Mohammad Bagher Ghalibaf Islamabad Talks 2026: अमेरिका व इराण यांच्यात आज पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये शांततेसाठी चर्चा होणार आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स व इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर घलिबाफ हे बैठकीत सहभागी होणार आहेत. पाकिस्तानने या चर्चेला ‘इस्लामाबाद टॉक्स २०२६’ असे नाव दिले आहे. इराणने अमेरिकेशी बोलणी करण्यासाठी मोहम्मद बाघेर घलिबाफ यांची निवड केली. दीर्घकाळापासून सुरू असलेला संघर्ष थांबवण्याचे अत्यंत जोखमीचे व संवेदनशील काम घलिबाफ यांच्यावर सोपवण्यात आले आहे. घलिबाफ यांच्या करिअरची सुरूवात इराणच्या सैन्यात भरती होण्यापासून झाली. इराणच्या सैन्यात भरती झालेला एक सैनिक आज इराणसाठी अमेरिकेबरोबर वाटाघाटी करणार आहे. मोहम्मद बाघेर घलिबाफ हे नेमके कोण आहेत? इराणने अमेरिकेशी बोलणी करण्यासाठी त्यांनाच का पुढे केले? सविस्तर जाणून घेऊयात .
इस्लामाबादमध्ये आज होणार बैठक
पाकिस्तानने मध्यस्थी केल्यानंतर अमेरिका व इराणने ७ एप्रिल रोजी शस्त्रसंधीची घोषणा केली होती. त्यानंतर काही तासांतच इस्रायलने लेबनॉनमधील इराणचे समर्थन असलेल्या हेजबोल्ला संघटनेवर हल्ला केला. तसेच लेबनॉनची राजधानी बैरूतवर देखील बॉम्बवर्षाव केला. त्यात २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे अमेरिका व इराणमधील शस्त्रसंधी करार धोक्यात आला होता. इस्रायल व लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी करण्याची मागणी इराणने अमेरिकेकडे केली. अमेरिकेने इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी संपर्क साधून त्यांना लेबनॉनबरोबर वाटाघाटी करण्यास तयार केले. तसेच लेबनॉनबरोबर संघर्ष आणखी न वाढवण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर इराण व अमेरिकेची इस्लामाबादेत बैठक होते की नाही? याबाबत काल साशंकता होती. अखेर ही बैठक आज (११ एप्रिल) इस्लामाबादमध्ये होणार आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे बैठकीसाठी रवाना झाले आहेत.
इराणसाठी काय महत्वाचे?
इराणच्या मागणीवरून ट्रम्प यांनी इस्लामाबादमधील चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांना पाठवले आहे. अमेरिकेने इराणशी होणारी आजची बैठक गांभीर्याने घेतली आहे. अमेरिकेबरोबर शांतता प्रस्थापित करणे इराणसाठी महत्वाचे आहे. अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादल्याने इराणचे झालेले नुकसान व युद्धामुळे झालेली पडझड यातून सावरणे इराणसाठी महत्वाचे आहे. इराणला नव्याने पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार आहेत. अमेरिका व इराण यांच्यात अनेक मुद्द्यांवर टोकाचे वाद आहेत. त्यामुळे एका बैठकीतून समस्या सुटण्याची शक्यता कमी आहे. अमेरिका व इराण यांना काही कालावधीसाठी सातत्याने बैठक घेऊन तोडगा काढावा लागणार आहे. युद्धात इराणचे सर्वोच्च नेते तसेच इराणमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे युद्धग्रस्त इराणला या बैठकीत जास्तीत जास्त हित करून घेणे आवश्यक आहे.
मोहम्मद बाघेर गलिबाफ कोण आहेत?
इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर घलिबाफ यांचा जन्म मशहाद जवळ १९६१ साली झाला. घलिबाफ हे इराणची सशस्त्र सेना ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स’मध्ये सामील झाले. ते इराण-इराक युद्धात सहभागी झाले होते. २००५ ते २०१७ पर्यंत १२ वर्षे घलिबाफ हे तेहरानचे महापौर होते. तेहरानमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारणे, द्रुतगती महामार्ग बांधणे, बोगदे तयार करणे आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारणे यांसाठी घलिबाफ यांना श्रेय दिले जाते. एक उत्तम प्रशासक अशी त्यांची प्रतिमा इराणमध्ये तयार झाली. एक सैनिक जो देशासाठी भरीव कार्य करू शकतो, अशी स्वत:ची प्रतिमा घलिबाफ यांनी इराणमध्ये तयार केली आहे. दरम्यान, घलिबाफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे काही आरोप आहेत. तसेच १९९९ मध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनाला दाबल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. इराणचे अध्यक्ष बनण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले. मोहम्मद बाघेर घलिबाफ हे एकेकाळी इराणच्या संरक्षण दलात महत्वाचे अधिकारी होते. त्यांच्या अर्थ व्यवस्थापनासाठी व आंतरराष्ट्रीय धोरणात इराणचा जास्तीत जास्त फायदा करवून घेण्यासाठी ते ओळखले जातात.
घलिबाफ यांच्या समोरील आव्हान काय?
फेब्रुवारी २०२६ नंतर सुरू झालेल्या युद्धात इराणतर्फे घलिबाफ केंद्रस्थानी आले. दोन्ही देशांमधील चर्चेसाठी ते महत्वाचा दुवा ठरले. दरम्यान, घलिबाफ यांना इराणमध्ये रेजा खान यांच्यासारखे व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाते. १९२१ मध्ये रेजा खान या सैनिकाने उठाव केला होता. त्यानंतर त्याने १९२५ मध्ये स्वत:ला इराणचा शाह घोषित केले. रेजा शाह पहलवी झालेल्या रेजा खानने इराणमध्ये अनेक महत्वाचे बदल घडवून आणले. घलिबाफ यांच्या रेजा खानप्रमाणे पाहिले जाते. अमेरिकेने इराणबरोबर वाटाघाटी करण्यासाठी घलिबाफ यांना प्राधान्य दिले. अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमध्ये घलिबाफ यांना लक्ष्य करण्यात आले नाही. त्यामुळे इराणमध्ये घलिबाफ यांच्या भुमिकेबद्दल संशय होता. परंतु, तो अल्पावधीतच नाहीसा झाला. अमेरिकेने बोलणीसाठी घलिबाफ यांना प्राधान्य दिले, परंतु, इराणमध्ये घलिबाफ यांच्यासाठी ही बाब सकारात्मक आहेच, असे नाही.
अमेरिका व इराणमध्ये शांतता प्रस्थापित होईल का?
अमेरिकेबरोबर वाटाघाटी करणे अमेरिकेच्या सहकारी देशांना तसेच शत्रूंना देखील अवघड जाते. या पार्श्वभूमीवर इराणचे मोठे नुकसान झालेले असताना जास्तीत जास्त फायदा करून घेणे, हे घलिबाफ यांच्यासमोरील आव्हान असणार आहे. इराणची अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांपासून मुक्तता करणे घलिबाफ यांच्यासाठी महत्वाचे आहे. घलिबाफ अमेरिकेशी कशा वाटाघाटी करतात यावर पश्चिम आशियाचे भविष्य अवलंबून असेल. इराणने अमेरिकेकडे दहा मागण्यांचा प्रस्ताव दिला आहे. त्या मागण्या अमेरिकेने प्राथमिकदृष्ट्या मान्य केल्याचे वृत्त आहे. तर अमेरिकेने इराणकडे १५ मागण्या केल्या आहेत. दोन्ही देश या मागण्यांवर चर्चा करणार आहेत. चर्चेतून पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित व्हावी, असा अमेरिका व इराणचा उद्देश आहे. त्यासाठी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आली आहे.
