटनांना मदतही केलेली नाही; पण स्वत:च्याच नाकर्तेपणामुळे पाकिस्तानात फोफावलेल्या दहशतवादाचे खापर पाकिस्तान भारतावर फोडू पाहत आहे. अर्थातच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानचे सर्व आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा : अमेरिकेतून ३८०० भारतीयांची हकालपट्टी; कोणकोणत्या देशांनी केलं भारतीयांना हद्दपार?
स्फोट कोणी घडवून आणला?
इस्लामाबादमधील शिया मशिदीत झालेल्या भीषण आत्मघातकी स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मघातकी हल्लेखोर हा परदेशी नागरिक असून, त्याचे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी संबंध असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे २४ कोटी असून त्यात बहुसंख्य सुन्नी आहेत. अनेक कट्टर इस्लामी गट शियांना ‘धर्मद्रोही’ मानत असून त्यांच्यावर हल्ले करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. गेल्या आठवड्यातही पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याची घटना घडली होती. बलूच लिबरेशन आर्मीने केलेल्या हल्ल्यांमध्ये डझनभर नागरिक व सुरक्षा कर्मचारी ठार झाले होता. प्रत्युत्तरात पाकिस्ताने लष्कराने केलेल्या कारवाईत २०० हून अधिक बलूच बंडखोर मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता.
पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी इस्लामाबादमध्ये झालेल्या आत्मघातकी स्फोटाचा तीव्र निषेध केला. देशात अराजकता आणि अस्थिरता पसरवू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीही या हल्ल्याचा निषेध करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणे हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे, असे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले. अलीकडच्या काळात पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इस्लामाबाद येथील न्यायालयाबाहेर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १२ जण ठार, तर २७ जण जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती.
